Sunday, October 20, 2019

न्यायालयातील अनुभव

न्यायालयातील अनुभव
नवोदित वकिलाने नुकतीच वकीली सुरू केलेली असली, पाठीशी फारसा अनुभव जमा नसला, की प्रत्यक्षात न्यायालयांत काम करतांना उडणारी त्रेधातिरपीट अवर्णनीय असते. काही वेळा तर परिस्थिती अशी असते, की वकीलापेक्षा पक्षकार हा जास्त अनुभवी असतो. अनुभवी पक्षकार, हा कोणत्या कामाला, कोणता वकील लावावा, हा अभ्यास करून आलेला असतो. यांत थोडे वाचतात, ज्यांच्या घरांत पूर्वीपासून वकिली चालत आलेली आहे. एखाद्या पक्षकाराने, आज याने काम आपल्याकडे दिले, म्हणजे नंतर देखील तो, कायमच आपल्याकडेच काम देईल असे नसते. अशावेळी योगायोगाने पक्षकार जर चांगला असेल, तर ठीक ते बहुदा वकील बदलवत नाही; अन्यथा अनुभवी पक्षकार (वाईट अर्थाने), हे नवीन वकीलांना अक्षरश: लुटतात. ते बिचारे ‘गरजवंताला अक्कल नसते’ या म्हणीचा जीवनांत कायम उपयोगी पडेल असा अनुभव घेत असतात, अर्थात हा मिळालेला अनुभव ते योग्य काळाने, योग्य त्या व्यक्तींना पण वाटतात. हा अनुभव कमीजास्त प्रमाणात सर्व वकीलांना आलेला असतो आणि पक्षकारांना पण आलेला असतो, अर्थात काही कबूल करतात, तर बरेच कबूल करत नाहीत. जाऊ द्या, ‘पेरले ते उगवते’ हे तत्व सिद्ध करते, हा अनुभव !
मला सुदैवाने वाईट असे, फार कमी अनुभव आले. त्यात कदाचित आमच्या कुटुंबाचा गांवात असलेला परिचय व प्रतिमा, माझ्या स्वभावातील सरळपणा (?) हा जबाबदार असावा. (वकील सरळ असतात का, अशी शंका ज्यांना येईल, त्यांना वाईट वाटू नये, म्हणून ‘सरळपणा’ हा शब्द सरळपणाने लिहून, कंसात प्रश्नचिन्ह दिले आहे. कोणताही कंस सोडवून, कोणीही उत्तर नाही काढले, तरी चालेल. वास्तविक हीच अपेक्षा आहे.) माझ्याकडे असलेला वारसा, हा आमच्या काकांपासून, तथा अनुभव हा रावेरला कोर्ट आल्यापासून चालत असलेला कारकून, श्री. पंढरीनाथ श्रावक यांचेकडून आला असल्याने, हा न येणाऱ्या अनुभवास या पण गोष्टी कारणीभूत असाव्यात. आमच्या गांवचा ‘बार’ म्हणजे ‘वकीलसंघ’ हा तर चांगला आणि स्वतंत्र विषय आहे. माझ्यावेळी तिथं एका कुटुंबातील घटकांप्रमाणे सर्व वकील मंडळी असायची. असो.
आपण नवीनच वकीली सुरू केली, की लगेच आपल्यापुढे पक्षकारांची गर्दी असावी, त्यांच्या कामाचा समोर ढीग पडावा आणि मग — आपल्या मनाप्रमाणे आपल्याला पैसे मिळावेत, ही अपेक्षा जरी स्वाभाविक असली, तरी हे बहुदा स्वप्नरंजन ठरते. प्रत्यक्षात तसे होत नाही. आपल्याला जरी वाटले, की आपल्याला खूप काही येते, बराच कायदा समजतो, तरी जनतेला, आपल्याला काय येते, हे सर्व समजते. (इथं मी, ‘मांजर जरी डोळे बंद करून, दूध पीत असली आणि तिला वाटते, की आपल्याला दूध पितांना कोणी पहात नाही; पण सर्व पहात असतात.’ हे उदाहरण देणार नाही. कारण बसलेली तिच्या पाठीवरील काठी, सर्व काही सांगून जाते.)
नवीन वकीलांना स्वतंत्रपणे चालवायला अशी कामे कमी येतात. याचे स्वच्छ व स्पष्ट कारण, त्यांचे असलेले कायद्याचे कमी ज्ञान, अपूर्ण अनुभव आणि सोबतच, त्यामुळे पक्षकारांचा त्यांच्यावर असलेला अपूर्ण विश्वास ! कारण आपले कायद्याचे शिक्षण घेत असतांना मिळालेले व आपण मिळवलेले ज्ञान, हे न्यायालयांत प्रत्यक्ष काम करतांना, फार काही विशेष कामास येत नाही. मात्र त्या ज्ञानाचा उपयोग करून, आपल्याकडे आलेली केस, कशी व्यवस्थित मार्गी लावता येईल, हे लवकरात लवकर समजणे, हे यश लवकर मिळण्याचे प्रमुख कारण आहे.
यासोबत अजून एक महत्वाची किंवा उपयोगी, अशी एक बाब म्हणजे, आपण ज्यांच्यापुढे काम करत आहोत, ते न्यायालय, तेथील वातावरण व त्याचे न्यायाधीश ! न्यायाधीश हे आपल्या ज्ञानात आणि कामात सक्षम, उत्तम असतील, तर कामे बऱ्यापैकी मार्गी लागतात. न्यायाधीश हसून-खेळून काम चालवणारे असतील, तर न्यायालयाचे वातावरण प्रसन्न रहाते, काम करतांना व ऐकतांना कोणाला दडपण वाटत नाही. पक्षकारांच्या कामाच्या सत्यतेवर कामाचा निर्णय अवलंबून असतो. हा निर्णय पण न्यायाधीशांना, असलेल्या कायद्यांच्या चाकोरीत, उपलब्ध पुराव्यावरून द्यावा लागतो. न्यायाधीश सह्रदय असले, तर वकीलांना तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ देतात, शक्यतोवर अडवणूक करत नाही, कारण त्याचा परिणाम पक्षकाराला मिळणाऱ्या निर्णयावर होत असतो.
कोणाही पक्षकारांची केस दाखल केली, म्हणजे वकीलांची पूर्ण तयारी असते, असे नाही. कित्येक गोष्टी पक्षकारांना माहिती नसतात, काही ते मुद्दाम वकीलांपासून लपवून ठेवतात. बऱ्याच गोष्टी वकीलांना माहिती नसतात, त्या ऐनवेळेस समजतात. काही वेळा आपले म्हणणे ऐकल्यावर न्यायाधीशांना पण काही गोष्टी नवीन असू शकतात. प्रत्येक वेळी, हे लक्षात ठेवायला हवे, की ही सर्व मंडळी माणूस आहे. माणसांचे सर्व गुणधर्म व गुणदोष यांच्यात आहेत.
आज मुद्दाम हा विषय निघण्याचे कारण म्हणजे - परवाची उच्च न्यायालयातील गोष्ट ! मी माझ्या ज्युनिअरला एका कामाचे ‘सर्क्युलेशन’ घ्यायला सांगीतले. न्यायाधीश हे त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या कामाच्यानुसार आणि सदर कामात निर्णय देण्याच्या तातडीनुसार जवळची किंवा दूरची दिनांक देतात. या सर्क्युलेशनसाठी फाईल वगैरे मी घेऊन जात नाही. त्यातील तपशील आपल्याला माहीत असल्याने तोंडी सांगता येतो. मी ज्युनिअरला हे सर्क्युलेशनचे काम सांगीतल्यावर दुसऱ्या कोर्टात माझे काम करायला निघून गेलो. थोड्या वेळात ज्युनिअर घाबऱ्याघुबऱ्या अवस्थेत, घाईघाईने आली.
‘सर, साहेबांनी हे काम दुपारी मेंशन करायला सांगीतले आहे. त्यात काय घटना आहे, तातडीने का सर्क्युलेशन हवे, वगैरे सर्व सांगा म्हणून सांगीतले आहे. सिनीअर फार तर शेजारी बसतील. बोलणार नाही.’ ज्युनिअर !
‘काही हरकत नाही. आजच ‘मला काम चालवायला द्या’ म्हणून आग्रहाने सांगत होती ना ? हे काम आता शेवटपर्यंत तूच चालव !’ मी.
‘पण फाईल पण नाही. त्यात काय बोलायचे ? काय सांगायचे ?’ ज्युनिअर !
‘रोज अभ्यास करायला हवा, तो याच्यासाठी ! असू दे. तू फाईल घेऊन ये. मी सांगतो.’ मी. तिने आॅफिसला जाऊन फाईल व लिहीण्यासाठी कागद आणले. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. मला हसू आलं.
‘काही घाबरण्यासारखं नाही. मी सांगतो, ते काही मुद्दे अवश्य सांगायचे. बाकी विचारले तर सांगायचे, न विचारतां बोलायचे नाही. मी. तिने लिहून घेतले.
दुपारचे अडीच वाजत आले. मी त्या न्यायालयांत जाऊन बसलो. ज्युनिअर हजर होतीच. न्यायाधीश आले. त्यांनी ‘काय ते सांगा’ म्हणून खूण केली. ती निर्धाराने, पण धडपडत काही सांगत होती. न्यायाधीश लक्षपूर्वक ऐकत होते. मी जे मुद्दे सांगायचेच, म्हणून सांगीतले होते. ते सांगीतल्यावर, त्यांनी त्यांना पडलेल्या प्रश्नाचे अपेक्षित उत्तर मिळाल्याची प्रतिक्रिया दिली. शिरस्तेदाराला ‘फाईल बोलवून घ्या’ म्हणून सांगीतले. मग त्यांनाच काय वाटले, ते म्हणाले, ‘तुमची फाईल दाखवा.’ तिने ती फाईल दिली. त्यांनी बघीतली आणि स्टेनोला आॅर्डर देवू लागले.
‘Not on board. Taken on board. Issue notice. ——-‘
काम आटोपले. आम्ही बाहेर आलो. तिने सुटकेचा निःश्वास टाकला. आता तिला खूप, भरभरून बोलायचे होते.
‘हे साहेब खूप चांगले आहे नाही. ते ——-‘ ती. तिचे पुढचे बोलणे मी थांबवले.
‘सर्वच जण चांगले असतात. कोणी वाईट नसतात. मात्र काही जास्त चांगले आणि सह्रदयी असतात. आपल्या कर्तव्याची जाणीव त्यांना असते, आणि ती त्यांच्या वागण्यातून लवकर दिसते. एवढेच !’ मी.
कामकाजाचे क्षेत्र कोणतेही असो, कसेही असो. तिथं जुने-नवीन, अनुभवी-अननुभवी, कामसू-कामचुकार, हुशार-मठ्ठ, तत्पर-आळशी अशी सर्व प्रकारची मंडळी असणारच ! ही मंडळी जशी कर्मचाऱ्यांत असते, तशी अधिकाऱ्यांत पण असते. प्रत्यक्ष काम करणारी मंडळी असो, वा त्यांच्याकडून काम करवून घेणारा अधिकारी असो, जबाबदार कर्मचारी असो, वा अधिकारी असो. त्याचे एक गृहीत धरलेले कर्तव्य असते, की त्याने आपले कामकाजाचे क्षेत्र, आपल्या कृतीने जास्तीतजास्त कार्यक्षम करायला हवे. त्याची विश्वासार्हता दोन्ही बाजूने, म्हणजे अंतर्गत कार्यालयात आणि बाहेर समाजात, वाढवायचा प्रयत्न करायला हवा.
बाकी काही असो, रांगता बालक नुकताच चालायला लागला, की आई-वडील, घरातील माणसं त्याची खूप काळजी घेतात. त्याच्या आसपास उभे रहातात, तो पडला, तर सावरायला ! त्याची आई तर तिच्या त्या काळजाला, त्याला त्रास होवू नये म्हणून, बोट धरून चालवत असते. असे चालतांना, तिला वाकावे लागते. तिला तसे चालतांना त्रास होतो, पण ती सहन करते. ती त्याला एकाच वेळी आणि एकाच दिवशी जास्त, त्याच्या ताकदीपलिकडे पण चालवत नाही, त्याचे पाय दुखतील, त्यांत काही व्यंग निर्माण होईल म्हणून ! त्यासाठी आपला जास्त वेळ देते, थोडे-थोडे चालवते त्याला ! आपला हा बालक, पुढे मोठा होईल ! त्याचे पाय मजबूत होतील, आणि तो त्याच्या जीवनाच्या शर्यतीत भरधाव धावेल. बस, हीच अपेक्षा अपेक्षा असते तिची ! ——- वकीलांची नवी पिढी चांगली निघावी, यासाठीचे हे वागणे, यापेक्षा काय वेगळे आहे ?

16.8.2019

No comments:

Post a Comment