Sunday, October 20, 2019

‘मन तडपत हरि दर्शन को आज’

‘मन तडपत हरि दर्शन को आज’
पूर्वी चित्रपट हे बहुतेक ‘काळे-पांढरे’ असत, रंगीत नव्हते. त्यांत रंग भरण्याचे काम नायक-नायिका, कलाकार ही प्रेक्षकांना दिसणारी मंडळी करायची. तसेच प्रेक्षकांना न दिसणारी अशी मंडळी, म्हणजे - दिग्दर्शक, कथाकार पण चित्रपटात रंग भरत आणि संगीतकार, गायक ही मंडळी तर, तुम्ही डोळे मिटून जरी बसलांत तरी, डोळ्यांसमोर स्वरांचे सप्तरंगी इंद्रधनुष्य उभे करत !
चित्रपट पहाण्याची परवानगी मिळणे, हे अजिबात सोपं नव्हतं. रावेरला स्वस्तिक टाॅकीज मधे सिनेमा लागला होता, ‘बैजू बावरा’ ! ‘बैजू बावरा’ हा सम्राट अकबराच्या काळातील गायक ! सम्राट अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी महान गायक, तानसेन यांना गायनांत हरवणारं व्यक्तीमत्व ! या चित्रपटांत पं. डी. व्ही. पलुस्कर आणि उस्ताद अमीर खान, यांनी पार्श्वगायन केलं आहे. शास्त्रीय संगीतावर आणि त्यांतील कलाकारांवर आधारलेला हा चित्रपट, मग परवानगी मिळाली.
यांतील ‘मालकंस’ रागावर आधारलेलं आणि संगीतकार नौशाद यांनी संगीत दिलेलं हे गीत, ‘मन तडपत हरि दर्शन को आज’ गायलंय, पै. महंमद रफी यांनी ! शास्त्रीय संगीतावर आधारलेली खूप गाणी म्हटलीत, पै. महंमद रफी यांनी ! ‘पाकिजा’ या चित्रपटातील ‘चलो दिलदार चलो’ हे पै. गुलाम महंमद यांनी संगीत दिलेलं गाणं ! ‘बहारो फूल बरसाओं’ हे प्रत्येकाच्या विवाह प्रसंगी वाजवलं जाणारं गाणं ! खूप गाणी आहेत, त्यांनी गायलेली.
दि. ३१ जुलै १९८०, पै. महंमद रफी गेले ! सकाळी जळगांवहून रावेरला जाण्यासाठी मी बस स्टॅंडवर होतो, घरी जायचे होते. बातमी ऐकायला मिळाली, ती ही ! त्या वेळी स्टॅंडजवळच्या हाॅटेलवर रेडिओ मोठ्याने लागत ! गाणी, बातम्या आपोआप ऐकू येत. त्यावेळी हेच गाणं लागलं होतं, ‘मन तडपत हरि दर्शन को आज’ !
काही जण आपल्यातून जाऊन कितीही वर्ष झाली, तरी ते कायमचे आपल्यातून गेले, हे आपलं मन मानायला तयार नसतं ! त्यांचे काम व कर्तृत्व, त्यांना आपल्या विश्वात जिवंत ठेवते !

31.7.2019

No comments:

Post a Comment