Sunday, October 20, 2019

श्री. पी. डी. तडवी उपाख्य जमादार सर !

श्री. पी. डी. तडवी उपाख्य जमादार सर !
सरदार जी. जी. हायस्कूल मधे, आम्हाला दहावीत असतांना, भूगोल शिकवायला, श्री. पी. डी. तडवी सर होते. त्यांना सर्व जण ‘जमादार सर’ म्हणून ओळखीत.
गोरेपान, बेताची उंची, केस चापूनचोपून मागे वळवलेले ! अंगात साधेच पण व्यवस्थित असलेले कपडे. त्यांच्या अंगात बहुतेक वेळा पांढरट किंवा गुलाबीसर शर्ट आणि राखाडी किंवा शेवाळी रंगाची पॅंट असायची, त्यांना आवडत असावी. शर्टचा खिसा नेहमी फुगलेला, कारण खिशाला दोन-तीन पेन, त्यातील एक पेन नक्की तांबड्या शाईचा आणि चष्म्यासहीत चष्म्याचे घर !
तसे ते इंग्रजी पण छान शिकवायचे. मात्र त्यांचा खास विषय म्हणजे भूगोल समजला जाई. वर्गात शिकवायला जायचे, तर हातात नकाशाची लांबच लांब पुंगळी घेऊन, त्यांचे हळूहळू व्हरांड्यातून वर्गावर जाणे दिसायचे. एखादवेळेस पृथ्वीच्या गोलाची गरज असेल, तर सोबत झेंडू महाजन किंवा हरिभाऊ पाटील मागे तो पृथ्वीचा गोल घेऊन वर्गात प्रवेश करत. आपल्या अतिशय हळू व मृदू आवाजात त्यांचे विद्यार्थ्यांना भूगोल शिकवणे, अप्रतिम असे. मुलांवर संतापलेले मी त्यांना कधी बघीतलेले नाही. न संतापता, आरडाओरड न करता, इतके सुंदर आणि विद्यार्थ्यांना लगेच समजेल, असे शिकवणारे बहुसंख्य शिक्षक आमच्या शाळेत होते, त्यातील एक म्हणजे जमादार सर !
आमचे गांव रावेर, हे सातपुड्याच्या कुशीतील गांव ! त्यांचे गांव, लोहारा हे तर प्रत्यक्ष सातपुड्यात ! सातपुडा पर्वत म्हणजे याला सात पर्वत रांगा, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांची हद्द आणि त्यामुळे यांना विभागणारा हा पर्वत ! पूर्वीची शिक्षक मंडळी शिकवतांना सांगायची, ‘आपले गांव अतिशय भाग्यशाली आहे. सातपुड्यात उगम पावणारी जीवनदायी तापी नदी आणि तिच्या खोऱ्यातला हा सुपीक प्रदेश ! पाण्याची मुबलकता आणि घनदाट जंगलाच्या रूपात असलेली, निसर्गसंपदा !’ सातपुड्यातून रसलपूरला वाघ आल्याचे लोकांना आठवत होते. मात्र त्यांच्या शिकवण्यातून सातपुड्याची झालेली दुरावस्थेबद्दल बोलले जाई. ते सांगत,
‘तिकडच्या मध्यप्रदेशातील असलेल्या भागाबद्दल तर सांगता येत नाही, पण आपल्या महाराष्ट्रात मात्र सातपुड्याच्या जवळपास दोन रांगा उजाड झाल्या आहेत. दिवसा जायला भीत होतो, अशा जंगलात रात्री पण गाडी घेऊन फिरता येते. काय करणार ? ‘मानवाचे पाऊल आणि वाळवंटाची चाहूल !’ या त्यांच्या वेदनादायक पण आवडत्या वाक्यावर ते गप्प व्हायचे, आणि पुन्हा शिकवायला सुरूवात करायचे.
दहावी, अकरावी नंतर तसा शाळेतील बहुसंख्य शिक्षकांचा संबंध येईनासा झाला. मात्र त्यांनी शिकवलेली, वाक्ये अजून आठवतात ! त्यांनी त्यावेळी शिकवलेल्यांचे अर्थ आज समजतात, अनुभवण्यास येतात.
पूर्वी शेतावर गेल्यावर मुक्कामाला कै. बाबूकाका पाटील यांच्याकडे थांबलो, तर उन्हाळयात सकाळी अंगावर गोधडी घ्यायला लागायची, एवढा गारवा असायचा तापीकाठी ! ‘पाल’ हे गांव सातपुडा पर्वतातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. आता तापीला पण ओहोटी लागली आहे, गारवा गेला ! आता उन्हाळयात तिच्या पात्रातली वाळू चमकते, डोळ्याला त्रास होतो, तिचे पायाला चटके बसतात. उन्हाळयात पण अनवाणी पायाला ओलसर गार वाटणारी तिची वाळू, आता तिच्या लेकरांच्या पायाला चटके द्यायला लागली आहे.
‘सातपुडा पर्वतातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘पाल’ - हे शाळेत दुसरी-तिसरीपासून घोकून पाठ केलेले वाक्य, आता फक्त पुस्तकात राहीलेले आहे. त्याचा अनुभव येत नाही. झाडांशिवाय उघडेबोडके झालेले, हे डोंगर आणि त्यांचे काळेशार दगड, उन्हाळयात कडक तापतात, वातावरणांत गरम वाफा सोडतात. आता वस्तुस्थितीप्रमाणे ‘पाल हे आता थंड हवेचे ठिकाण राहीले नाही’ असे उत्तरपत्रिकेत लिहीले, तर पेपर तपासणारे शिक्षक, मार्क देतील का नाहीत याची कल्पना नाही. वादविवाद नको, म्हणून पुस्तकातील हे वाक्य गाळलेले पण असू शकते. वादविवाद नको, सामाजिक शांतता बिघडायला नको, आपली मतपेटी सुरक्षित व भक्कम करायची, म्हणून आजपावेतो किती निर्णय घेतले गेले आणि अजून पुढे किती घेतले जाणार, हे परमेश्वरालाच माहीत !
काही वर्षांपूर्वी रावेरलाच असतांना, मी ‘पाल’ येथे महाराष्ट्रातील वनअधिकारी यांचा ट्रेनिंग कॅंप होता. तिथं त्यांना नियमीत लागणाऱ्या कायद्यातील तरतुदींवर भाषण देण्यासाठी तीन दिवस तिथं मुक्कामास होतो. त्यानंतर काही योग आला नाही. हा विषय त्यांच्याजवळ काढल्यावर सह्रदयी माणसाला जी वेदना होते, ती त्यांना झाली.
सध्या ‘आरे’ आणि तेथील वृक्षतोड, हा विषय गाजतो आहे. हा विषय तर आपणा सर्वांच्या, आजपावेतोच्या वागणुकीपुढे मोहरीएवढा पण नाही ! रस्ते रुंदीकरण करतांना उध्वस्त होणारी निसर्गसंपदा, औद्योगिक क्षेत्र विकसीत करतांना आपण लावत असलेली निसर्गाची वाट, प्लॅस्टीकच्या अतिवापरामुळे आपली निसर्गाच्या जीवावर उठण्याची स्पष्ट झालेली मानसिकता, आदीवासी यांना देण्यात येणाऱ्या वनजमीनींबद्दलची वस्तुस्थिती ! किती प्रचंड प्रमाणात वृक्षतोड व निसर्ग संपदेचा नाश झाला आहे ! त्यांनाच विचारा, जे जंगलात रहात आहे, तेच आपले दु:ख सांगतील. आपल्या स्वार्थाने आपण निसर्गावर नाही, तर आपल्यावर कुऱ्हाड चालविली आहे, या पापाची कबूली, ही सर्व पाप करणारीच मंडळी देतील.
कोणताही सरकारीच निर्णय नाही, तर आपले दिनक्रम बघा ! आपल्याला प्रगती करायची आहे, या नांवाखाली दररोज निसर्गाला आपण कशाप्रकारे ओरबाडत आहोत, हे लक्षात घ्या ! खरंच इतकी आवश्यकता आहे का ? आपण सर्वांनी, मानवाने, हा जो काही प्रगतीचा मार्ग स्विकारलेला आहे, त्यातून निसर्गाचा ऱ्हास होणार नाही, असा कोणताही मार्ग नाही का ?
प्रगती करतांना, कोणताही निसर्गऱ्हास वाचवण्याचा मार्ग शिल्लक नसेल, तर हे सर्व मार्ग आपणांस वाळवंटाकडे, आपल्या विनाशाकडे घेऊन जातात, हे निश्चित झाले आहे. आता स्वार्थाचे कापडाने आणि धनलालसेच्या हातांनी, आम्ही आमचे ज्ञानचक्षू घट्ट बांधले आहे, आम्ही अंध झालो आहेत. सवयीप्रमाणे आणि सोयीने, आपल्यास हवी ती भूमिका घेता येते. तिचे जनतेची दिशाभूल करता येईल, इतपत समर्थन करता येते. आजपावेतो तेच करत आलो आहोत.
जाऊ द्या ! आमच्या जमादार सरांनी, आम्हाला शिकवतांना म्हटलेले - ‘मानवाचं पाऊल आणि वाळवंटाची चाहूल !’ हे विदारक असलं, तरी हेच खरं !

7.10.2019

No comments:

Post a Comment