Sunday, October 20, 2019

बैल गेला अन् झोपा केला —— करू नका !

बैल गेला अन् झोपा केला —— करू नका !
काल संध्याकाळी सात वाजेच्या बातम्या ऐकल्या. त्यावेळी शांतता होती, बातम्या ऐकू आल्या. निवडणुकीचा बाह्य दिसणारा आणि आवाजाने जाणवणारा प्रचार थंडावला, खरा प्रचार सुरू झाला. मग आठवायला लागल्या काही गोष्टी, काही व्यक्ती ! परमेश्वराच्या कृपेने हव्या असलेल्या गोष्टी लक्षात रहाण्याएवढी स्मरणशक्ती मिळाली आहे. त्यामुळे फारसे वय जरी झाले नसले, तरी तुलनेने बऱ्यापैकी आठवणी मन जागे करतात !
आमच्या गांवात काही व्यक्तींचे नांव कुठेही निघाले, की आपोआपच आदराने बोललं जाई. बोलणाऱ्याचा थट्टेचा स्वर असला, तर तो लगेच बदलत असे. आमच्यासारखा पोरगा त्यांचा चेहरा आठवून, जर ‘हॅहॅहॅ’ करायला लागला, तर त्याला जरबेच्या आवाजात दरडावले जाई. या मंडळीत विश्वनाथभाऊ बोचरे, सीतारामभाऊ वाणी, गोविंदभाऊ वैद्य, शारंगधरशेट कासार, डहाळेकाका, भाऊसाहेब देशमुख, वसंतमामा कुलकर्णी, डाॅ. भाऊ आठवले, नारायण डाॅक्टर, काका शिंदे, रूपचंद महाजन ही त्यातील काही आठवणारी नांवे !
आता अलिकडचा मापदंड लावायचा, तर त्यांच्याजवळ कसलीही सत्तास्थाने नव्हती, ना त्यांचे उपद्रवमूल्य काही होते, ना त्यांची झगझगीत श्रीमंती कोणाची डोळे दीपवून टाकत होती. काही तत्कालीन काॅंग्रेसला व तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानणारे, काही आपण बरे आपले काम बरे, या स्वभावाचे ! घरातील असलेली किंवा नसलेली श्रीमंती, त्यांच्याकडे कोणीही गेला, तरी त्यांना मिळणारी सारखीच वागणूक ! त्यांतील एकदोन अपवाद वगळता, काहींचे आर्थिक सामर्थ्य जेमतेमच किंवा ‘आर्थिक आणि सामर्थ्य’ या शब्दांचा त्यांचा दूरान्वयाने संबंध नव्हता. यांच्यासारख्या मंडळींना त्यावेळी मानाने संबोधले जाई, अगदी त्यांच्या अपरोक्ष देखील, याचे कारण, त्यांची समाजात असलेली प्रतिमा, त्यांनी घालून दिलेला समाज चारित्र्याचा आदर्श ! त्यातील कोणीही आज आपल्यांत नाहीत, पण मला आठवतात त्यांची नांवे !
या नावांसारखी असंख्य नांवे, आपणापैकी प्रत्येकाच्या गांवात असलेली, आपल्यापैकी बहुतेकांना आठवत असतील ! यांचीच आणि यांच्यासारखीच नांवे अजून का आठवतांत ? रोज दिसणाऱ्यापैकी आठवणारी नांवे कमी, मात्र ही नांवे का जास्त ? काही जण मला म्हणतील, आणि म्हणतात पण, ‘तुम्ही कशा लक्षात ठेवतात, या आठवणी ? तुम्ही सांगीतल्या, की आम्हाला पण आठवतात.’ यांचे सोपं उत्तर आहे, यांच्या प्रत्येकांत काहीतरी आठवणीत रहाण्यासारखं आहे, ते आपल्यांत असावं असं आपल्याला वाटतंय, पण तितकं काही अजून जमलं नाही, हे जाणवतं, म्हणून आठवण येते.
या प्रत्येकाचा तेथील समाज उभारण्यात काहीतरी सहभाग होता, कसलीही अपेक्षा न ठेवता. सामाजिक कार्य केल्यामुळे, त्याचा वसा घेतल्याने यांची आर्थिक परिस्थिती भक्कम झाली नव्हती, तर कित्येक वेळा, उलट आर्थिक झळ बसली आहे, त्यांचा मौल्यवान वेळ गेलेला आहे, समाजासाठी ! त्यांनी त्यावेळी कसल्याही अपेक्षेशिवाय केलेले काम, हे त्यांचे मोल आहे, की त्यांची आठवण अजून पण येते. कित्येकांनी तर त्यांना बघीतले देखील नसेल, पण घरातील वडीलधारी मंडळी अवश्य सांगतील.
यांनी समाजासाठी केलं, मग असं काही, आपल्याला करता येणार नाही का ? नक्कीच करता येईल. आपल्यापरीने आपण ते रोज यथाशक्ती करत असतोच. मात्र आपल्याला मदत करण्याचे ज्यांचे, लोकशाही स्विकारलेल्या देशाचे नागरिक म्हणून कर्तव्य आहे, त्यांना आपण मदत करायला हवी. त्यांनाच आपण प्रोत्साहन द्यायला हवे. या साठी आपली नकारात्मकता सोडायला हवी. कोणीच काही करू शकणार नाही, अशी अवस्था कधीही होत नाही. आपण यथाशक्ती करू शकतो, ते आपले मतदान करण्याचे कर्तव्य !
निर्लज्ज, असंवेदनशील, ढोंगी, खोटारड्या लोकांना मतदान अजिबात करू नका. तुम्हाआम्हालाच नाही, तर संपूर्ण समाजाला, देशाला सामर्थ्यसंपन्न करण्याची इच्छा असणाऱ्या आणि तशी कृती करणाऱ्या विचारधारेचे पालन करणाऱ्यास मतदान करा. देशाची खऱ्या अर्थाने एकता व संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्याचा वसा घेतलेल्यांना मतदान करा, केवढ तसे ढोंग करणाऱ्यांना कटाक्षाने दूर ठेवा. यासाठी सकारात्मक मतदान हवे, म्हणजे ‘हा हवा’ आणि ‘हा नको’ असे मतदान हवे. तुमच्या अपेक्षेइतके कोणी चांगले नसले, तरी आपल्या सर्वच अपेक्षा काही पूर्ण होत नाहीत. जास्तीत जास्त, किंवा कमीतकमी कोण त्या दिशेने जाईल, हे लक्षात ठेऊन मतदान करा ! ——- अन्यथा गावठी भाषेत सांगायचे, तर ‘बैल गेला अन् झोपा केला’ अशी अवस्था होईल !

No comments:

Post a Comment