Sunday, October 20, 2019

साथी रे साथी रे

आज असाच बसलो होतो. प्रेमकथेवर आधालेले असंख्य चित्रपट तयार झालेत. त्यांत नायक नायिकांनी केलेला त्याग, सफल किंवा विफल झालेले प्रेम यांवरील कथानक आणि त्यांत गुंफलेले विविध प्रसंग ! विनोदी कथांवर आधारलेले चित्रपट असायचे काही ! पण मला आज आठवले थरारपट अन् भयपट, गूढपट ! यांतील आठवणार काय तर सुमधूर गीते ! कारण त्यातील प्रसंग आज आठवणार पण नाहीत, त्याचे काही वाटणार नाही, पण आठवणारी सुरेल गीते ? ती कशी विसरणार ?
मधल्या काळात गूढपट, भयपट बरेच तयार झाले. त्यातील गाणी तर अप्रतिम ! संगीतकार, गीतकार आणि गायक यांचा दर्जाच असा होता, की कित्येक वर्षे होऊन गेली, पण ती गीते आपल्याला आजही आठवतात.
‘बीस साल बाद’ हा एक सन १९६२ सालचा चित्रपट ! विश्वजीत, वहीदा रहेमान, मदन पुरी, आसीत सेन हे कलाकार ! हेमंतकुमार यांचे संगीत आणि ‘कहीं दीप जले कहीं दिल’ हे ‘शिवरंजनी’ रागावर आधारलेले सुमधूर गीत ! शकील बदायुनी यांचे हे गीत, गायले होते लता मंगेशकर यांनी !
एक अजून गाजलेला चित्रपट आहे, ‘वो कौन थी’ ! सन १९६४ सालातला हा चित्रपट ! साधना, मनोजकुमार, प्रेम चोप्रा, के. एन् सिंग, हेलन यांनी यांत काम केले होते. यांतील ‘लग जा गले’ हे पहाडी रागावर आधारलेले, आणि लता मंगेशकर यांनी अप्रतिम गायलेले, ह्रदयाला साद घालणारे गीत लिहीलंय, ‘राजा मेहदी अली खान’ यांनी आणि संगीत दिलंय ‘मदन मोहन’ यांनी !
साधनाने सन १९६६ मधे अजून एक गाजलेला चित्रपट ‘मेरा साया’ आणि सन १९६७ मधे ‘अनिता’ नांवाच्या चित्रपटात काम केले होते.
साधना आणि सुनील दत्त यांनी ‘मेरा साया’ या चित्रपटात काम केले आहे. त्यातील ‘तू जहाॅ जहाॅं चलेगा, मेरा साया, साथ होगा’ हे अत्यंत गाजलेले ‘नंद’ रागातील गाणे, गायलेय लता मंगेशकर यांनी ! संगीत मदन मोहन यांचे, तर गीत ‘राजा मेहदी अली खान’ यांचे ! याच चित्रपटातील कल्पनेवर पूर्वी सन १९६४ मधे ‘पाठलाग’ नांवाचा मराठी चित्रपट निघाला. त्यांत डाॅ. काशीनाथ घाणेकर आणि भावना यांनी काम केले ! राजा परांजपे यांनी दिग्दर्शिलेला हा चित्रपट ! यांतील गीते, ग. दि. माडगूळकर, तर संगीत दत्ता डावजेकर यांचे ! यांतील आशा भोसले यांनी गायलेले ‘या डोळ्यांची, दोन पाखरे, फिरतील तुमच्याभवती’ हे चंद्रकंस रागावर आधारलेले अप्रतिम गीत !
‘पूनम की रात’ या सन १९६५ साला चित्रपट ! मनोजकुमार, नंदिनी, कुमुद चुगानी यांनी काम केलेला भयपट ! चित्रपटातील ‘शैलेंद्र’ यांच्या गीताला, ‘सलील चौधरी’ यांनी संगीताचा साज चढवला आहे. गायले आहे, अर्थात लता मंगेशकर यांनी !
साथी रे साथी रे
तुझ बिन जिया उदास रे, ये कैसी अन्बुझ प्यास रे
आजा आजा, साथी रे ...
दोनों जहाँ से दूर यहाँ मैं, भटक रही मैं जाने कहाँ मैं
साथी रे ...
ना मैं काया, ना मैं छाया, फिर क्यों डोले, मन भरमाया मन भरमाया, साथी रे ...
प्यार की मैं अन्बूझी कहानी, कुछ जानी और कुछ अन्जानी
साथी रे ...

4.7.2019

No comments:

Post a Comment