Sunday, October 20, 2019

आज आषाढ शुद्ध ११ !

आज आषाढ शुद्ध ११ ! आपण ‘आषाढी एकादशी’ म्हणतो, ‘देवशयनी एकादशी’ म्हणून पण ही एकादशी ओळखली जाते.
गंमत वाटते, ती आपल्या विचाराची ! भगवंत जर खरंच झोपायला लागला, तर एवढ्या अवाढव्य ब्रह्मांडाचा गाडा कोण ओढणार ? या ब्रह्मांडाला जिवंत कसे ठेवणार ?अहो, देवाने झोपून कसे चालेल ? देवाने जागृतच असायला हवे.
खरं सांगू, देवाबद्दल, भगवंताबद्दल आपल्याला ममत्व वाटायला लागले, ओढ वाटू लागली, की आपली अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणजे, त्याला आपण आपल्यासारखा मानायला लागतो, मानवी भावभावना चिकटवितो. मग, देवाची उठण्याची वेळ आपण ठरवतो. त्याला जाग यावी म्हणून आपण भूपाळी म्हणतो. त्याला जेवायला काय आवडते, ते ते सर्व पदार्थ तयार करून त्याचा नैवेद्य त्याला अर्पण करतो, अगदी त्याच्या पोटाचा विचार न करता ! त्याच्या विश्वरूपाची कल्पना पण आपण करतो, आणि मग त्याच बरोबर, दुपारची वामकुक्षी पण त्याला घ्यायला लावतो, आणि रात्रीची झोप पण त्याला घ्यायला लावतो. त्याचे कौतुक करण्यासाठी आपण केलेली आपली, वेगवेगळ्या भाषांमधील, आरती पण ऐकतो.
तो, भगवंत पण बिचारा भावाचा भुकेला ! हे सगळे तो सोसतो, ते केवळ आपल्या लाडक्या भक्तांसाठी ! स्वत:ला नामदेवांची दासी म्हणवून घेणाऱ्या, जनाबाईसाठी तो पितांबरावर शेला कसून कष्टाने दळतो-कांडतो. पैठणच्या एकनाथांसाठी तो श्रीखंड्या बनून देवपूजेची तयारी करून देतो, चंदन उगाळून देतो, कावडीने गोदावरीवरून पाणी भरतो. आमच्या तुकोबारायांसाठी इंद्रायणीत बुडवलेली गाथा वर आणतो. आळंदीच्या त्या ‘संन्याशांच्या पोरांसाठी’ सजीव रेड्याच्या तोंडून वेद तर वदवून घेतोच, पण निर्जीव भिंतीला पण चालवून दाखवतो. अरे, आतापर्यंत कोणाचा नैवेद्य खाल्ला नसेल, पण त्या नरसीच्या नाम्याचा जीवावर उदार होण्याचा निर्धार पाहून, त्या चिमुरड्याचा ताटातील नैवेद्य खाल्ला ! दामाजीपंतासाठी बादशहाकडे नोकराचे रूप घेऊन पैसे भरून आला ! काय उदाहरणे द्यावीत, किती द्यावीत आणि कोणाकोणाची द्यावीत ?
त्या पंढरपूरच्या तुझ्याच भक्ताने, पुंडलिकाने फेकलेल्या वीटेवर, आता सध्या अठ्ठावीस युगे झाली, मुकाटयाने उभा आहे बिचारा, हा जगन्नियंता ! या अशा भगवंतासमोर आजच्या आषाढी एकादशीला, ही आरती म्हणत, नतमस्तक होण्याशिवाय काय करणार ?
युगें अठ्ठावीस विटेवरी उभा।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुण्डलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा॥
जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥
तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं।
कांसे पीताम्बर कस्तुरि लल्लाटी।
देव सुरवर नित्य येती भेटी।
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती॥
जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळां।
राही रखुमाबाई राणीया सकळा।
ओवाळिती राजा विठोबा सांवळा॥
जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥
ओवाळूं आरत्या कुर्वण्ड्या येती।
चन्द्रभागेमाजी सोडुनियां देती।
दिंड्या पताका वैष्णव नाचती।
पंढरीचा महिमा वर्णावा किती॥
जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती।
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती।
दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ओंवाळिती॥
जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

12.7.2019
Image may contain: one or more people and indoor

No comments:

Post a Comment