Sunday, October 20, 2019

कोर्टात जाऊ नका !

कोर्टात जाऊ नका !
जळगांवी शाहू काॅम्प्लेक्समधे वरच्या मजल्यावर बऱ्याच वकीलमंडळींची चेंबर्स आहेत. मी पण असतो तिथं, फक्त रविवारी ! आपल्या भागाशी असलेला संबंध तुटू न देता, घट्ट टिकवून ठेवणारे एक कारण ! त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे, औरंगाबाद येथे, आयुष्याची पुन्हा नव्याने सुरूवात करतांना, खंबीरपणे व समर्थ साथ देणारे !
आज बसलो होतो. पक्षकारांची गर्दी होतीच. तेवढ्यात दरवाजाशी एक जोडपं, माणसाच्या हाताशी दहा-बारा वर्षांचा मोठा मुलगा, तर बाईच्या खांद्यावर तान्हुलं ! पेंगुळलेल्या अवस्थेत ! काळासावळा नवरा व गोरीपान बाई ! त्याच्या चेहऱ्यावर तणाव, तर तिचा मलूल चेहरा ! ते सर्व जण दरवाज्याशी रेंगाळत उभे होते. मग माझ्या लक्षात आलं आपल्याकडेच आहेत.
‘या. बसा आंतमधे !’ मी.
‘नाही, यांचे होऊ द्या. आम्ही थांबतो. खाजगीत बोलायचे आहे.’ तो.
‘ठीक आहे. तोपर्यंत बसा.’ मी.
ते सर्व आले आणि आंत बसले. त्याच्या हाताशी असलेला मुलगा मुकाटयाने खुर्चीवर बसला. तो माणूस दुसऱ्या खुर्चीवर अस्वस्थपणे बसला. तिने खांद्यावरच्या तान्हुल्याला आपल्या कवेत घेतले व ती पण खुर्चीत बसली. ती बसल्याबरोबर ते रडायला लागलं. थांबता थांबेना ! इकडे हा माझ्यासमोर बसलेला पक्षकार, त्याची अडचण सांगण्यात रंगात आलेला.
थोडा वेळ गेला. मग लक्षात आले, की तो तान्हुला रडायचा थांबला आहे. माझे सहज तिकडे लक्ष गेले. तिने तिची आणि खुर्चीची पाठ माझ्याकडे व तोंड भिंतीकडे केले होते. मांडीवर तिचे तान्हुलं होतं. माझं जसं लक्ष तिच्या नवऱ्याकडे गेलं, तसं त्याने ‘यांचे आटोपले की मला सांगायचं आहे’ हे सांगीतलं !
‘त्यांचे आटोपलं आहे. तुम्ही सांगा.’ मी.
‘यांना जाऊ द्या.’ तो. त्यांचे आटोपले असल्याने मी त्यांना जाण्यांस सांगीतले. ते पक्षकार निघून गेले. तिचा नवरा समोर येऊन बसला.
‘आमचे लग्न xxxx साली झाले.’ तो. त्याने प्रतिसादासाठी, खुर्चीत माझ्याकडे पाठ करून बसलेल्या व मांडीवर तान्हुले असलेल्या, त्याच्या बायकोकडे तिला हुंकारत विचारले. ती काबरीबावरी होत, उठू लागल्यावर, मी तिला ‘उठू नका’ म्हणून सांगत, ‘तुम्हाला काय सांगायचे ते सांगा’ म्हणून तिच्या नवऱ्याला सांगीतले. तो बऱ्यापैकी शिकलेला असावा.
‘आमचे लग्न सन xxxx साली झाले. आम्हाला दोघांना आता संमतीने घटस्फोट हवा आहे. त्यासाठी आम्ही आलोय !’ तो. मी आश्चर्यचकीत ! दोन्ही मुलाबाळांसहीत माझ्याकडे आले, व्यवस्थित बसले आणि हे काय भलतेच ? मला पटेना, माझा विश्वास बसेना !
‘आॅं ! काय झाले असे ?’ मी. त्याची सांगायची इच्छा दिसेना. एकतर मी खालच्या कोर्टातील कामे शक्यतोवर घेत नाही. आणि असे घटस्फोट मिळवून देण्याचे तर आतापर्यंत एकही नाही. मात्र क्षणभर मनाशी निर्णय केला, कारण समजते का, ते पाहू. जमलं तर दूर करू.
‘आमच्यात कसलेही भांडण नाही. दोघांच्या संमतीनेच घटस्फोट हवा असल्याचा अर्ज करायचा आहे. खर्च येऊ द्या. देईन.’ तो.
‘भांडण नाही, तर घटस्फोट का हवाय ? घेऊ नका. एवढं आयुष्य पडलंय ! सुखासमाधाने रहा. मनांत काही असेल तर काढून टाका ! संशयाने कोणाचेही भले होत नाही. तुमच्या मुलांकडे पहा. त्यांच्या आयुष्याचा विचार करा.’ मी.
‘आमच्या संमतीनेच घटस्फोट हवा आहे.’ तो. त्याने अपेक्षेने तिच्याकडे बघीतले. तिची अवघडलेली अवस्था अजून संपली नव्हती. तिला वळतां येईना. ती आतापर्यंत काहीही बोलली नव्हती, हे माझ्या लक्षात आले.
‘संमतीने हवा आहे. ते मला समजले. पण घटस्फोट घेऊ नका.’ मी.
‘का ? आमची दोघांची पण काही तक्रार नाही !’ तो. त्याने पुन्हा अपेक्षेने तिच्याकडे होकारार्थी उत्तर मिळेल, या अपेक्षेने विचारले. ती काहीच बोलली नाही.
‘तुम्ही घटस्फोट घेऊ नका. तसे काही कारण दिसत नाही. सर्व व्यवस्थित आहे, तर कशाला ?’ मी समजावले.
‘मी तुम्हाला खर्च देईन. तुमची फी देईन !’ तो.
‘तुमचे काम मला नको. मी घेत नाही. जे मला पटत नाही, ते काम मी घेत नाही. तुम्ही या.’ मी.
तो उठला. तिची अवघडलेली अवस्था संपली होती. त्या तान्हुल्याला थोपटत खांद्यावर घेतले. भिंतीकडे तोंड करूनच असल्याने, तशीच उभी राहिली. मग वळली.
‘याला जरा घ्या.’ तिच्या तान्हुल्याला तिच्या नवऱ्याकडे देत म्हणाली. हे मी ऐकलेले तिचे एकच वाक्य ! मग तिने खुर्ची सुलट केली. तिचा चेहरा आता उजळला होता. ते सर्व आॅफिसमधून बाहेर पडले. आता तिच्या हाताशी मोठा मुलगा होता. नवऱ्याच्या खांद्यावर ते तान्हुले झोपी गेलेले होते. त्या जिवाला बिचाऱ्याला कल्पना पण नव्हती, की आपल्या आयुष्याची कसली खेळी, आपले वडील करत आहे, आपल्या आईच्या मूक साक्षीने ! त्या दोन्ही पिलांना कधीतरी समजेल, की आपल्या आयुष्याचा होणारा खेळखंडोबा उधळणारा, हा अचानक कोण अवतरला ! सांगेल त्यांना कधीतरी, त्यांची ही आज उजळलेल्या चेहऱ्याने जाणारी आई ! कदाचित, त्यांचे भाग्य बलवत्तर असेल, तर वडील पण सांगतील !
माझ्या अडीअडचणीच्या काळात, त्या जगन्मातेला माझी अशी परिक्षा का बघावी वाटते, काही समजत नाही ! —- मला खात्री आहे, यदाकदाचित स्वर्गात जर चित्रगुप्त आपल्या सर्वांच्या पापपुण्याचा हिशोब ठेवत असलाच, तर एक गुण माझ्या पुण्य-खात्यात नक्कीच वाढला असेल !

25.8.2019

No comments:

Post a Comment