आम्ही सूर्यतनया, तापी नदीकाठचे ! भारतातील पश्चिमवाहिनी नद्यांपैकी प्रमुख नदी ! पश्चिम सागराला तीन प्रमुख नद्या मिळतात. एक म्हणजे, ज्या नदीच्या खोऱ्यात आमची संस्कृती जन्मली, बहरली आणि प्रगत झाली, ती हिमालयातून उगम पावणारी सिंधू नदी’, अमरकंटक पर्वतातून उगम पावणारी 'नर्मदा' ! आणि ही सातपुडा पर्वतातातून उगम पावणारी सूर्यतनया तापी !
एकदा नातेवाईकांकडे मध्यप्रदेशातील बैतुल येथे गेलो होतो. तेथून जवळच तेजोनिधी सूर्याच्या दुहितेचा, तापी नदीचा उगम होतो. ते गांव, ‘मूलतापी’ नंतर अपभ्रंश होऊन ‘मूलताई’ नांवाने ओळखू लागले. तिथं मोठं सरोवर आहे. मंदीर आहे. तापी जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाते.
आज अशीच आठवण आली. उत्तर भारतात जवळपास महिनाभर फिरत होतो त्याची ! तिथं पण गंगेचा प्रवाह बघीतला की हात आपोआप जोडले जातात. यमुनेला बघीतलं की कृष्णलीला आठवतात. दक्षिणेला गेलो होतो, त्यावेळेस कृष्णा आणि कावेरी नद्या बघीतल्या.
काय गंमत आहे नाही, खळाळत्या पाण्याने वहाणाऱ्या नद्यांनी आमचे जीवन समृद्ध केले, आणि त्यांच्या उपकाराला आम्ही, न स्मरता त्यांना आम्ही घाण करत आहोत. त्यांचे खळाळणारे प्रवाह थांबवून, त्यांची सांडपाण्याची गटारे करत आहोत. —- निसर्गाला विचारले, की ‘तुझ्या निर्मीतीमधील कृतघ्न निघालेली, तुझी निर्मीती कोणती ? तर नक्की पटकन उत्तर येईल - माणूस !’
20.9.2019

No comments:
Post a Comment