Sunday, October 20, 2019

आजचा गणपती

आजचा गणपती
मी आमच्या गांवाहून इथं औरंगाबादला उच्च न्यायालयांत वकीली व्यवसायासाठी आलो, तो सन २००६ च्या महाशिवरात्रीला ! काही दिवस आपल्या असे कायमचे लक्षात रहातात. ‘देव तारी, त्याला कोण मारी’ ही म्हण आपण प्राथमिक शाळेत असतांना शिकलोय, पण ही म्हण आपोआप आली नाही, तर अनुभवांतून आलेली आहे, हे पण देव दाखवून देतो, फक्त तुमचे तिकडे लक्ष हवे. अगोदरच मी श्रद्धाळू, त्यांत वेळोवेळी परमेश्वराने आपल्या कृपाप्रसादाने त्याच्यावरील माझी श्रद्धा अजून दृढ केली. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी !
तर, मी इथं जसा आलो, तसा एकटाच आलो. मुलांच्या परिक्षा व्हायच्या होत्या, त्यामुळे ते आणि त्यांची आई काही आली नव्हती. दुसरी अजून एक धास्ती मनांत असते, की दुसरीकडे कोणताही व्यवसाय सुरू करायचा, तर तिथं चालेल की नाही, याची एक काळजी असते. आमच्या वकीलीबद्दल तर समाजात इतकी काही मते ऐकायला येतात, की भलाभला गर्भगळीत होतो. त्यांच्या वकीली कशी चालेल याबद्दल सांगण्याचा थोडक्यात मतितार्थ असा असतो, की ‘वकिली ही चालण्यासाठी नसतेच !’ मी त्यामुळे काही घाबरणार नव्हतो, पण त्यामुळे जरा मी ‘सावध पवित्रा’ घेतला, घरी सांगीतले, ‘वर्षभर थांबा. इकडची परिस्थिती बघतो. जरा आटोक्यात आली, की मग तुम्ही सर्व या.’ मात्र माझ्या सांगण्याचा काही उपयोग झाला नाही. मुलांच्या परिक्षा झाल्या. मुले, त्यांच्या आईसह इथं औरंगाबाद येथे माझ्यासोबतच आली. आम्ही औरंगाबादकर झालो.
आमचे आणि आमच्या घराचे काय वैशिष्ट्य आहे, ते माहीत नाही, पण आम्ही जिथं जाऊ, तिथं आसपास असणारी लहान मुलं हक्काने आमचेकडे येतात. कदाचित त्यांच्या घरापेक्षा पण मोकळेपणाने व हक्काने आमचेकडे वावरतात. आमचेकडे विविध डब्यात ‘त्यांच्या दृष्टीने असलेला खाऊ’ कुठे ठेवला आहे, हे आमच्या लक्षात नाही, असे त्यांना वाटले, तर ते नि:संकोचपणे सांगतात. हे असे वागणे, ना त्यांना वावगे वाटत, ना आम्हाला त्याचा राग येतो. या मुलांच्या वागण्याने संकोचतात, ते त्यांचे पालक !
खालच्या मजल्यावर एक कुटुंब सासू-सासऱ्यांसह रहात होते. तिथं अशीच एक छोटी मुलगी होती. अगदी ३-४ वर्षांची, शाळेत पण न जाणारी ! मी कोर्टात गेलो, की ती यायची. पुढं तिची भीड चेपली. कदाचित काकूंपेक्षा काकाच जास्त गरीब, निरुपद्रवी आहेत, हा अचूक व सत्यपरिस्थितीच्या जवळ जाणारा निष्कर्ष तिने काढला असावा. काकूला खाऊ मागणे, काकू कामात असेल, तर काकाला सांगणे, यांत सुरूवातीला वाटणारी भिती, संकोच हा नंतर कमी झाला, नंतर संपला. योगायोगाने तिची आई त्याचवेळी तिला बोलवायला आली, तर मग असे संवाद झडत.
‘अग, काही वाटते का ? त्यांच्याकडे मागते ते ! आपल्याकडे नाही का ? असे दुसरीकडे काही मागणे चांगले नाही.’ शेजारच्या मुलांची आई.
‘आई, काकू चांगल्या आहेत. त्या अजिबात रागवत नाही. खाऊ देतांना, त्या एकच सांगतात. सगळं खायचं. पानात टाकायचे नाही.’ मुलं त्यांच्या आईला समजावतात.
‘हिने अगदी लाज आणलीय !’ तिची आई जरा ओशाळल्या स्वरात !
‘जाऊ द्या. मुलांचे काय मनावर घ्यायचे ? त्यांना दुसरीकडेच आवडते. आमचा तर हा नेहमीचा अनुभव आहे, स्वत:च्या घरी न जेवणारी मुले आमच्याकडे आनंदाने जेवतात. त्यांच्या घरी जायला तयार नसतात. आम्हाला काही त्रास नाही.’ माझी सौ.
‘अहो, ती घरी पण यायला तयार नसते आता. ‘इथंच जेवणार. इथंच रहाणार. इथंच झोपणार.’ म्हणून सांगते. संकोच वाटतो हो. तुम्हाला निष्कारण त्रास ! अडकून पडतो आपण, कोणी लहान मूल घरी असलं की !’ त्या मुलीची आई.
‘तुम्ही तसे काही मनांत पण आणू नका. हवं तर तुम्ही पण येत जा, तिच्यासोबत !’ माझी सौ.
याचा परिणाम इतकाच, की पूर्वी फक्त मुलगी यायची, आता तिची आई पण येऊ लागायची.
पूर्वी आम्ही जिथं रहात होतो, ते घर सोडलं, दुसरीकडे घेतलं. त्याला पण जवळपास दहा वर्षे झालीत. ते पण दुसरीकडे रहायला गेले. माणसांची मने जर मिळालेली असतील, तर घरांतील अंतर वाढले, तरी दोन्ही कुटुंबाच्या मनांतील अंतर वाढतेच असं नाही, तर उलट दूर गेल्याने ते दृढ व पक्के होते. इथं दोन्ही कुटुंबे मनाने एकत्र होती. दूर असलेला दोघांचा रहिवास, त्यांच्या मनांत दुरावा निर्माण करू शकणार नव्हते. पहातापहाता ही, हक्काने तिच्या काका-काकूंना खाऊ मागणारी, त्यावेळी शाळेतसुद्धा न जाणारी मुलगी, नंतर शाळेत जाण्याजोगी झाली, शाळेत जाऊ लागली. लक्षात आले, तिच्या हातात कला आहे. यंदाच दहावी पास झाली.
माझी मुलं दरवर्षी घरी मातीची गणपतीची मूर्ती बनवतात आणि आम्ही गणेश चतुर्थीला त्या मूर्तीची स्थापना करतो. बघताबघता आमची मुलं पण मोठी झाली. शिकायला बाहेरगांवी गेली. यंदा घरी कोणी नाही. प्रश्न होता, मूर्ती कोण बनवणार ? योगायोगाने परवा तिची आई आली होती. हिच्या आणि त्यांच्या गप्पा झाल्या - ‘यंदा मुलं नाहीत घरी. काही हरकत नाही. यंदा विकत आणू.’ ही म्हणाली.
‘तुम्ही कशाला विकत आणता ? हर्षिताने केली आहे, गणपतीची मूर्ती ! छोटी आहे पण ! मी पाठवते.’ तिची आई. हे म्हटल्यावर नाही म्हणणे, शक्यच नव्हते.
आज सकाळी तिच्या वडिलांनी, गणपतीची मूर्ती आणून दिली आणि यंदा पण घरीच केलेल्या गणपतीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना केली. पार्थिव मूर्तीत जीव आहे हे मानणारे आम्ही, या खऱ्याखुऱ्या जिवंत माणसाच्या भावनेला, कसा नकार देऊ शकणार ?
(पोस्ट आवडली तर ‘शेअर’ करण्यास हरकत नाही.)

2.9.2019

No photo description available.

No comments:

Post a Comment