Sunday, October 20, 2019

कै. बाबूराव डोखळे —- आणि हैद्राबाद मुक्तीसंग्राम !

कै. बाबूराव डोखळे —- आणि हैद्राबाद मुक्तीसंग्राम !
आमच्या रावेरला ‘चिमणाराम मंदीर’ आहे. येथील प्रभू रामचंद्राच्या मूर्ती या सुबक व देखण्या आहेत, अगदी जिवंत वाटतात. या मंदीराची देखभाल, राम-हनुमानाची पूजाअर्चा, हे पूर्वी त्याचे मालक कै. बाबूराव डोखळे करत. ते नेहमी आमच्या घरी आणि गांवातील निवडक ठिकाणी काही, कुळकुळाचार, लग्नकार्य, समारंभ, उत्सव वगैरे असले, की त्याची पूजाविधी सांगण्याचे काम करत.
चिमणाराम मंदीराच्या बाहेर असलेल्या लांबसडक ओट्यावर, मंदीरात जातांना डाव्या बाजूलाच, एक दाढी वाढवलेले गृहस्थ, पंधरा किलोच्या डालडाच्या पत्री उभ्या मोकळ्या तोंडाच्या डब्यात, राॅकेल घेऊन ते विकत बसलेले असत. गांवातून बाटलीच्या गळ्याला दोऱ्या लावलेल्या काचेच्या बाटल्यांत, ते राॅकेल घ्यायला अधूनमधून गिऱ्हाईक येत. मला त्या वेळी पण प्रश्न पडायचा, राॅकेलची किंमत ती काय, त्यातून रोज किती विकले जात असेल, आणि त्यातून त्यांना नफा तो किती होणार ? पण काही असो, याबाबतीत अतिशय नियमीतपणे तिथं बसायचे आणि सुरू असे त्यांचे काम ! ते रामाचे अतिशय भक्त समजले जायचे. आम्ही त्यांच्याबद्दल ‘हे रामाचे अगदी मारुती इतके भक्त का ?’ हा प्रश्न कोणा मोठ्यांना विचारला, की ‘त्यांना मारूतीने दर्शन दिले आहे.’ असे आम्हाला ऐकवत. मारूतीच्या शेपटीला पेटवल्याने, सगळी लंका जाळणारा हा वायुपुत्र याचा अग्निपदार्थाशी संबंध असायलाच हवा, असे वाटायचे. तर आगीमुळे मारूतीची शेपटी जळाल्याने त्याला अग्नीपदार्थाचे वावडे असायला हवे, हा दुसरा विचार ! कोणता बरोबर असावा ? आमच्या डोक्यांत नुसता विचारांचा गुंता होई.
तिथं राम मंदीरात कायम दर्शनाला येणारी भजनी मंडळी, ही तिथं संध्याकाळी भजन म्हणत बसलेली. त्यांत एक नांव नक्की असायचे ते म्हणजे, थड्यावरील श्री. जगन्नाथ महाजन ! कै. लक्ष्मण महाजन, कै. रामदास महाजन वगैरे भजन मंडळातील, हे शेतकरी जीव, शेतातील काम आटोपले की भजन गात, पांडुरंगाचे, भगवान रामचंद्राचे स्मरण करत, आपले दिवसभराचे श्रम विसरत, रमून जात.
कै. बाबूराव डोखळे यांना, आम्ही सगळे ‘बाबूकाका’ म्हणत असू. कै. बाबूकाका, हे माझ्या वडिलांच्या, किंबहुना त्यांच्यापेक्षा वयाने मोठे होते. जरा स्थूल अंगयष्टी, उभट चेहरा, सावळ्या वर्णाचे, डोक्यावर काळी टोपी, टोपीच्या आंत वीतभर तरी शेंडी रूळत असलेली, पांढरा अंगरख्यासारखा वाटेल असा सदरा, त्यांवर डाव्या खांद्यावरून रूळत असलेले पांढरे स्वच्छ उपरणे, निळ्या किंवा काळ्या बारीक काठाचे तलम स्वच्छ धोतर, डाव्या हातात काठी, पायात कापडी पट्टा असलेल्या खडावा या अशा वेशात ते डुलतडुलत आमच्या गल्लीत यायचे.
सुरूवातीस अगोदर घर लागायचे, ते कै. बाळूकाकांचे ! मात्र त्यांचा ओटा जरा उंच ! गुढग्याला रेटा देत, पायऱ्या चढून वर आले, की घरात येत. बैठकीचे दार उघडेच असे. बैठकीत कोणी असले, किंवा नसले तरी घरांत येण्यासाठी त्यांना कोणाच्या परवानगीची गरज नसे. मग बैठकीच्यी कोपऱ्यात खडावा काढल्या, की समोरच्या बंगळीवर टेकायचे. जरा पायाने रेटा दिला, की बंगळी कुईऽऽकुईऽऽ आवाज करत झुलू लागे. आपोआप त्यांना गार हवा लागे. जरा बरे वाटले, की ‘अरे, कोण आहे ? मी आलोय ! जरा पाणी आण !’ असे काहीसे बोलून त्यांच्या आल्याची वर्दी ते देत. मग कै. बाळूकाका असले, तर ते येत !
आम्हा पोरांना ते आले, तर बंगळी आता खेळायला मिळणार नाही, ही अडचण असायची, तर त्यांच्या एकेक गोष्टी ऐकत बसावे असे वाटे. त्यांना गोष्टी खूप माहिती असत ! माझ्या आजीबरोबर कित्येक वेळा, पाराच्या गणपती मंदीराजवळ असलेल्या, महादेवाच्या मंदीरात मी गेलोय. तिथं ते भागवत वाचायचे. नंतर त्यांचे भागवत वाचणे बहुतेक वयोमानाने बंद झाले. मात्र त्यांच्याजवळ गोष्टींचा साठा भरपूर !
त्यांच्या मताप्रमाणे पूजेची कितीही तयारी केली, तरी काहीतरी अपूर्णता राहीलेलीच असायची, असे का होते, ते सांगता येत नसे. एखादवेळेस घरी काही पूजाअर्चा असली, तर मी काही वेळा, कागदावर यादी लिहून घेत असे. त्याप्रमाणे तबकात सर्व वस्तू ठेवत असे. तरी ऐनवेळेस काही वस्तू नाहीत, याचा साक्षात्कार पूजेला बसल्यावर, पूजा सुरू झाली की होई. असे का झाले, हे विचारले तर, ‘अरे, या वस्तू कुठे यादीत सांगायच्या असतात का ? कोणतीही पूजा असली, की या वस्तू लागतातच ! आपल्याला माहीत हवे.’ हे सांगून गप्प बसवत.
स्वच्छ, शुद्ध, खणखणीत स्वरात आणि तालबद्ध असे त्यांचे पूजेचे मंत्र सुरू झाले, की ते ऐकतांना आपल्याला, आपण एखाद्या गायकाचे गाणे ऐकत आहो, असे वाटे. एखाद्या गायकाचे गाणे रंगल्यावर होणारा आनंद आणि त्यांची पूजा ऐकतांनाचा आनंद सारखाच असे. हे जसे त्यांना जमत असे, तसेच कमालीच्या वेगात पण पूजा सांगणे त्यांना जमत असे. सत्यनारायणाची पूजा आणि आरती संस्कृतमधे सांगण्याची त्यांना फार आवड ! मात्र पूजा आटोपल्यावर होणाऱ्या, जेवणाच्या पंगतीत पण ते मागे नसत. जर यांना खाण्याचा आग्रह सुरू झाला, तर जेवण संपल्यावर पाचपन्नास जिलब्या किंवा पाचपंचवीस लाडू यांनी सहज संपविलेले पाहणारी मंडळी त्यावेळी होती.
एकदा असाच वडिलांबरोबर त्यांचेकडे गेलो होतो. त्यांच्या मधल्या खोलीत खांबाला टेकून बसले होते. ‘काय, आज कुणीकडे, पोराला घेऊन ?’ कै. बाबूकाका !
‘आज सहज इकडे आलो होतो, म्हटलं डोकवावं इकडे.’ माझे वडील. इतर अवांतर गप्पा सुरू झाल्या. मधेच विषय मराठवाड्याचा निघाला !
‘नांव काढू नको, त्या हरामखोर रझाकारांचे आणि निजामाचे ! तो पोलादी पुरूष, पटेल होता, म्हणून मुकाट्याने पाया पडत आला. ही विषवल्ली कायमची संपली पाहीजे.’ कै. बाबूकाका.
‘तुम्ही त्यावेळी तिकडे गेल्याचे माहीत आहे. पण गेले कुठून पण तुम्ही ? आणि केव्हा मुक्त केला हैद्राबाद ?’ माझे वडील.
‘आपल्या पहूरवरून तिकडे मराठवाड्याकडे निघालो, आपल्या इथून ! अंधारात चालत होतो. कोणत्या रस्त्याने गेलोच नाही. शेतातून, दऱ्याखोऱ्यातून जात होतो. रझाकारांची भिती, केव्हा कुठून येतील आणि कायमचे संपवतील. मात्र तो दिवस आठवतो, १७ सप्टेंबर, १९४८ ! निझाम व रजाकारांचा हैदोस संपला ! हैद्राबाद आपल्यात आले.’ कै. बाबूकाका. अजून पण ते वडिलांशी बरेच काही बोलत होते. ‘वाईट आहे. वाईट आहे.’ हे सारखं सुरू होतं, वडिलांचे ! मला इतकेच समजलं की यांनी काहीतरी मोठं काम केलं.
कै. बाबूकाका नंतर वयोमानाप्रमाणे थकले. पूर्वीसारखी त्यांच्याकडून धावपळ होईना. आपणाकडून काम होईनासे झाले, की परिस्थिती खालावतेच ! कधीतरी बराच पत्रव्यवहार, प्रयत्न केल्यानंतर त्यांना सरकारतर्फे पेन्शन सुरू झाले.
त्यांना माझ्या बहिणीच्या लग्नाचे बोलावले होते. थकले होते ते. पण इतक्या वर्षांचे संबंध त्यांना, आमच्या घरी लग्न असतांना, घरी बसू देतील, हे शक्य नव्हते. ते लग्नाला होते. त्या वेळी तर त्यांचे, खुर्चीवर बसून पूजा सांगणे व मंत्रोच्चार सुरू होते. मदतीला होते, त्यांचे नातेवाईक कै. मधुकाका विटवेकर आणि कै. कल्याणबुवा बोचरे !
‘तुझ्या पोराच्या लग्नाचे वेळी असेल, तर मीच लावेन लग्न त्याचे !’ कै. बाबूकाका ! काहीवेळ कोणी अशी काही इच्छा व्यक्त करते, की इतक्या वर्षांचे संबंध लक्षात घेता, आपल्याच ह्रदयात कालवाकालव होते. तसेच झाले, त्यांनी माझे लग्न लावणे, माझ्या नशिबात नव्हते. ते मग कै. मधुकाका विटवेकर यांनी लावले.
एक मात्र झाले, नंतर त्यांच्या पत्नी, मंगलाकाकूंना पण पेन्शन मिळत होते.
आज १७ सप्टेंबर, ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन’ ! मला आज कै. बाबूकाकांची खूप आठवण आली. खान्देशमधील रावेर सारख्या गांवातील, राम मंदीर सांभाळणारा, पूजापाठ करणारा हा माणूस, आपल्या तारूण्यात, उमेदीच्या काळात आपणा सर्वांसाठी काय करून गेला आहे. या संग्रामात कै. बाबूकाकांसारख्या असंख्य ज्ञात, अज्ञात भारतीयांनी आपल्या खारीच्या वाट्याच्या प्रयत्नांनी ही निझामी राजवट उलथून टाकली आणि हा मुक्तीसंग्राम यशस्वी केला. हैदराबाद संस्थानात आपला तिरंगा फडकला.

17.9.2019

No comments:

Post a Comment