Sunday, October 20, 2019

न्यायालयासंबंधी आठवण

न्यायालयासंबंधी आठवण
गोष्ट साधारण तीस वर्षांपूर्वीची ! मी आमच्या गांवी वकीली करत होतो. वकीली सुरू करून पाच-सहा वर्षे झालेल्या वकीलांस जेवढे कायद्याचे ज्ञान आणि अनुभव असेल, तितके ज्ञान व अनुभव मला पण होता. नुकत्याच या व्यवसायांत आलेल्या वकीलांस, त्याची लायब्ररी चांगली असावी, ही कोणाचीही अपेक्षा अवास्तवच म्हणायची !
त्यातच त्याच्याकडे काही नवीन काम आले, की मग त्याची लगबग व धावपळ पहावी. काम तर येणे आवश्यक असायचे, कारण त्याशिवाय पोट कसे भरणार ? मात्र आपल्याकडे योगायोगाने, ओळखीने किंवा मुश्कीलीने आलेले काम, चांगल्याप्रकारे तयार कसे करणार ? काम चुकायला नको. पक्षकाराचे जसे नुकसान, तसेच त्याचा विपरीत परिणाम त्या वकिलाच्या भविष्यावर पण होणार, हे ठरलेले ! वकीलाच्या आयुष्यातला हा काळ अत्यंत कठीण, निसरडा आणि त्याच्या आयुष्याला वळण लावणारा असतो. यांतून तो सहीसलामत बाहेर पडला, की पुढील आयुष्यात काळजी रहात नाही.
आमच्या रावेर वकिलसंघाचे एक चांगले होते, की वकिलसंघातील वकिलांची संख्या फार नव्हती. प्रत्येक नवोदित वकिलाकडे जेष्ठ वकिलाचे लक्ष असे. नवोदितास काहीही अडचण असली, तर ती कोणासही विचारण्यास संकोच वाटत नसे, विशेष म्हणजे, ज्याला विचारले असेल, ते जेष्ठ वकील पण मनापासून व खरे मार्गदर्शन करीत. अगदी, दुसऱ्या दिवशी हा विरूद्ध बाजूंचा पक्षकार आपल्याकडे येणार, याची कल्पना असली तरी ! यामुळे केस अवघड झाली, तरी त्याबद्दल कोणासही वाईट वाटत नसे. दोन-तीन वकीलांकडची लायब्ररी चांगली होती. कै. आर. जी. चौधरी, कै. पी. ओ. चौधरी आणि मग कै. पी.एन. चावरे यांची !
कै. चावरे वकील, तर कै. आर. जी. चौधरी यांना नेहमीच म्हणायचे, ‘यांच्याकडची लायब्ररी ही आपल्या बारची आहे. इथं जागा नाही, म्हणून त्यांच्याकडे ठेवली आहे. खरं आहे ना, रामभाऊ ?’ पुन्हा इकडेतिकडे पहात, ‘त्यांनी नाही म्हणावे !’ असे बोलत. यांवर कै. चौधरी वकील पण हसून होकारार्थी मान हलवत.
कोणाकडे पण जाऊन, त्यांना दावा कसा लिहावा, कैफीयच कशी लिहावी, फौजदारी कशी लिहावी, काहीही लिहीतांना त्यांत कोणते मुद्दे यायला हवेत ? काही मुद्दे जास्त स्पष्ट लिहावेत, तर काही का लिहू नयेत वगैरे विचारले जाई, आणि विचारल्यावर सांगीतले जाई. थोडक्यात वकीलांची भविष्यातील पिढी तयार करण्याची जबाबदारी, तेथील वरिष्ठ वकिलांनी स्वत:हून स्विकारलेली होती आणि त्याला जागून, ती जबाबदारी पार पाडत होते. नवोदित वकील पण या संधीचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न करायचे. तिथं त्यावेळी, व्यवसायात असलेली स्पर्धा लक्षात घेऊन पण, तिथं जवळपास निकोप वातावरण होते. त्यामुळे ‘बदलीसाठी कोणते गांव हवे ?’ या विचारणेवर, तिथं यायला न्यायाधीश पण उत्सुक असत.
काल असेच नवोदित वकील मित्र घरी आले होते. बोलताबोलता मी सहज बोलून गेलो, ‘हे पहा, तुम्हाला कायद्यासंबंधी काहीही अडचण असली, पुस्तक हवे असले, संदर्भ हवा असला, तर नि:संकोच येत जा. सुदैवाने माझी लायब्ररी बरी आहे. आता वेगवेगळ्या साॅफ्टवेअर्समुळे काॅम्प्युटरमधे सर्व लायब्ररी सामावली आहे. मला जेवढे काही समजते, तेवढे सांगेन. संदर्भ हवा असला, तर अवश्य देईन.’ यांवर त्यांचा चेहरा प्रश्नार्थक !
‘हल्ली कोणी सांगत नाही. सांगीतलं तर, जाणीवपूर्वक चुकीचे सांगतात.’ त्यांची प्रतिक्रिया !
‘बाकीच्यांची गोष्ट सांगू नका. मी माझ्याबद्दल बोलतोय. मी आज पण सर्वज्ञ नाही. मला माझ्या वरिष्ठांनी मी नवोदित असतांना, जे काही दिलं आहे, मला आज जे काही थोडंफार माहीत आहे, ते पुढे देण्याची माझी जबाबदारी आहे. ती मी पार पाडतोय !’ मी.
खरोखर मोठा गहन प्रश्न आहे, आपल्याजवळ असलेलं विद्याधन, हे जर कोणी, कोणाला द्यायचेच नाही, असं ठरवलं तर ? —- सर्वांनाच एकलव्य बनावे लागेल !
(पोस्ट आवडल्यास ‘शेअर’ करण्यास हरकत नाही.)

31.8.2019

No comments:

Post a Comment