Sunday, October 20, 2019

गाणे ओळखण्याच्या भेंड्या !

गाणे ओळखण्याच्या भेंड्या !
शाळा-काॅलेजच्या वयांत, बहुतेक प्रत्येकाला किंवा प्रत्येकीला, जे काही थोडंफार गाण्याचं अंग आहे, त्यामुळे भलभलते भास व्हायला लागतात. ज्या कोणाला होत नसतील, तिथं आपलं पवित्र कर्तव्य समजून, त्यांच्या डोक्यात तसं काहीतरी भरवून दिलं जाते.
मग त्यांना आपण कोणी किशोरकुमार वा महंमद रफी आहोत असे वाटायचे. ज्यांचा आवाज गातांना चांगले गाण्याच्या धडपडीत अनुनासिक होतो, फार वरच्या पट्टीत जात नाही, त्यांना आपण मुकेश असल्याचा साक्षात्कार व्हायचा. ज्यांचा ‘गातांना’ आवाज, योग्य स्वर न लागता, थरथर कापायचा, त्यांना आपण नवोदित ‘तलत महेमूद’ आहोत, असा भास व्हायचा. काहींनी नुकताच गाण्याचा ‘प्रारंभिक’ परिक्षेसाठी क्लास लावलेला असायचा, आठवड्यातून तीन किंवा चार दिवस ! ते तर स्वत:ला ‘मन्ना डे’ समजू लागायचे.
प्रत्येकीची केस तर अजून वेगळी असायची. आवाज जरा टणक व कणीदार असला, आणि गावरान गीते गाण्याची आवड असेल तर ‘सुलोचना चव्हाण’ आपल्यांत वास करत आहे, ही भावना तिच्या मनांत यायची. आवाजाला बऱ्यापैकी फिरक आहे, हे तिला कोणी, कौतुक करायचे, कारण जरा ‘चांगले बोलावे’ या भावनेने सांगीतले, की तिला आपण ‘आशा भोसले’ झाल्याचा साक्षात्कार होई. कोणाच्या आवाजात कारूण्य, विरह उतरले आहे, आणि आवाजाची पट्टी ही, स्वर मोकळा न येता नाकांत येत असला तरी, वरील पट्टीत विहार करायला लागली, की स्वरलता ‘लता मंगेशकर’ आणि आपल्यात काही फारसा फरक राहीलेला नाही, ही आणि अशी मनाची समजूत घातली जाई, किंवा कोणाकडून तरी करून दिली जाई.
अशा गाणाऱ्यांच्या साथीला बसणारे तबलावादक, हे पण त्याच पट्टीचे किंवा दर्जाचे असत. अगदी उस्ताद अहमदजान थिरकवा किंवा पं. किशन महाराज जरी नाही, तरी आपल्याला बऱ्यापैकी वाजवतां येत असून, आपला ताल चांगलाच पक्का आहे, हे त्यांच्या डोक्याने घेतलेले असते. अडचण जी असते, ती गाणाऱ्याची किंवा गाणारीची असते. आपला ताल गातांना चुकू नये, म्हणून हाताने ताल देण्याची सवय असलेला किंवा असलेली गायक-गायिका, केवळ हाताने ताल देत असल्याने, ‘माझा ठेका चुकतो’ असे तबलजींचे म्हणणे असते. तर ‘तबलजी नवशिका असल्याने, आपला ताल चुकू नये, याची काळजी मी घेत आहे’ असे गायक-गायिकेचे म्हणणे असते. यांचा तबला म्हणजे जवळ असलेले टेबल, खुर्चीचे दोन्ही हात असतात.
या अशा एकंदरीत तयार गायक-गायिकांच्या ज्यावेळी ‘गाणे कोणते, ते ओळखा’ अशा भेंड्या सुरू होतात आणि त्यावेळी त्या कार्यक्रमात श्रोते पक्षी प्रेक्षक पण सहभागी होतात, त्या वेळी उडणारी धमाल अवर्णनीय असते. मग असे गाणे ओळखायचे, तर ते शब्दांसहीत न गाता, नुसत्या आकार उकाराने, म्हणजे ‘उ उ डा डा’ वगैरे गुणगुणून, ते ओळखायचे म्हणजे मोठेच धर्मसंकट ! आपल्या डोक्यात काही वेगळं गाणं असतं, तर गुणगुण करणाऱ्याच्या मनांत वेगळेच असतं ! आपण काही ‘हिंट’ द्या म्हटलं, तर आपल्या डोक्यातील गाणं, समोरच्या व्यक्तीच्या मनातलं गाणं आणि प्रत्यक्षात दिलेली ‘हिंट’ यामुळे अजूनच गोंधळ उडतो. ‘हिंट’ ही अजूनच रस्ता चुकण्यासाठी दिलेली असते, असा निष्कर्ष काढावा लागतो.
दिलेल्या एकाच गाण्याच्या ‘हिंट’वरून श्रोते वेगवेगळी गाणी ओळखायला लागले आणि तबलजी या सर्वांपेक्षा वेगळा ठेका, वाजवायला लागला, की समजावे आता ‘भैरवी’ जवळ आली आहे. शेवटी सर्वांचीच बऱ्यापैकी करमणूक झाली, की हा ‘गाणं ओळखण्याच्या भेंड्यांचा कार्यक्रम’ थांबतो.

4.9.2019

No comments:

Post a Comment