Sunday, October 20, 2019

‘वरच्या भागातील चौरस बंद पुडी’

लहानपणी शाळेत जातांना, शाळेच्या रस्त्यावर अडथळे म्हणून फार प्रलोभने असायची ! त्यांत ओल्या हरबऱ्याचे चणे-चटपटे, खारे आणि तिखट शेंगदाणे, सणसणीत भेळ तयार करण्याच्या पदार्थांचे पारदर्शक डबे वगैरे वगैरे असायचे. त्या लोटगाडीवर घेऊन जाणाऱ्या, या गाड्यांकडे तर बघू नये असे वाटायचे, कारण बाहेरचे पदार्थ घेऊ नये, त्याकडे बघू पण नये. बाहेरचे खाणे चांगले नसते, ही शिकवण ! पण काय व्हायचे, मोह टाळता येतो किंवा नाही, यासाठी बाणेदारपणा दाखवत त्याकडे बघायचे, पण घ्यायचे नाही. ते घेण्यासाठी जवळ पैसे नसायचे, हा भाग वेगळा, पण मोहावर विजय मिळवला, हा आनंद अवर्णनीय असायचा.
अजून एक म्हणजे, असा एक मोठा, कागदी चार्टस्वरूप खेळ असायचा. तो स्टेशनरी-कटलरीच्या दुकानात हमखास दर्शनी भागांत, दुकानाच्या लाकडी दरवाज्याच्या वरच्या भागांत टांगलेला असायचा. त्या कागदी चार्टच्या वरच्या निम्म्या भागांत, साधारणपणे अल्युमिनीअमच्या एक नया पैशाच्या आकाराच्या विविध रंगातील चौरस पुड्या चिकटवलेल्या असायच्या. तो भाग छान छोट्याछोट्या रंगीबेरंगी फरशा शेजारीशेजारी ओळीत लावल्यासारखा दिसायचा. त्याचे पण फार आकर्षण ! अगदी नेम धरल्यासारखी आमची नजर जाईल अशा ठिकाणी, बाहेरच शाळेत जाण्याच्याच रस्त्यावरून जातांना दिसेलच दिसेल, अशा प्रकारे तो कागदी चार्टचा खेळ टांगलेला असायचा. तो बघीतल्यावर शाळेत लक्ष लागायचे नाही.
त्या चार्टच्या खालच्या अर्ध्या भागांत वेगवेगळ्या वस्तू अडकवलेल्या असत. मग त्यात प्लॅस्टीकचा कावळा वाटेल असा हिरव्या रंगाचा पोपट, प्लॅस्टीकचा साधारण मध्यम आकाराच्या लिंबाएवढा चेंडू, काळसर तपकिरी रंगातील छोट्या बनपावाच्या आकाराच्या नेहरूंच्या मूर्तीचा अर्धा पोकळ छापा ! अजून एका प्लॅस्टीकच्या पिशवीत विविध वस्तू असायच्या. त्यात मग आठ-दहा तर्जनीच्या उंचीचे आणि दोन बोटे रूंदीचे तिरंगी झेंडे, मुलींच्या डोक्यासाठीच्या बोटाच्या दोन पेर उंचीच्या प्लॅस्टीकच्या वेगवेगळ्या रंगाच्या पिना, कोणाच्यातरी हातात बसतील का अशी शंका येईल इतपत मोठ्या किंवा छोट्या अशा प्लॅस्टीकच्या बांगड्या, लिमलेटच्या किंवा अस्मनतराच्या गोळ्या आणि अशाच स्वरूपाच्या वस्तू ! ज्याचा कोणालाही व्यवहारात काय उपयोग होत असावा, हे त्या वेळी काय पण आज पण मला समजले नाही.
मात्र त्या वरच्या भागातील चौकोनी पुडी उघडायला मिळायची, त्याची पाच किंवा दहा पैसे अशी किंमत असायची. आपल्याजवळ पैसे आहेत आणि वस्तू पण चांगल्या दिसताहेत, असा योग आला की घ्यावेसे वाटायचे, मग दुकानदाराला पैसे द्यायचे आणि तेथील कोणतीही पुडी उघडायची ! पुडी उघडल्यावर, त्यात एका छोट्या कागदी तुकड्यावर वस्तूचे चित्र किंवा नांव असायचे, मग ते वाचून, खात्री करून, ती नांव किंवा चित्र असलेलेली वस्तू, आपल्याला त्या कागदी चार्टच्या खालच्या भागातून दुकानदार द्यायचा. बहुतेक गोळीच मिळायची, लिमलेट किंवा असमानतऱ्याची ! ते आपल्याला परवडायचे नाही, पण करणार काय ? पाच किंवा दहा पैशाची पुडी उघडल्यावर, ती एक किंवा दोन पैशाची गोळी मिळायची. तेथील चमकदार वाटणारी बक्षीसे मिळायची नाहीत.
चार्टच्या बहुतेक मधल्या भागांतील पुड्यांत बक्षीसे जरा बरी असतात, असा उगाच आपला अंदाज असायचा ! पण मग आपले, त्या दिवशीचे बजेट संपल्याने, दुसऱ्या दिवशीची वाट बघावी लागायची. नंतर पैशाचा योग जमून आला, तर पहावे अन् काय, तर कोणते तरी मोठे बक्षीस कोणाच्यातरी वाटेला गेल्याने, ती जागा रिकामी दिसायची ! आपल्या वाटेस चांगलीचुंगली बक्षीसे अपवादानेच यायची, मग नशीबावर चरफडण्या व्यतिरिक्त काहीही इलाज नसायचा ! एखादे वेळेस आपल्या सुदैवाने जरा बरे बक्षीस निघालेच, तर दुकानदार खट्टू व्हायचा, कारण मोठे बक्षीस चार्टवरून गेले, की कोणी त्या पुड्या घ्यायच्या नाहीत. असे होऊ नये म्हणून, तो दुकानदार तेथे डमी बक्षीसे लटकावून ठेवत असावा, अशी मला आज पण खात्रीची शंका आहे. लिमलेट किंवा असमानतऱ्याची गोळी ठरलेली !
आज मधेच हा खेळ कसा काय आठवावा, तर काही नाही, कशावरून काय गंमत आठवते नाही ? —- बऱ्याच मित्रांच्या इथं फेसबुकवर विनंत्या येतात. त्यांचे प्रोफाईल पहावे, तर ही ‘वरच्या भागातील चौरस बंद पुडी’ आठवली. जी उघडल्यावरच समजणारी, आंत काय आहे ते ! जास्त काय सांगणार ?
कळावे, लोभ आहेच ! वृद्धी व्हावी.

19.7.2019

No comments:

Post a Comment