Sunday, October 20, 2019

एका लेखातील हे वाक्य वाचले

एका लेखातील हे वाक्य वाचले - 'कारण ती (साधना) पूर्ण करण्यासाठी आसनविजय लागतो' --- आणि मला खूप जुनी गोष्ट आठवली.
साधारणतः सन १९७९ - ८० मधील ! मी महाविद्यालयात पहिल्या वर्षाला होतो, तबलाही शिकत होतो ! तबला शिकवणारे माझे गुरुजी '(कै.) बबनराव भावसार हे जळगावचे ! जुन्या जळगांवात ‘दलाल वाड्यात’ ते रहायचे. रथ गल्लीतून त्यांच्याकडे जावे लागे.
मला शिकतांना, ते सांगत असलेल्या गोष्टी ऐकतांना, किती वेळ बसावे आणि किती नाही असे होवून जायचे. एक बोल - तिरकीटतकता तिरकीट’, ‘धिरधिरकिटतक तातिरकिटतक’, वगैरे बोल निदान मध्य लयीत पंधरा-वीस मिनीटे वाजवत रहायचे, म्हणजे बोल दाणेदार व स्पष्ट येतो, बोबडा येत नाही. तिरकीट तिरकीट लागोपाठ आले, तर कसे वाजवायचे ते पण माझ्याकडून घोटवून घेतले होते. दीडपटीने वाजवतांना, त्याची दीडपट कशी करायची, हे पण शिकवले होते. डोक्यात लय पक्की कशी असायला हवी, यासाठी मनातल्या मनांत बोल कसे पाठ हवेत, याचे महत्व सांगीतले होते. हे ऐकताऐकता तास संपून जाई. मग मात्र शिकण्याचा तास संपला, की मी नाईलाजाने उठू लागत असे. काही वेळा त्यांनी हे पाहिले, मग स्पष्ट सांगितले 'कोणतेही काम पूर्ण करायचे असले आणि त्यांत कौशल्य मिळवायचे असले की त्यांत तुमचे बूड टिकले पाहिजे, तर उपयोग आहे, हे कायम लक्षांत ठेव ! दुसरा कोणताही रस्ता नाही !'
-------- त्यांचे हे वाक्य आयुष्यभर लक्षांत ठेवण्यासारखे आहे, मी ठेवले आहे, माझ्या गुरूंचे वाक्य आहे.
('बूड' हा शब्द मी बदलला आहे, त्यांनी दुसरा शब्द वापरला होता.)

29.6.2019

No comments:

Post a Comment