Sunday, October 20, 2019

कै. आभासकुमार गांगुली खांडवेवाला उर्फ किशोरकुमार !

कै. आभासकुमार गांगुली खांडवेवाला उर्फ किशोरकुमार !
केव्हा कशावरून कसली आठवण येईल, आणि कोण आठवेल ते सांगता येत नाही. मी जिथं रहायचो, म्हणजे रावेरला, तिथं जवळचं मोठं गांव म्हणजे जळगांव ! आमचा जिल्हा जळगांव ! बहुतेक सर्वसाधारण मध्यमवर्गाची खरेदी, डाॅक्टर, शिक्षण वगैरे जळगांवला व्हायची. काही मोठी लग्नकार्याची खरेदी करायची असेल तर मात्र सर्वसाधारण मध्यमवर्ग पण वळायचा, तो इंदोरला ! इंदोर हे तसं, मराठमोळा तोंडावळा असलेलं मराठी संस्थान ! तिथं महाराष्ट्रापेक्षा मध्यप्रदेशांत तुलनेने स्वस्ताई ! मध्यमवर्गाला, म्हणजे वास्तविक ज्यांचा खर्च नेहमीच जास्त असतो, मात्र त्याला काळजी असते, ती आपली जमा जास्त आहे, हे जगाला दाखवायचे असते. हे दाखवण्याची धडपड करण्यांत खूप काही गमावले जाते, काही वेळा थोडंफार कमावले पण जातं ! रावेरवाल्यांना, ते महाराष्टातील असले तरी सध्याच्या मध्यप्रदेशातील बुरहानपूर, खांडवा, इंदोर, ग्वालियर ही गांवे जवळची वाटतात. कधीकाळी आपले बापजादे पोटापाण्यासाठी गांव सोडून, गांवोगांव फिरले होते, त्यावेळी या गांवानी त्यांना आश्रय दिला होता. आजपण येथील मंडळींचे या मराठी मातीवरचे प्रेम कमी झाले नाही.
आपल्याला इंदोरला जातांना, जावे लागते ते खांडवा या गांवावरून ! हो, त्याचेच ते गांव ! आपल्या गांवाला, आपले नांव सांगतांना कधीही न विसरणारा हा - आभासकुमार गांगुली खांडवेवाला ! याचे घर आहे इथं खांडव्याला. अजून आहे. जपून ठेवले आहे. खांडव्याच्या गोखले कुटुंबियांनी, कुंजलाल गंगोपाध्याय यांना बंगाली माणसाला, वकील म्हणून आपल्या गांवी, तत्कालीन मध्यभारत प्रांतातील खांडवा येथे बोलावले. त्यांना तीन मुलं - अशोककुमार, आभासकुमार आणि अनुपकुमार ! मग हे गांव त्यांचेच गांव झालं ! ते गंगोपाध्याय म्हणजे गांगुली कुटुंब मग ‘खांडवेवाला’ झालं !
केव्हा शांत बसलो असलो किंवा मनाला शांत वाटावं असं वाटलं, की मग काही गाणी ऐकावी वाटतात. दु:ख दूर नाही होत, समस्या नाही सुटत, ही गाणी ऐकून; पण फुंकर तर घातली जाते, आपल्या दु:खावर ! आपलं दु:ख कोणी ऐकणारं आहे, की दु:ख हलके वाटायला लागते. ते पेलण्याची ताकद आपल्यात आहे, असं आपल्याला वाटायला लागतं. - आणि खरं सांगतो, आपल्यात ताकद येते, आंतील असलेली शक्ती जागृत होते. हे सामर्थ्य सुरांचे, त्या संगीताचे ! आपलं मन मोकळे व्हावं, मनातील अभ्र दूर व्हावीत, तर ऐकायला वाटणारा आवाज पण ह्रदयाला हात घालणारा, मनाची तार छेडणारा आणि म्हणून निकोप, मोकळा हवा ! नितळ पाण्यासारखा हवा ! जी भावना त्यात मिसळाल, तो रंग होईल तिचा !
आज आठवला, तो गांवाजवळचा हा कलंदर माणूस आणि त्याची असंख्य गाणी ! विनोदाची झाक असलेली - एक भिगी भिगी रातमें, एक चतुर नार करे शृंगार आठवावीत, का दिग्गज शास्त्रीय गायकीला तसूभर पण कमी पडणार नाही अशी - मेरे नयना सावन भादो, फिरभी मेरा मन प्यासा, हमें तुमसे प्यार कितनी, ही आणि यासारख्या रचना असोत. हा कलंदर कलाकार, खट्याळ, खोडकर गाणी म्हणतो, त्यावेळी तर गाणी ऐकतांना प्रसंग डोळ्यांसमोर येतो, ते - रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना, तेरे चेहरेसे नजर नहीं हटती, कांची रे कांची रे, ही गाणी असोत.
का वाटते सांगता येत नाही, पण याची करूण रसातील गाणी त्याच्या ह्रदयाच्या अगदी तळातून ढवळून वर आली आहे, असं वाटतं. आपल्या किंवा याच्या डोळ्यात आता आसवं जमतील की काय असं वाटू लागतं. कित्येक गाणी आहेत याची, मन अगदी सुन्न करणारी, ह्रदय गलबलून टाकणारी - करवटें बदलती रहे सारी रात हम, तेरे मेरे मिलन की ये रैना, चिंगारी कोई भडके, दिये जलते हैं फूल खिलतें हैं किती सांगावीत ?
मात्र एक गाणं या ‘खांडवेवाल्या गांगुलीचे’ म्हणजे आभासकुमार गांगुली खांडवेवाला याचे, हो तोच ! आपण सर्व त्याला ‘किशोरकुमार’ म्हणून ओळखतो ! मनांत रूतून बसलंय - ‘चोर मचाये शोर’ या चित्रपटातील ‘घुंगरू की तरह बजता ही रहा हूॅं मैं’ हे रविंद्र जैन यांचे गीत आणि संगीत !

4.8.2019

No comments:

Post a Comment