Sunday, October 20, 2019

भगवान शंकराला आपल्या कातड्याचे जोडे करून देणारा - चांभार !


भगवान शंकराला आपल्या कातड्याचे जोडे करून देणारा - चांभार ! 

एखादेवेळी वडीलांनी मला म्हणावे, 'चलतो का, चल ! आपण गांधी चौकात जाऊ.' नाही म्हणण्याचे कारण नसायचे. मग आम्ही  निघायचो. त्यांचा पहिला टप्पा बऱ्याचवेळा असायचा, तो 'लोहार स्टोर्स'मध्ये ! त्याचे मालक, चंपालालशेट लोहार, त्यांचे शालेय मित्र ! त्यांच्या दुकानावर 'लोहार स्टोर्स' नांवाची पाटी बघीतली, तर दिसणार नाही, ती दिसायची 'विश्वकर्मा जनरल स्टोर्स' नांवाने ! हे नांव सांगून जर कोणाला काही आणायला पाठविले, तर तो हमखास घोटाळ्यात पडणार ! तेथून आटोपले, गप्पा झाल्या की, निघून एखादेवेळी 'कन्हैयाशेठ' यांचेकडे ! मात्र वर्ष-दोन वर्षांनी, वेळ यायची, ती आर. जी. लोहार यांच्या दुकानाशेजारी असलेल्या घरवजा छोट्या दुकानांत जाण्याची. तिथं एक लाकडी बाक, त्याच्या पाठीशी चारपाच दोऱ्या आडव्या बांधलेल्या, त्यावर चपलांचे जोड, त्या दोऱ्या कवेत घेऊन आडवे पडलेले. समोर लोखंडी छोटे घमेले, त्यांत पाणी, वेगवेगळ्या तीन दिशेला, बैठक असलेली एक छोटी ऐरण, शेजारी सारख्या वापराने चकाकी असलेला तळाशी जाड असलेला लोखंडी बत्ता ! आसपास दोन-चार पत्र्याचे डबे, शेजारीच काळपट-पांढऱ्या दोऱ्याचे बंडल, त्याजवळच डिंकासारखा लिंबाच्या आकाराएवढा गोळा ! दुकानाच्या किंवा घराच्या कोपऱ्यांत चामड्याचे काळपट पिवळ्या मातकट रंगाचे बंडल बांधून ठेवलेले ! पाच-सात बिना पॉलीशचे जोडे, हे बाहेरून टाके घातलेल्या आणि त्याच्या तोंडात लाकडी ठोकळे घातलेल्या स्थितीत असायचे. स्वागत करायला दुकानाचे मालक असायचे. अंगात बाह्या नसलेली सैनाच्या कापडाची बंडी, तसलेच धोतर, त्यावर जाडजूड करगोटा बांधलेला ! काळसर वर्णाचे, कपाळावर बऱ्याच वेळा सकाळी लावलेल्या काळ्या बुक्क्याची खूण, गळ्यांत तुळशीची माळ, गोलाकार चेहऱ्याचे, तोंडात दोन-चार दात असलेच तर असले ! अगत्य मात्र लक्षांत रहाण्यासारखे.   
'अण्णा बहोत दिन बाद आये ?' दुकानाचे मालक ! 'बैठ बेटा' माझ्याकडे पहात 'छोकरा ना ?' हे वडिलांकडे पहात. ते होकारार्थी उत्तर देत.

वडील बाकावर बसले, की 'अण्णा, तुम्हारे जूते की हालत क्या हो गयी है ? नया बनवावो.' असे म्हणत, तोवर वडीलांनी त्यांच्या पायातील बूट काढलेले असत, कारण ते त्याच्यासाठीच आलेले असत.  त्या दुकानाचे मालक, मग वडीलांच्या पायाचे माप घेण्यासाठी पुठ्ठा-पेन्सिल घेऊन पुढे सरकत. पाय पुट्ट्ठ्यावर ठेवला, की जवळील पेन्सिलीने पायाभोवती फिरवत पायाचे माप घेतले जाई. पायाचे पण माप घेतात, याची मला गंमत वाटे. माप फक्त शिंप्यानेच, आणि कपड्याचे घ्यायचे असते हे मला माहीत, इथंतर पायाचे माप घेताय ! पायाचे माप घेतल्यावर, गप्पा व्हायच्या. त्यांत रेडीमेड जोड्यांमुळे मंदावत असलेल्या, धंद्याची खंत असायची, तर 'आपली परमेश्वराला काळजी' हा आधार पण असायचा.       

हे वर्णन आमच्या गांवातील चांभाराचे, थोड्याफार फरकाने सर्वच ठिकाणच्या चांभाराचे ! चमार हा शब्द 'चर्मकार' शब्दापासून आला. हे चमार, अहिरवार, मोची या नांवाने ओळखले जातात. भांबी म्हणजे चांभार, हे महाराष्ट्रात, पंजाबात आहेत. ही हिंदू समाजातील जरी जात असली, तरी मुघलकाळातील धर्मपरिवर्तनामुळे मुस्लिम समाजात पण 'चांभार' आहेत. वेदकालीं आणि बौद्धकाळापूर्वी पूर्वीं चामडें कमावण्याचा धंदा कमी दर्जाचा समजला जात नव्हता. चांभारांच्या बायका गांवच्या सुइणी असतात. अशा चांभारांस मेहेर म्हणतात. कनपजिया एकाच तुकड्याचा जोडा करतात, अहीरवार पुढचा भाग कापतात. जोड्यावर कलावतूचें काम करण्यांत अहीरवार मुलगी जोपर्यंत कौशल्य दाखवीत नाहीं. तोंपर्यंत तिचें लग्न होत नाहीं. गांवातील चांभाराचा, मेलेल्या गुरांचें कांतडें फुकट मिळावें असा हक्क होता, मात्र काळाच्या ओघात पैशाला महत्व आले, गुरे विकू लागले आणि यांना दैन्यावस्था येऊ लागली. चांभार आपल्याला भगवान शिवाचे पुत्र 'अरल्या'चे वंशज समजतात, ज्याने भगवान शिवाचे हिमालयातील थंडीपासून रक्षण व्हावे, म्हणून आपल्या कातड्याचे जोडे त्यांना करून दिले होते.

आमच्या पायाला सूर्यनारायणाच्या कडक उन्हाचे चटके, थंडीत आपले हात-पाय आखडू नये म्हणून त्याचे संरक्षण करणाऱ्या वस्तू बनविणारा या पृथ्वीतलावरचा  कारागीर, जमिनीवरील विंचूकाट्यापासून आपल्याला वाचविणारे जोडे बनविणारा कलाकार ! यांचा व्यवसाय म्हणजे, जनावराच्या चामड्यापासून चामड्याच्या वस्तू, म्हणजे बूट, चपला, पर्स, कातडी पट्टे, चाबूक बनविणे, त्याची दुरुस्ती करणे ! मात्र त्यासोबत शेती पण त्याच्या उपजीविकेचा व्यवसाय आहे. आमच्या समाजपुरुषाच्या बारा बलुतेदारांपैकी महत्वाचा बलुतेदार ! तरी दुर्दैवाने याला आमच्यापैकी काही जणांनी दूर ठेवण्याचा चुकीचा, प्रत्यक्ष परमेश्वराला मान्य नसणारा प्रयत्न केला. या समाजाने, समाजाच्या रक्षणाची जबाबदारी कधी टाळली नाही, दुसऱ्या  महायुद्धाच्यावेळी तत्कालीन ब्रिटीशांकडून यांची विशेष रेजिमेंट होती. स्वातंत्रानंतर मिळालेल्या संधीचा फायदा घेत यांनी, विविध क्षेत्रात, भारतातच नाही तर विदेशांत देखील, आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटविला आहे. शिक्षणात, व्यापारात, राजकारणांत, समाजकारणांत ही मंडळी पुढे आलेली दिसतात, आपल्या भारतीय समाजाचे आणि संस्कृतीचे नेतृत्व करतांना दिसतात. आपल्या संस्कृतीचा अत्यंत अभिमान असलेली ही मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य यांची पुरस्कर्ती आहेत.
(पूर्वार्ध)


या समाजांत, संत, समाजसुधारक, राजकारणी, शिक्षणक्षेत्रात भरीव योगदान देणारी खूप मंडळी झालीत. संतमंडळीतील नांवे घ्यायची म्हटली तर - गुरु रविदास, संत घासीदास, संत वल्लावुर, संत ककय्या  ! गुरु रविदास यांचे नांव कसे विसरणार ? गुरु रविदास हे, काशीनगरीत माघ पौर्णिमेला, संवत १७३३ मध्ये जन्माला आले. देशातील संत परिवारातील हे मोठे नांव, आपल्या विविध अभंग रचनांमधून त्यांनी समाजातील चुकीच्या पद्धतीवर प्रहार केले, कोरडे ओढले आणि समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखविला. संतमहंतांना आपण तयार केलेले जोडे कोणत्याही मोबदल्याशिवाय देणे, हे न आवडून त्यांना घरातून बाहेर काढले गेले, पण संतवृत्तीच्या माणसांत बदल तो काय होणार ? परमेश्वराचा जप, त्याचे चिंतन आणि त्यांची परोपकारी वृत्ती ही आयुष्यभर तशीच राहिली. कोणी श्रेष्ठ नाही आणि कोणी कनिष्ठ नाही, आपण सर्व परमेश्वरासमोर सारखे आहोत, ही त्यांची शिकवण. त्यांच्या असंख्य मधुर, भक्तीपूर्ण आणि सरळ रचनांनी समाजाला दिशा दाखविली. असा म्हणतात, संत मीराबाई ही पण त्यांच्या रचनांनी आणि विचारांनी प्रभावित होऊन त्यांची शिष्या बनली होती. गुरु रविदासांची चाळीस पदे 'गुरुग्रंथसाहिब' यांत आहेत. 
कृस्न, करीम, राम, हरि, राघव, जब लग एक न पेखा।
वेद कतेब कुरान, पुरानन, सहज एक नहिं देखा।।
चारो वेद के करे खंडौती । जन रैदास करे दंडौती।।  

आपल्या सर्वांच्या तोंडी असलेली, ही रचना कोण विसरणार ? 
अब कैसे छूटे राम नाम रट लागी।
प्रभु जी, तुम चंदन हम पानी, जाकी अंग अंग बास समानी॥
प्रभु जी, तुम घन बन हम मोरा, जैसे चितवत चंद चकोरा॥
प्रभु जी, तुम दीपक हम बाती, जाकी जोति बरै दिन राती॥
प्रभु जी, तुम मोती, हम धागा जैसे सोनहिं मिलत सोहागा॥
प्रभु जी, तुम स्वामी हम दासा, ऐसी भक्ति करै ‘रैदासा

राजकारणी, समाजकारणी व्यक्तींची नावे घ्यायची तर - गदर पार्टीच्या संस्थापकांपैकी एक असलेले पंजाबमधील बाबू मंगू राम मुगोवालिया, भारताचे उपपंतप्रधानपद भूषविणारे कै. बाबू जगजीवन राम, बहुजन समाज पक्षाचे संस्थापक, कै. कांशीराम आणि त्यानंतर त्या पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या सुश्री मायावती, शिपायापासून ते भारताच्या गृहमंत्रीपदापर्यंत जाणारे आपल्या महाराष्ट्रातील, श्री. सुशीलकुमार शिंदे, बिहारचे माजी मुख्यमंत्री कै. राम सुंदर दास, उत्तर प्रदेशातील राव साहेब माणिकचंद जाटव, पंजाबमधील मास्टर गुरुबंतसिंघ, जमू काश्मीरमधील आणि हरयाणाचे राज्यपाल राहीलेले बाबू परमानंद, तामिळनाडूमधील शिक्षणतज्ञ आणि नामवंत वकील रावसाहेब एल. सी. गुरुस्वामी,  भारतीय संसदेतील लोकसभेच्या सभापती राहीलेल्या मीराकुमार, केंद्रीय मंत्री राहीलेल्या कुमारी सेलजा, कर्नाटकातील धारवाड येथे जन्मलेला, क्रिकेट खेळाडू बाळू पालवणकर ! आपल्या भारतात या समाजाने योगदान दिलेल्या किती लोकांची नावे सांगावीत ?

असं काही लिहायचं असलं, की मला आठवते ती माझी आजी, आई, वडील आणि त्यांनी वेळोवेळी दिलेल्या, निदान चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या सूचना ! आम्हाला अगदी प्राथमिक शाळेपासून शिकवायला सर्व जातिसमाजाचे शिक्षक असत. संक्रांतीला गावांतील सर्वांकडे जाऊन त्यांचेकडून तिळगुळ आणि आशीर्वाद घ्यायचा, तसेच दसऱ्याला सोने लुटून आल्यावर ते वडीलधाऱ्या मंडळींना देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायचा, ही पद्धत ! इतर काही जण हे गुरुजींचा जातीवरून उल्लेख करत, त्यावेळी माझी आजी, आई-वडील सांगत - 'आपल्याला जे शिकवतात हे आपले गुरु असतात. त्यांचा त्यांच्या जातीशी काही संबंध नसतो. गुरु दत्तात्रेयांनीदेखील ज्ञानप्राप्तीसाठी चोवीस गुरु केले आहेत. आपल्याला ज्ञानप्राप्ती करायची असेल, तर गुरुची कृपा ही कायम आयुष्यभर असायला हवी, त्यासाठी त्याची कृपा आणि आशीर्वाद हवा.' मग वाटायला लागते, चुलीपुढे आयुष्यभर स्वयंपाक केल्याने धुरामुळे ज्यांच्या दृष्टीवर विपरीत परिणाम झालेला आहे, ते दूरदृष्टीचे, का आज पण जातीपातीवरून समाज पेटवून त्यावर आपल्या स्वार्थाची पोळी भाजणारे आमच्या समाजातील 'पुढारी' दूरदृष्टीचे ?
(उत्तरार्ध)

15.9.2019

Image may contain: 2 people, shoes

Image may contain: 2 people, text





No comments:

Post a Comment