आपल्या आयुष्यातील मंगल-प्रसंग
मंगल सुराने साजरा करणारा - गुरव !
दिवाळीच्या सुटीत आजोळी
जळगांवला आलो, की मला एका गोष्टीचे कायम नवल आणि गंमत वाटत आली आहे. सकाळी उठलो की
स्नानापूर्वी आमच्या अंगाला आजी सुवासिक तेल लावायची, मगच स्नान करावे लागे. त्यानंतर
दिवाळीचा फराळ सुरु असायचा, आजोबा पूजा करत असायचे आणि बाहेर ओट्यावर, दोन-तीन जण यायचे.
आम्ही कुतूहलाने बघतो तर काय ? एकाजवळ वाजंत्रीवाल्याजवळ असायचे संबळ, दुसऱ्याजवळची
स्वरपेटी, तिसऱ्याच्या खांद्यावर सैनाच्या कापडाची झोळी असायची. बसल्यावर झोळीतून,
बांबूच्या बारीक काड्याची छोटी उघडी संबळ काढायचा, मूठभर बेलपत्र त्यांत देऊन 'आंत
आजोबांना दे' म्हणून सांगायचा ! ते आंत घेऊन येतो, तोवर आतमध्ये 'प्याsssआ, फूssss'
असे सूर ऐकू यायचे.
'प्रभाकर आलेला दिसतोय.
देसकार वाजवतोय.' आजोबा म्हणायचे.
मी तातडीने बाहेर यायचो,
तोवर स्वरापेटीवाल्याने सूर धरलेला असायचा, आपल्या तोंडात सनईसारखेच पण एकच सूर येणारे
वाजवत असायचा. त्याला 'भोंगा' म्हणतात, हे नंतर समजले. संबळवाल्याने त्याच्या गोलाकार
वळविलेल्या लाकडी काड्यांनी संबळावर 'ढम्म टिंगटिंग' वाजविले असायचे. सनईवाला ऐटीत
आपली बोटे सनईवर धरून कानाला गोड वाटेल, असे काही वाजवायला सुरुवात करायचा. मी त्या
बांबूच्या छोट्या संबळीत धान्य घेऊन यायचो. आजी त्यांना बसवायची, दिवाळीचे फराळाचे
द्यायची. गंमत वाटायची, आजोबाला विचारायचो, 'हे आता येऊन का वाजवतात ? कोणाकडे लग्न
तर नाही.'
'अरे, हे गुरव ! दिवाळीला
येतात. मंगल वाद्य वाजवतात. त्यांचा मान आहे तो.' आजोबा सांगायचे. आजोळी जाणे होईनासे
झाले तसे, घरी रावेरला पण हाच अनुभव ! नाल्यावर आसपास गुरव मंडळी होतीच ! त्यांचे तबला,
वाद्ये बनविण्याचे काम !
आपल्या सुख-दुःखाच्या
क्षणी आपल्यासोबत सर्व समाज असावा, या भावनेने आपल्या पूर्वजांनी काही सण-उत्सव रूढीपरंपरांच्या
गोफात बांधले आहेत, ते कौतुकास्पद आहेत. आपला घरातील कोणताही मंगल क्षण आपल्याला साजरा
करायचा असेल, तर वाजंत्रीला गुरव हवाच ! वाजंत्रीचा आवाज कोठून आला की शेजारपाजारचे
तिथं डोकावणारच !
'काय साखरपुडा का रुपया-नारळ
का दोन्ही ? या कानाचा पत्ता, त्या कानाला लागू दिला नाही.' ते म्हणणारच ! मात्र आता
याचा राग येत नसे.
'म्हैस जोपर्यंत पाण्यांत
आहे, तोपर्यंत काही बोलू नये.' त्या घरातील माणूस सांगायचा, 'ते जाऊ द्या. आता आले,
तसे टेका घटकाभर ! पोरीला आशीर्वाद देऊन जा ! पानसुपारी घेऊन जा.' हे म्हटल्यावर, आपल्या
अंगाखांद्यावर खेळलेली, आपल्या डोळ्यासमोर लहानाची मोठ्या झालेल्या पोरीला, आशीर्वाद
न देता जायचे, हे त्याला पण पटायचे नाही. त्याच्या मनांतील खोलवर रुजलेला बाप, आपला
वैयक्तिक मानापमान बाजूला ठेवायचा.
'तुम्ही विसरला, पण मी
आलो ना ? आता पुढच्या आमंत्रणाची काही गरज नाही, घरचेच कार्य आहे.' असे म्हणत शेजारी
कार्यक्रमभर मदत करत थांबायचा.
गुरव ही समाजाला सेवा
पुरविणारी एक जात आहे, आणि सेवा पुरविणे हाच व्यवसाय बनून गेला होता. गुरवांचा व्यवसाय
हा मुख्यतः अर्चक, पूजाअर्चन या स्वरूपाचा मानला गेला आहे. गुरव या शब्दाची व्युत्पत्ती
काय असे जर कोणी विचारले, तर वेगवेगळी मते आढळून येतात. एक म्हणजे, संस्कृत शब्द 'गुरु'
या शब्दापासून अनेकवचनी म्हणजे 'गुरव' ! महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशांत 'गुरव', तर कर्नाटकांत
'गोरव' आणि गुजरातमध्ये 'तपोधन ब्राह्मण' या नांवाने हे ओळखले जातात.
भगवान शिवाच्या, महादेवाच्या
पूजेचा मान, अधिकार हा परंपरेने आणि समाजाने मान्य केलेला आहे, त्या बदल्यांत गावकरी
त्यांना दरसाल काही धान्य, वार्षिक मानधन देत असत. काही ठिकाणी महादेवाची पूजाअर्चा
नीट व्हावी म्हणून मंदिराच्या किंवा अर्चकाच्या नांवाने शेतीबाडी पण दिलेली असे. त्या
उत्पन्नातून मंदिराची पूजाअर्चा आणि इतर खर्च करावा, अशी अपेक्षा असे. संत काशिबा गुरव
हे गुरव समाजातील थोर संत होऊन गेले. संत सावंत माली आणि संत काशिबा गुरव हे चांगले
मित्र होते. शेतात काम करता करता, संत सावंत माळींना जे काही अभंग सुचायचे, ते लिहीण्याचे
मोलाचे काम संत काशिबा गुरव यांनी केले, हे आपल्या समाजावर फार मोठे उपकार आहेत. संत
काशिबा गुरव यांचे मंदिर पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे मंदिराजवळ आहे.
श्रावणात भगवान शिवाच्या
पूजेसाठी, अत्यंत अल्प मोबदल्यावर किंबहुना विनामोबदला, घरोघर बेल, पत्री वाटणे असो
किंवा आता, विवाहप्रसंगी आता घरोघर वाजणाऱ्या बँड या रणवाद्यात, जवळपास लुप्त होत चाललेले
हे मंगलवाद्य, म्हणजे सनई, परंपरा म्हणून का होईना, पण प्रत्येक गावांत टिकवून ठेवली
आहे, ती आमच्या गुरव बांधवांनी !
1.9.2019

No comments:
Post a Comment