Sunday, October 20, 2019

सोन्याची पाच बिस्किटे !

सोन्याची पाच बिस्किटे !
काल जरा वेळ मिळाला होता, कोर्टात काम निघण्यास थोडा वेळ होता, तर बऱ्याच दिवसांनी एकाशी गप्पा मारत होतो. तेवढ्यात फोन आल्याचे, कोटाच्या खिशात जाणवले. हाताने त्यांस थांबण्याची खूण करत, मी कोटातून मोबाईल काढला, आणि तो सुरू करून कानाला लावला.
‘नमस्ते साब !’ फोनवरून.
‘नमस्ते !’ मी. मला हे नेहमीचे असल्याने, कोणी नमस्कार केला, तर मी उत्तरादाखल स्वाभाविकपणे नमस्कार करतो. कोणाचा नमस्कार नाकारणे, किंवा त्याची शिष्टासारखी दखल न घेणे, किंवा नमस्कार कोण करते आहे, यांवर तो स्विकारायचा किंवा नाही, हे ठरवणे; असे माझ्या स्वभावात नाही.
‘बडा अच्छा हो गया, साब, आपका फोन लग गया तो । मैं राजस्थानसे बोल रहा हूॅं । देखो, अपने फायदे की बात हैं ।’ फोनवरून. तो सांगायला उतावीळ झालेला वाटत होता, असे मला उगीचच वाटले.
मला बऱ्याच वेळा, कुठूनकुठून फोन येतात. सर्वच जण कोठून बोलतात, ते खरे सांगत नाही. मोबाईलवर ते समजत पण नाही. त्याकडे मी लक्ष पण देत नाही. असा फोन करणाऱ्या बऱ्याच जणांना, फोनवरून सल्ला हवा असतो, किंवा काही वेळा, त्यांना कोणाची तरी बतावणी करून माहिती काढायची असते. त्याची ओळख वाटली, तर मी बोलतो पण ! मात्र जर तात्काळ लक्षात आले नाही, शंका आली किंवा केसबद्दल विचारत असेल, तर मी स्पष्ट ‘नाही’, म्हणून सांगत, प्रत्यक्ष भेटायला सांगतो. मी स्वत:साठी आखलेला नियम ! आता राजस्थानवरून माझा फायदा व्हावा, ही अपेक्षा करणारा, कोण असावा, हे काही माझ्या लक्षात येईना.
‘अरे भाई, क्या बात हैं ?’ मी.
‘कुछ नहीं साब, सोने की पाॅंच बिस्कीट मिल गये, खुदाई करते करते । आपको सस्तेमें मिल जायेंगे । ले लो । आप बोलो, तो मैं कहा आना, आ जाता हूॅं । बोलो ।’ तो फोनवरून.
मी पूर्वीपासून कर्ज हवे का, क्रेडिट कार्ड हवे का, फ्लॅट विक्रीस आहे वगैरे मजकूराचे गोड आवाजात फोन ऐकले होते. त्यामुळे आपल्याला घरदार देण्यास, पैसे देण्यास समाजातील सर्व स्त्रीपुरूष मंडळी आतुर झाली आहेत, वेळ काय, ती फक्त आपण होकार देण्याचीच ! असे मला वाटल्याने, आपल्याकडून काही कमी नको म्हणून, एकदा तर त्यांना मी, त्या विचारणारीस होकार पण दिला; पण ‘मी काय करतो’ हे तिने विचारल्यावर ‘वकील आहे, इथं हायकोर्टात’ हे नेहमीप्रमाणे, खरे ते सांगीतले. हे ऐकल्यावर, मात्र तिकडून फारसे रूख न मिळवता, संभाषण आटोपते घेतले होते. असा चारपाच वेळा सारखा अनुभव आल्याने, ‘वकील आणि असा अनपेक्षीत मिळणारा फायदा’ यांतून विस्तव जात नाही, हे मला समजले होते. त्यामुळे या अनुभवांतून, मी आता हुशार झालो आहे, असा माझा समज झाला होता. आता मी वकील आहे, हे या कानाचे, त्या कानाला समजू द्यायचे नाही, हे मी क्षणात ठरवले.
आता एवढा फोन आला आहे आणि फोनवरून सोन्याचे व्यवहार, कोणी आपल्याशी करतेय, हा प्रत्यक्ष अनुभव आपण घ्यावा, असे पण वाटून गेले. परवाच्याच रविवारच्या वर्तमानपत्रातील, माझ्या राशीचे काळजीपूर्वक वाचलेले भविष्य डोळ्यापुढे तरळून गेले - ‘धनलाभ होणार पण दक्ष रहा !’ भविष्याची प्रचिती येते आहे आता, असा पण एक भावनिक सकारात्मक विचार मनांत तरळून गेला.
‘अच्छा हो गया, आपका फोन आया तो ।’ मी. यांवर तिकडून पण समाधानाचा हुंकार ऐकू आला, असे मला उगाच आपले वाटून गेले.
‘कहा आना, कौनसे पोलीस स्टेशन आना बोलो । नाम बोलो, आ जाता हूॅं वहा ।’ मी. तिकडून यांवर काही उत्तर येण्याऐवजी, लगेच फोन बंद केल्याचा ‘टूंऽऽग टूंऽऽग’ असा आवाज ! तरी शंका नको, म्हणून मी पुन्हा ‘हॅलो हॅलो’ केले, पण उत्तरादाखल एकदाच ‘टूंऽऽऽग’ असे ऐकू येत फोन डेड झाला.
—- चांगली स्वत:हून दारात चालत आलेली, स्वस्तात मिळणारी सोन्याची पाच बिस्किटे पहातापहाता, हातातून गेली. दुनिया सत्त्याची नाही, हेच खरे !

16.10.2019

No comments:

Post a Comment