Sunday, October 20, 2019

लंगडी एकादशी !

लंगडी एकादशी !
पूर्वी बहुतेकांची आर्थिक परिस्थिती ही सर्वसाधारण यथातथाच, म्हणजे खाऊन-पिऊन जेमतेम असायची. त्यांच्या लेखी उपवास म्हणजे, हे जास्तीचे, न परवडणारे ओझे. त्यामुळे यासाठी वेगळे खाण्यासाठी जेवणाइतकेच, किंवा ‘एकादशी दुप्पट खाशी’ इतके बनविणे, हे फक्त बोलण्यापुरताच असायचे. शक्यतो उपवास करायचा, म्हणजे दिवसभर काहीही खायचे नाही, अशीच प्रत्यक्ष अवस्था असायची. उपवासाला सुकामेवा, खजूर, फळे वगैरे आणणे, ही मोठ्या घरच्या माणसांची मक्तेदारी, हा आपणा सर्वांचाच नाही, तर दुकानदाराचा पण समज ! उपवासाच्या दिवशी दुकानदाराला एखादवेळेस, आपण हट्ट करून आणायचा म्हणून, खजूर आणायला गेलो, अन् ‘खजूर’ मागीतला, तर ‘कारे, उपवासाला खजूर मागतोय ?’ हे तो आपल्याला अविश्वासाने विचारणार. नंतर कालौघात परिस्थिती सुधारली, आता त्याचे काही फारसे वाटत नाही. पूर्वी उपवासाला चालतात, असे फक्त ऐकलेले पदार्थ पण, आता प्रत्यक्ष खायला मिळायला लागले आणि आपण खाऊ लागले आहोत. असो.
आपल्या जेवण्यातील नेहेमीच्या खाण्याच्या पदार्थांपेक्षा, आपण उपवासाला जे पदार्थ खाण्यासाठी करतो, ते बहुतांशपणे वेगळे असतात. यांतील साबुदाण्याची खिचडी, भगर व आमटी, बटाट्याचे पापड, कीस व चकल्या, पाकातील रताळी, खजूर, शिंगाड्याची खीर व शिरा, विविध फळे वगैरे पदार्थ जरी, आपल्याला आठवले, तरी तोंडाला पाणी सुटते. अगदी पोटभर जेवल्यावर देखील, या पदार्थाचा नुसता करतांना वास आला, तरी तिकडे आपले लक्ष जाते, आणि शेवटी ते उपवासाचे केलेले, निदान घासभर तरी, खाऊन व चव बघीतल्याशिवाय, आपले समाधान होत नाही. ही मोठ्या माणसांची कथा ! लहान मुलांचे मग तर विचारूच नका ! त्यांचे तर घरी कोणाचा उपवास आहे, याकडे काटेकोर लक्ष असते. ज्यावेळी घरातील वडीलधारी मंडळी उपवास करतात, त्यांच्या घरी जर बाळगोपाळ मंडळी असली, की मग गमतीदार प्रसंग घडतात.
माझी आई बरेच उपवास करायची. सोमवार, मंगळवार, एकादशी हे तर वर्षभर, आणि या व्यतिरिक्त इतर नेहमीचे यशस्वी उपवास ! रामनवमी, हरितालिका, नवरात्र, महाशिवरात्र, दत्तजयंती वगैरे असायचेच ! त्याचा तिच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम व्हायचा, पण इतक्या वर्षांचे तिच्या मनाला व शरीराला लागलेले वळण, तिला सोडवत नसायचे. शेवटी कसेतरी मंगळवार तिला सोडायला लावले. सोमवार सोडायला तर, ती निक्षून नाही म्हणायची.
‘अरे, मी त्यावेळेस परळीला होते. तुझ्या जन्मापासूनच धरले आहेत. ते नाही सोडणार.’ शेवटी तिला व वडीलांना, दक्षिण भारत दर्शनास नेले असता, रामेश्वरमला नेले होते, तिथून सोमवार सोडायला लावले.
माझी मुलगी, तिच्या लहानपणी कायम माझ्या आईजवळ, म्हणजे तिच्या आजीजवळ असायची. रोज त्यांची दोघींची देवपूजा, देवाला हळदकुंकू वहाणे व नंतर एकमेकींना लावणे, तुळशीची पूजा - ‘तुळशी तुळशी एकादशी’ वगैरे म्हणणे, मग नैवेद्य, आरत्या, प्रदक्षिणा वगैरे, सर्व करणे तिच्या लक्षात असे. तिच्याकडून मनाचे श्लोक, रामरक्षा, शुभं करोति म्हणून घेणे. दिवसभर वेगवेगळ्या धार्मिक, ऐतिहासिक गोष्टी सांगणे. हे तिचेच काम ! मुलगी तर दिवसभर तिची पाठ सोडत नसे. आजीच्या अंथरूणावर पण, तिच्याशिवाय कोणालाही झोपायची परवानगी नसायची. मग तिचा उपवास असला, म्हणजे मुलीचे लक्ष त्यांवर ! तिला तिची आई लवकर जेवू घालायची, म्हणजे मुलगी खेळायला मोकळी. आईचा उपवास असला, की मग काही साबुदाणा खिचडी, पापड वगैरे जीभ चाळवणारे पदार्थ केले जायचे. तिच्यासमोर हे पदार्थ खाल्ले, की ती मागणार हे नक्की !
एकदा असेच झाले. आईचा उपवास होता, असावी बहुतेक एकादशी ! मुलगी जेवण करून खेळायला बाहेर गेली होती. फराळाचे पदार्थ केले होते. खेळून घरी आली, तो तिच्या आजीचा फराळ चाललेला.
‘आई, मला पण दे !’ मुलगी.
‘अग, तुझं जेवण झालं, आता कसली खिचडी मागतेय !’ तिची आई.
‘मला पाहिजे, नाहीतर मी रडते.’ मुलगी. ती अगदी सांगून सवरून रडायची, लोळायची, पाय आपटायची !
‘अग, त्या पोरीला कशाला रडवतेय ? घेऊ दे माझ्यातली थोडी !’ तिची आजी, म्हणजे माझी आई.
‘अहो, तुमचा उपवास आहे. तिचे जेवण झालंय ! तिच्या पोटात जागा नसेल, उगीच मागते आहे. चाळा म्हणून ! तुमची कशाला कमी करताय ? सौ.
‘मी पण उपास करते, आजीसारखा ! आता मला खिचडी दे.’ मुलगी पिच्छा सोडायला तयार नव्हती.
‘मला का इतकी जाणार आहे ? हं, हे घे ! आता माझ्या सारखा उपवास करावा लागेल बरं ! संध्याकाळीही उपवासाचे खाऊ ! आईला म्हणावं, ‘माझा उपवास आहे, आजीसारखा !’ मुलीची आजी. तिने खिचडी वाटीत घेतली, खाल्ली आणि पळाली ! तिला काय समजणार ?
संध्याकाळी असंच काही झालं, का पाहुणे आले, पण तळण करावं लागलं ! तळलेले पदार्थ अपायकारक जरी असले, तरी खायला सगळ्यांनाच आवडतात. मुलीने बघीतले, मुकाटयाने वाटीत घेतले आणि खाल्ले. संध्याकाळीही उपवासाचे केले, तर पुन्हा हाच सकाळचाच गोंधळ ! तिला पुन्हा हवे होते.
‘तुला सकाळीच सांगीतले होते ना, संध्याकाळीही आपण खावू म्हणून !’ तिची आजी, नातीला समजावीत होती.
‘काही देऊ नका तिला ! तिने आताच केले होते, ते भजी, पापड खाल्लेय ! तिचा कसला उपास आणि कसली एकादशी ! अशी कुठं एकादशी असते ? मोडली एकादशी तिची !’ सौ.
झालं ! मुलीने भोंगाच काढला ! अजिबात ऐकेना ! तिची आजी समजावतेय, पण नाही ! एकादशी मोडली, हे सहन झालं नसावे. मग आईच्या काय डोक्यात आले, कुणास ठाऊक ?
‘तुझ्या आईला म्हणा, माझी ‘लंगडी एकादशी’ आहे. लहान मुलांना चालते.’ आई.
माझी मुलगी कितीही मोठ्याने रडत असली, तरी आसपास कोण काय बोलते आहे, इकडं तिचे नीट लक्ष असायचं ! अगदी सावध ! तिने ‘लंगडी एकादशी’ हा शब्द ऐकला, आणि रडणं जरा थांबवले.
‘लंगडी एकादशी, म्हणजे काय ?’ मुलगी.
‘अग, लंगडी एकादशी म्हणजे ‘लंगड्या बाळकृष्णाची’ लंगडी एकादशी !’ आई तिच्या नातीला.
‘लंगडा बाळकृष्ण ? कुठं आहे ?’ मुलगी.
‘देवघरात बघून ये बाळकृष्णाला ! कसा आहे तो ?’ आजीने बाळकृष्ण बघायला सांगीतलं. ती बघून आली.
‘तो उभा नाहीये आणि मांडी घालून बसला पण नाही. त्याच्या हातात काहीतरी आहे.’ मुलगी.
‘अग त्याच्या हातात लाडू आहे.’ आजी. हातात लाडू आहे, म्हटल्यावर तिला हसू आलं. तिला लाडू भयंकर आवडतात. वातावरण निवळलं !
‘या बाळकृष्णाला उभं रहाता येत नाही, म्हणून हा ‘लंगडा बाळकृष्ण’ आणि याने केलेली एकादशी, ती कोणाची आणि कशी ?’ आई.
‘लंगड्या बाळकृष्णाची एकादशी !’ मुलगी.
‘अग, पण आपल्याला उपवासाला लाडू चालतो का ? नाही चालत ! पण या लंगड्या बाळकृष्णाला चालतो. मग लाडू खाऊन केलेली एकादशी, ती लंगडी एकादशी !’ आई.
पापड, कुर्डया, भजे आणि लाडूसारखे पदार्थ उपवासाला चालत नाही, हा तर मुलीच्या दृष्टीने अन्यायच होता. त्यामुळे उपवासाला हे सर्व चालते, फक्त नंतर आजीबरोबर साबुदाण्याची खिचडी खाल्ली, की पुन्हा उपवास सुरू ! ही ‘लंगड्या बाळकृष्णाच्या लंगड्या एकादशीची’ कल्पना तिला एकदम आवडली.
‘माझी ‘लंगडी एकादशी’ आहे. मी आता ‘लंगडी एकादशीच’ करत जाईन.’ मुलीने जाहीर केले.
‘लहान मुलांसाठीच ‘लंगडी एकादशी’ असते. मोठ्या माणसांसाठी नुसती एकादशी. तिला काही अर्थ नसतो.’ तिची आजी तिच्या नातीला.
‘आण गं, तिला थोडी खिचडी वाटीत !’ मुलीची आजी, तिच्या सूनेला ! मुलीला इतकं काही बरं वाटलं !
त्यानंतर बरीच वर्षे गेली. तिला लंगडी एकादशी अजून आठवते. घटना आणि गोष्टी छोट्या असतात, त्यातून मनाला होणारा आनंद किंवा पडणारे चरे, वेदना, आयुष्यभर पुरणाऱ्या असू शकतात. आपल्या मागची एक पिढी यासाठीच असते, आपल्या पुढच्या पिढीचा सांधा, आपल्याला नीट जोडून द्यायला. सांधा सुटायला नको, त्यांच्या अगोदरच्या पिढीने पण हेच काम केलं असतं ! निरागस जिवाला, अशी अचानक होणारी फसवणूक, पेलवणारी नसते, उन्मळून पडू शकतात ती ! किरकोळ कर्मकांडाच्या मागे लागून, ही उमलती बालमने उध्वस्त करणं बरोबर नाही ! हे मागच्या पिढीला बरोबर समजतं, त्यांचा एका पिढीचा अनुभव असतो.
मध्यंतरी मी ‘लंगडी एकादशी’ शब्द इथं कुठं लिहीला. काहींची या शब्दावर भिवई उंचावली, आणि मग ही जुनी घटना आठवली.

4.10.2019

No comments:

Post a Comment