Sunday, October 20, 2019

पं. रमेश कानोले यांच्या नव्वदीपूर्ती निमित्ताने !

पं. रमेश कानोले यांच्या नव्वदीपूर्ती निमित्ताने !
काही व्यक्ती या खूप अलिकडे जरी भेटलेल्या असल्या, तरी आपल्याला वाटते, की यांची आपली ओळख तर खूप जुनी आहे, दृढ आहे. त्यातील आज दोन नांवे सांगता येतील, इथं फेसबुकमुळे परिचय झालेले, आकाशवाणीवरील निवेदक, श्री. मंगेश वाघमारे आणि श्री. मंगेश वाघमारे यांच्यामुळे ज्यांचा परिचय झाला, ते श्री. धनंजय जोशी ! दोन्ही जण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत प्रेमी ! मला पण आईकडून संगीताचे बाळकडू मिळालेले. अर्थात, श्री. मंगेश वाघमारे यांच्याबद्दल म्हणता येईल, की ते आकाशवाणीशी संबंधीत असल्यामुळे, आपल्याच परिवारातील व्यक्ती, जरा उशीरा समजली. मात्र त्यांनी जो, श्री. धनंजय जोशी यांचा माझ्याशी परिचय करून दिला, हा आणि याचे महत्व मी आयुष्यात विसरू शकणार नाही. एका वाक्यात सांगतो — श्री. धनंजय जोशी यांनी माझ्या आईला, तिच्या आयुष्यातील शेवटच्या संगीत सभेतील गायन ऐकवले, आपले स्वत:चे !
मध्यंतरी श्री. धनंजय जोशी यांचा निरोप आला, ‘माझे संगीताचे गुरू पं. रमेश कानोले यांचा त्यांच्या ९० वर्षेपूर्ती बद्दल आम्हा शिष्यमंडळींनी दि. १५ सप्टेंबरला औरंगाबाद येथे सत्कार ठेवला आहे. तुम्ही दोघं अवश्य यायचे आहे. कोणतीही सबब न सांगता.’ मला रविवार हा माझ्या कामासाठी टाळता येत नाही, हा माझा इथं आल्यापासूनचा नियम ! मात्र काही संबंध असे जुळतात, काही कारणं अशी असतात, आपली अडचण पण सांगता येत नाही. मला कल्पना होती, त्या कार्यक्रमाच्या दृष्टीने आपली उपस्थिती किती महत्वाची होती, किंबहुना नव्हती याची ! मात्र माझ्या आईची, प्रत्यक्ष संगीत सभा ऐकवण्याची इच्छा पूर्ण करणाऱ्याचे निमंत्रण डावलता येणार नव्हते. मी डावलले असते, तर केवढ्या आनंदाला मी मुकलो असतो, हे तिथं हजर राहिल्यावरून समजले.
मराठवाड्यातील नांदेडचे असलेले पं. रमेश कानोले, हे वयाच्या नव्वदीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवतात, आणि या वयात पण मजबूतीने गाणे गातात, हे पाहून थक्क व्हायला होते. परमेश्वर अशी माणसं, या जगात फक्त गुरू म्हणूनच पाठवत असावा. सुरुवातीची जी काही शिष्य म्हणून निभावली असतील तेवढीच, बाकी आयुष्यभर त्यांनी स्वत: स्वत:चेच शिष्यत्व पत्करून, विचार, मनन व चिंतन करून आपले ज्ञान वाढविले, आणि ते इतरांना ज्ञान दिलं. त्यांचे गुरू झाले.
या कार्यक्रमाची सुरूवात, ‘जय जगदीश हरे’ या पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी संगीत दिलेल्या प्रार्थनेने झाली. प्रसिद्ध प्रार्थना ! सर्व लहानथोर विद्यार्थी, ज्यावेळी एका रांगेत त्या परमेश्वराची प्रार्थना म्हणायला उभे राहिले, आणि खरं सांगतो, अंगावर रोमांच उभे राहिले. मला माझ्या आईची शिकवणी आठवली. सर्व विद्यार्थी प्रार्थना म्हणत आहेत, ती समोर बसली आहे. एकदम मी त्या घरगुती वातावरणांत गेलो, आणि कार्यक्रम मग माझ्या संपूर्ण घरचाच बनून गेला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - सौ. वंदना टाकळकर यांनी केले. प्रास्ताविक केले, श्री. बी. टी. देशमुख यांनी. गेल्या दोनअडीच वर्षांपासून तयारी सुरू होती. आपल्याला शिकवलेलं आपल्या गुरूंना समर्पित करून, त्यांच्यासमोर सेवा समर्पित करण्याची इच्छा, ही प्रत्येकाची होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्री. संदीप घोडेकर यांचे गायन झाले. त्यांनी सकाळी गायला जाणारा भैरव राग म्हटला. त्यानंतर एकेक विद्यार्थ्यांनी आपली सेवा सादर केली त्यात, शर्मिला भंगाळे यांनी ‘बावीस वर्षांनी मी सरांसमोर म्हणतेय’ म्हणत एक भजन - ‘जय जय दत्तगुरू माऊली’ हे म्हटले. त्यानंतर पूर्वाश्रमीच्या हेमलता देशमुख आणि आताच्या सेलू येथील सौ. हेमा कुलकर्णी, यांनी ‘पस्तीस वर्षांनंतर भेट होते आहे सर्वांची’ अशी भावना व्यक्त करत ‘दर्शन दे नंदलाला’ हा अभंग म्हटला. यानंतर पूर्वाश्रमीच्या मनिषा देशपांडे, आताच्या सौ. मानसी देशपांडे यांनी अहिर भैरव हा राग म्हटला. आपली भावना व्यक्त करतांना, ‘सर मला मानसकन्या मानतात. त्यांच्याकडे शिकले नसते तर, सामान्य गृहीणी राहिली असते. विनामोबदला शिकवणारे मिळायला भाग्य लागतं.’ यानंतर पं. रमेश कानोले या कार्यक्रम उत्सवमूर्तींवर रचलेले, काव्य श्री. बी टी देशमुख यांनी सादर केले. हेच गीत अहीर भैरव यांत सौ. मानसी देशपांडे यांनी सादर केले. यानंतर पूर्वाश्रमीच्या जयश्री विडेकर व आता सौ. जयश्री कुलकर्णी यांनी, ‘वेढा रे वेढा पंढरी’ हा अभंग सादर केला. त्यानंतर कु. सायली दीक्षित हिने, ‘निसदिन बरसत नयन हमारे’ हे भजन सादर केले.
कार्यक्रम सुरू असतांनाच पं. नाथराव नेरळकर आले. त्यांनी उत्सवमूर्ती पं. रमेश कानोले या आपल्या गुरूबंधूला नमस्कार केला. त्यांच्या शेजारी बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
यानंतर क्षितीजा सहस्त्रबुद्धे यांनी बिभास राग गायला. यांची मावशी ही पं. रमेश कानोले यांची पहिल्या काही विद्यार्थिनींमधील ! नंतर श्री. सुरेश मेगदे यांनी, ‘दर्शन दियो जिअरा तरसे’ हे भजन म्हटले. यानंतर श्री. हेमंत खडकीकर यांनी काकूंची आठवण सांगत, ‘चार वर्षे सहवास हा कुटुंबाचा सदस्य होता. सरांची आज्ञा म्हणून गातोय. सवय राहिली नाही.’ सांगत, ‘नभासी या आले पर, उडू लागले सत्वर, पंढरीच्या वाटेवर’ हे भजन म्हटले. यानंतर मंजुषा देशमुख यांनी, ‘नरवर कृष्णासमान’ हे नाट्यगीत म्हटले. नंतर श्वेता देशपांडे यांनी नटभैरव हा राग म्हटला. नंतर तनुजा देशपांडे या पहिल्या बॅचमधील विद्यार्थिनीने, ‘वद जाऊ कुणाला शरण’ हे नाट्यगीत म्हटले. यानंतर पूर्वाश्रमीची संगीता कानोले आणि आता सौ. संगीता आचार्य, पं. रमेश कानोले यांची कन्या, ‘त्यज रे अभिमान, जान गुणीयनको’ हा सुंदर ख्याल म्हटला.
नंतर पं. रमेश कानोले यांचा सत्कार, घरगुती स्वरूपात सर्व विद्यार्थिनींनींकडून दीपज्योतींनी, त्यांच्या साक्षीने औक्षण झाले.
श्री. मंगेश वाघमारे यांनी नंतर आपले मनोगत व्यक्त केले. त्यात सांगितले - आमचे रंजन करणारे व आम्हाला पोसणारे हे संगीत आहे. आम्हा श्रोत्यांवर यांचे ऋण आहे. शिक्षक किती मोठा, तर ‘तुम्ही शिष्य किती घडवले आहेत ?’ हे पहा. हे कार्य म्हणजे यज्ञकर्म आहे. हे येथील गाणारे शिष्य आहेत. एकच प्रार्थना करतो, जीवेत शरद: शतम्’ या मराठवाड्याची संगीत परंपरा समृद्ध होवो, ही भावना व्यक्त केली.
यानंतर मराठवाड्यातील प्रसिद्ध संगीतज्ञ, गायक पं. नाथराव नेरळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गुरूंचे स्मरण करतो. कै. अण्णासाहेब गुंजकर यांची आठवण येते. मारू या अर्थाने मारूबिहाग म्हणत, हे गाणं यांच्याकडे आईकडून आलं असावं, असे म्हणाले. गुरूकडे काम करण्यातला आनंद सांगता येणार नाही. जगण्याची मजा आमच्या श्वासात गाणं आहे तोपर्यंत आहे, ही भावना व्यक्त केली.
यानंतर सत्कारमूर्ती पं. रमेश कानोले यांनी सत्काराला उत्तर दिलं. अण्णासाहेबांनी खूप दिलं, कुठं जायचं काम पडलं नाही, म्हणून सर्वांच्या समोर दोन शब्द सांगता आले.
श्री. मारुती पाटील यांचे स्वागत झाले. सौ. जयश्री कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.
यानंतर सूरमणी श्री. धनंजय जोशी यांनी चारूकेशी हा राग अप्रतिमपणे म्हटला. आपल्या भावना व्यक्त करतांना, ‘गुरूंचा सर्वात जास्त सहवास मला लाभला. नाट्यसंगीत या क्षेत्रात तर मला ढकललं.’
श्री. प्रसाद यांनी आपले विचार मांडले. यानंतर पं. रमेश कानोले यांचे जावई, प्रसिद्ध हार्मेनिअम वादक, श्री. श्रीनिवास आचार्य यांचे अप्रतिम हार्मोनिअम वादन झाले. त्यांनी राग गुणकली वाजवला.
यानंतर उत्सवमूर्ती, सत्कारमूर्ती पं. रमेश कानोले हे गायला बसले. ‘गाना सुनना हैं तो महफीलमें आओ, रियाज शागीर्दके लिए होता है । गाणं सोळा वर्षाचे व्हावं याची प्रार्थना करा, म्हणत त्यांनी या वयाला दूर सारत अविश्वसनीय, सुंदर व दमदारपणे सांगता केली.
सर्व विद्यार्थ्यांनी सादर केलेली गायनरूपी सेवा ही मनापासून होती, हे फक्त गाण्यातूनच नाही, तर त्यांच्या वागण्यातून पण जाणवत होते. कार्यक्रमांत साथीदार होते, हार्मोनियम - श्री. सिद्धार्थ कर्वे, सौ. तनुजा देशपांडे, तबला - श्री. दत्तानंद देशमुख, श्री. बी. टी. देशमुख, श्री. महेश कानोले
हे घरगुती वातावरणांतले कार्यक्रम बघीतले, की बरं वाटतं ! तेजाच्या रूपातील ज्योतीने आपल्या गुरूंचे औक्षण, विद्यार्थी करतात, ते सद्भावना, ऋण व्यक्त करण्याची पद्धत असते. ती कृती सांगत असते, त्या उत्सवमूर्तीलाच नाही, तर सगळ्या प्रेक्षकांना, की - तुम्ही दिलेल्या ज्ञानाच्या प्रकाशात, हा जीवनाचा अंधारमय रस्ता आम्ही, इथवर पार केला. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. आमच्या आयुष्यात कायम तुमच्या ज्ञानाचा प्रकाश द्या - ही विद्यार्थ्यांची मागणी असते. त्यांचे आर्जव असते, म्हणून परमेश्वराजवळ गुरूंच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करायची असते. भगवंताजवळ याचना करायची असते. आपल्या संस्कृतीने हेच शिकवलंय, कृतज्ञ रहा ! कृतघ्न होऊ नका !
(पोस्ट आवडली असेल तर शेअर करण्यास हरकत नाही)

16.9.2019

Image may contain: 1 person

No comments:

Post a Comment