Sunday, October 20, 2019

आधा है चंद्रमा, रात आधी

आधा है चंद्रमा, रात आधी
आता नुकतीच आकाशवाणी औरंगाबादवर जुन्या हिंदी चित्रपटातील गाणी लागली होती. जुन्या गीतांचा गोडवा काही औरच आहे. त्यातलं मालकंस रागावर आधारलेलं एक गाणं होतं, ‘आधा है चंद्रमा, रात आधी’ ! हे ‘व्ही. शांताराम’ यांच्या चित्रपटातील ‘संध्या आणि महीपाल’ यांवर चित्रित केलेले, ‘नवरंग’ या चित्रपटातील हे अप्रतिम गीत ! गीत आहे, पं. भरत व्यास यांचे, तर संगीत होतं, कै. सी. रामचंद्र म्हणजे रामचंद्र चितळकर यांचे ! गायलं आहे, पहाडी आवाजाचा ‘महेंद्र कपूर’ आणि अष्टपैलू व चतुरस्त्रपणे सर्व गीतप्रकारांत संचार करणारी गायिका ‘आशा भोसले’ यांनी !
कै. सी. रामचंद्र यांनी केवळ आपल्या संगीतावर गाजवलेले चित्रपट बरेच सांगता येतील ! ‘ये जिंदगी उसीकी हैं’ म्हटल्यावर कै. सी. रामचंद्र आठवतात, ‘अनारकली’ हा चित्रपट आठवतो; पण चित्रपटातील काय आठवते ?
या सोबत एक मात्र आठवलं - गाण्यातील आपल्या कर्तृत्वाने, आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या, या दोन भगिनी, दोन उंच संगीत-शिखरे, लता मंगेशकर आणि आशा भोसले ! यांच्या सोबत कै. सी. रामचंद्र यांची वेगवेगळ्या काळात जी गीतं गाऊन घेतलीत, त्यातलं कोणतं, डावं आणि कोणतं उजवं, कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ, हे कोण सांगणार ?
काही वेळा आपलं उगीच वाटते, कै. सी. रामचंद्र आणि लता मंगेशकर यांच्यात दरी निर्माण झाल्याने आपण अजून उत्तमोत्तम गाण्यांना मुकलो, का त्यामुळे आशा भोसले यांचे गायनातील सव्यसाचीपण अनुभवायला आले ? — त्यांची एकेक गाणी ऐकावीत, उत्तराच्या जवळ जाणं तर दूर, पण ते अजून कठीण होत जाते !

17.8.2019

No comments:

Post a Comment