Sunday, October 20, 2019

माणसाचं मन मोठं विचित्र असतं.

माणसाचं मन मोठं विचित्र असतं. एखाद्याच्या वागण्याबोलण्यावरून, लिखाणावरून, इथं प्रतिसाद देण्यावरून, ते निष्कारण अंदाज बांधतं, की हा माणूस कसा असावा ? याचा व्यवसाय काय असावा ? काही वेळा, हे आपले अंदाज बरोबर येतात तर काही वेळा चुकतात, अर्थात तो अंदाज, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, ताडून पहाता आला तर !
त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट वा निदान फोनवर तरी बोलणे होईल का ? बऱ्याच वेळा इथं प्रोफाईलवर फोन नंबर दिले नसतात; अर्थात त्यांनी द्यावेत किंवा नाही, हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. थोडं अलिप्त असलेले बरं, असं वाटणारी मंडळी आपला संपर्क क्रमांक वा पत्ता देत नाहीत. स्त्रिया तर या बाबतीत विशेष काळजी घेतात, आणि घ्यायला पण हवी. सुतावरून स्वर्ग गाठणारे, किंवा बोट दिलं, तर मनगट धरणारे आणि नंतर गळा आवळणारे, काही कमी नाहीत. याचा त्यांना होणारा मनस्ताप कोणत्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतो.
काही जण तर इथं काहीही माहिती देत नाही, ते ‘डमी’ नांवाने किंवा ‘फेक अकाउंट’ असावं असा संशय येऊ लागतो. काही मात्र खुल्या मनाने येतात, जे व्हायचं असेल ते होवो, या भावनेने काहीही लपवाछपवी न करता, पुरेसी माहिती देतात. त्यामुळे एक होतं, ही व्यक्ती खरोखर अस्तित्वात आहे, याची खात्री होते. काहींच्या एकमेकांशी राशी जुळतात, चांगली मैत्री होते. माझी पण कित्येकांशी छान ओळख, त्यातून मैत्री झालेली आहे आणि ती कायम राहील, असे वाटते आहे.
उपद्रवी मंडळी ही अपवादात्मक असतात, तरी अशांचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून, त्यांना आपला थांगपत्ता लागू नये, ही काळजी ही बहुसंख्य लोक घेत असतात. समाजनियम आहे, की बहुसंख्य जनता ही नितीमूल्ये आणि नियम पाळणारी असते. अनैतिक आणि नितीमूल्ये पायदळी तुडवणाऱ्यांची संख्या तशी कमीच असते, मात्र त्यांच्यापासून इतरांना संरक्षण मिळण्यासाठी बहुसंख्य जनतेला, प्रचंड यंत्रणा उभी करावी लागते, ती राबवावी लागते.
अर्थात कोण सरळ, वा कोण उपद्रवी याची बऱ्याच जणांना अजिबात फिकीर नसते. काही जणांना ही माहितीच मोलाची असते, त्याचा उपयोग ते त्रास देण्यासाठी करतात ! कदाचित अलिकडे अशी मंडळी वाढू लागली असावी, कारण चांगलं लिहीणारी, व्यक्त होणारी मंडळी दिसेनासी होत आहेत, त्यांचे येथील अस्तित्व ते खाते बंद करून संपवतात किंवा क्वचितच दिसतात. अर्थात ही पण शक्यता आहे, की कामाच्या व्यापामुळे जमत नसेल, यांत वेळ घालवण्यात काही अर्थ नाही, हा निष्कर्ष काढला असेल !
इथं बऱ्यापैकी मंडळी असावी किंवा आहे, की जी लोकशाही मार्गाने किंवा ज्याला काही वेळा, झुंडशाहीने म्हणू या, बोलणं बंद करायला किंवा गप्प रहायला भाग पाडते. ही मंडळी दिवसेंदिवस वाढत असावी.
जाऊ द्या, घटकाभर करमणुकीकरता इथं यावं आणि थांबता येईल, तितके थांबून निघून जावं ! काळ कोणाकरता थांबलाय कधी ?

21.7.2019

No comments:

Post a Comment