Sunday, October 20, 2019

कै. जोशी काकू !

कै. जोशी काकू !
नाशिक जिल्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग 'त्रिंबकेश्वर' येथील 'ज्योतिष्यातील गाढा व्यासंग' असलेले 'शासकीय वैद्यकीय अधिकारी' डॉ. नरहर पुरुषोत्तम जोशी हे रावेर, जि. जळगांव येथे आपल्या कुटुंबकबिल्यासहीत नोकरीनिमित्ताने आले. नोकरीवर असतांना सरकारी दवाखान्याच्या शेजारीच असलेल्या क्वार्टरमधे त्यांचा रहिवास ! मी तर त्यावेळी प्राथमिक शाळेत शिकत होतो.
माझ्या आईसोबत कधीतरी त्यांच्याकडे जाण्याचा प्रसंग येई, तो म्हणजे प्रकृतीच्या कारणासाठी दवाखान्यात किंवा वर्षातून एकदा महालक्ष्म्यांच्यावेळी प्रसादाला ! प्रकृतीच्या कारणास्तव एखादेवेळी दवाखान्यात जावे लागले, तर काम आटोपल्यावर आई त्याला लागूनच असलेल्या, त्यांच्या घरी जाई ! तिथं जोशी काकू हसऱ्या चेहऱ्याने स्वागत करत. सडसडीत शरीर, गोरापान सोज्वळ गृहस्थाश्रमी प्रेमळ वाटणारा उभट चेहरा, सरळ धारदार नाक, डोळ्यांवर लालसर-सोनेरी काड्यांचा चष्मा, कपाळावर ठसठशीत कुंकू, गळ्यांत रूळणारे मंगळसूत्र आणि हातांत भरगच्च बांगड्या !
‘या निर्मलाबाई, आज काय ?’ जोशी काकू !
‘काही नाही. दवाखान्यात आले होते, म्हटलं तुमची भेट घ्यावी.’ आई म्हणायची. मग त्यांच्या गप्पा सुरू होत. मला थोड्यावेळात तिथं कंटाळा येऊ लागे. मग घरातून बाहेर आलं की दवाखान्यात येणारे रूग्ण, त्याच्या सोबतीला आलेले, काही खेड्यापाड्यावरून आलेली मंडळी तिथं पथारी पसरून बसलेली, काहींनी जेवणाची वेळ असेल तर फडक्यात आणलेली शिदोरी सोडलेली, शेजारीच बारकं पोरगं उभं, त्याला शिदोरीतला पदार्थ नको असायचा ! अशा गमती पहात वेळ निघून जाई. तोपर्यंत आईच्या पण गप्पा आटोपून ती बाहेर आली असे आणि आम्ही घराकडे निघत असू.
त्यावेळी सरकारी दवाखाना हा आजच्याइतका गांवात आलेला नव्हता. त्यावेळी गांवाचे शेवटचे टोक म्हणजे ग्रामदेवता ‘महालक्ष्मीचे मंदीर’, तिथं गाववस्ती संपायची, मग त्यांच्यापुढे दगडी पूल ओलांडून गेल्यावर ‘राजे रघुनाथराव देशमुख वाचनालय’ लागायचे. त्याला लागून हा सरकारी दवाखाना ! त्यावेळी नुकतेच शेडवजा बस स्टॅंड बांधले गेले होते. इतक्या लांबवर एकट्यादुकट्या स्त्रीने जाणे सहसा टाळले जाई किंवा कोणाला सोबतीला बरोबर घेऊन जात. प्राथमिक शाळेतल्या आपल्या मुलाला किंवा मुलीला, सोबत घेऊन कोणतीही आई कशी जाते, आणि त्या छोट्या पिल्लाची, त्याच्या जन्मदात्रीला कशी सोबत होते, हे अजूनही मला समजलेले नाही.
डां. जोशी यांनी आपली नोकरी सोडून रावेरलाच आपली कर्मभूमी मानली, तेथेच आपली वैद्यकीय सेवा रावेरच्या जनतेला द्यावयास सुरुवात केली. त्यांचे प्रशस्त घर आणि दवाखाना म्हणजे आमच्या सारख्यांना आमच्या घरापेक्षा वेगळे वाटतच नसे. मी शाळेत असल्यापासून त्यांच्याकडे घरगुती संबंध असल्याने जात असे.
एकदा हायस्कूलला असतांना, असंच ‘खरी कमाई’ म्हणून आम्ही ‘बालवीर’ हे कमाई करण्यास निघालो. सोबत वर्गातील मित्र होतेच. त्यावेळी डाॅक्टर जोशी देशमुख प्लाॅटमधे, त्यांचे नवीन घराचे बांधकाम सुरू होते. त्यांची सरकारी नोकरी त्यांनी सोडली होती. त्यावेळी ते काॅंग्रेस भवनाच्या मागे रहात. आम्ही बालवीर ‘खऱ्या कमाईसाठी’ म्हणून त्यांच्याकडे गेलो.
‘काकू, आम्हाला कोणतेही काम सांगा, आम्हाला ‘खरी कमाई’ करायची आहे.’ मी. काम केल्यावर झालेली कमाई ही ‘खरी कमाई’ आणि काम न करता झालेली कमाई ही ‘खोटी कमाई’ हे सूत्र मला बऱ्याच उशीरा समजले. कमाई जी असते, ती खरीच असते, हा माझा आपला समज ! माझ्या बोलण्यावर त्या हसल्या.
‘तू निर्मलाबाईंचा मुलगा ना रे ?’ त्यांनी विचारले.
‘हो.’ मी. आता इथं ‘खरी कमाई’ म्हणून काहीतरी मिळेल ही खात्री झाली. मित्रांमधे कदाचित थोडा भाव वधारला. भाव काहीवेळाने उतरतो पण !
‘त्या बांधकामावर पाणी मारा.’ जोशी काकू !
आम्ही यथाशक्ती पाणी सांडले का मारले, ते आठवत नाही; पण थोड्यावेळाने त्यांनी आम्हा सर्वांना बोलावले आणि ‘आता पुरे झाले.’ म्हणून काही पैसे देऊ केले.
‘या कार्डावर लिहून सही करायची आहे.’ मी सुचवले. त्यांनी हसून हाती कार्ड घेतले, सही केली आणि पैसे दिले. ती ‘खरी कमाई’ घेऊन आम्ही निघालो. ही एक शालेय वयातील मला लक्षात राहीलेली आठवण !
शिक्षणानिमीत्त मी बराच काळ बाहेरगांवी होतो. नंतर वकिली सुरू केली, तसा रावेरला आलो. लग्न ठरवितांना पत्रिका जुळते किंवा नाही, हे पहाण्याचे काम डाॅ. जोशी करत ! माझ्या लग्नाला तर त्या होत्याच ! मुलगी झाल्यावर गांवात तिला फिरायला घेऊन जायचे, तर गांवात दोन-तीन ठिकाणेच ! शनिमंदीर, रेल्वे स्टेशन आणि आमचे खास म्हणजे डाॅक्टर जोशी यांचे घर ! अगदी माझी मुलगी लहान असतांना, ती नेहमी माझे सोबत येत असे, त्यावेळी 'तिच्या त्या आजीला' तिच्यासाठी खाऊ सापडत नसेल तर, त्यांचे घरातील त्यांना पण न सापडणारे डबे या 'आजी-आजोबांना' ही तीन वर्षांची चिमुरडी सांगत असे ! ही गोष्ट झाली १९९६-९७ काळातील !
अगदी पूर्वीपासून म्हणजे त्यांच्या नूतन घराचे व दवाखान्याचे बांधकाम झाल्यावर 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' यांच्या येणाऱ्या प्रचारकांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे त्यांच्या घराचे वरच्या मजल्यावरील स्वतंत्र खोल्या ! एवढेच नाही तर सर्व घरात त्यांना नेहमीच मुक्त संचार असे ! काहीवेळा ऐनवेळी परिवारातील कार्यकर्त्यांच्या मुक्कामाची अगदी कोणाचीही अडचण असली तरी ती रावेर येथे आम्हाला कधीही जाणवली नाही ती - कै. डॉ. जोशींमुळे ! अगदी संघाच्या कार्यक्रम घेण्यासाठी जागेची कधीही कोणतीही अडचण त्यांनी आम्हा रावेरवासीयांना कधीही जाणवू दिली नाही !
घरातील कर्त्या पुरूषाचे नांव सर्वत्र घेतले जाते, कारण त्याचे काम सर्वांना दिसते; मात्र त्याच्या मागे खंबीरपणे साथ देणारी त्याची सहचारिणी कोणाला दिसत नाही. देवाब्राह्मणासमक्ष आपल्या पतीचा हात हातात घेऊन सात पावलं चालून, आयुष्यभर त्याला साथ देण्याची शपथ घेतलेली ही प्रिया, त्याच्या जीवनाची स्वामिनी बनून त्याला समर्थपणे आणि आयुष्यभर मागे राहून साथ देत रहाते. त्या नवऱ्याच्या आयुष्यातले उन्हाळे, पावसाळे पचवते. गरिबीच्या हिवाळयात कुडकुडत असतांना, दुष्काळाच्या वणव्यात होरपळून निघत असतांना पण, ही त्याची जीवनदायीनी बनलेली असते. दुर्दैवाने काही वेळा परमेश्वर, तिच्या या साथीदारास अगोदर बोलावून घेतो. ती बिचारी एकटी रहाते, मात्र आपल्या पतीचे अपूर्ण राहीलेले कर्त्याचे काम, कर्तव्य अपवादानेच विसरते.
आपल्या मुलांच्या आयुष्यातला अंधार दूर करून, त्याला प्रकाशाची वाट दाखवणारे आईवडील, त्या दिव्यातील वातीची आणि तेलाची भूमिका बजावत असतात. मुलांना त्यांच्या आयुष्यातल्या भविष्याचा रस्ता स्पष्ट दिसावा, अंधार दूर व्हावा, यासाठी मिळणारा प्रकाश हा दोघांच्या, आईवडिलांच्या कणाकणानी जळण्यातून मिळालेला असतो.
निसर्ग हा प्रत्येकावर परिणाम करत असतो ! वयोमानाने त्यांच्याकडून होईना, त्यांची दोन्ही मुले नाशिकलाच असतात, डॉ. उत्तमकुमार जोशी आणि श्री. विवेक जोशी ! हे त्यांना तेथे नेहमीच कायमसाठी बोलावीत असत, पण रावेरमय झालेल्या डॉ. नरहर पुरुषोत्तम जोशी आणि जोशी काकू यांना रावेर सोडून जाण्याची कल्पनाच सहन होत नसे, हे खूप वेळा माझ्याशी बोलत !
------ पण निसर्ग आणि त्यांची नाती पक्की ठरली, साधारणतः १७ एप्रिल २००१ ला त्यांनी रावेर कायमचे सोडले आणि नाशिकला गेले, ते पुन्हा आपल्या गावी गेले, नाशिककर झाले ! आमच्या नेहमीच्या भेटीगाठी साहजिकच कमी झाल्या, मात्र नाशिकला गेलो की त्यांचेकडे एक चक्कर असायचीच ! गेली पंधरा वर्षे हा नेम सुरू होता ! अगदी माझी मुलगी नुकतीच तीन वर्षांपूर्वी तेथे गेली तर त्या 'आजी-आजोबांना' झालेला आनंद तिला सांगतासुद्धा येईना ! त्यांच्या तेथे असलेल्या नातसुनेला एवढेच समजले की 'यांच्या हे खूपच जवळचे आहेत', त्यांच्या वागण्याने नवीन पिढीतील संबंध दृढ होण्याची शक्यता वाढली ! गेल्या तीन वर्षांपूर्वी त्यांच्या सुनेचा फोन आला, डाॅ. जोशी गेल्याचे त्यांनी सांगीतले. माझ्याशी काकू फक्त एवढेच बोलू शकल्या - 'तुमचे काका गेले' ! नंतर आम्हाला रहावलेच नाही, त्यांच्यासाठी नाशिकला जाणे आवश्यक होते. तिथं गेलो. जोशी काकूंनी माझ्या पत्नीला अगदी हात धरून शेजारी बसवले. जेवतांना पण डोळे भरून येत, त्यांच्या गप्पा सुरू होत्या.
‘माधवराव, तर सरळ आहेत ना ? आपल्याला सोसावंच लागतं. बाईच्या जातीला निसर्गाने सोसण्यासाठीच जन्माला घातले आहे. हे पण दिवस जातील.’ माझ्या पत्नीला माहेरच्या प्रेमाने आणि हक्काने, धीर देणाऱ्या जोशी काकू या सासूच्या भूमिकेत कधी जाणवल्याच नाही.
परवा मी रावेरला होतो. तिथं जोशी काकूंचे चिरंजीव श्री. विवेक जोशी यांचा फोन आला ‘माझी आई गेली. मोबाईल बदलल्याने तुमचा फोननंबर मिळेना. तुमचे जुने ग्रिटींग सापडले आणि म्हणून कळवतां आले.’ —— हा फोन आला आणि एवढ्या आठवणी झरझर आल्या ! आता जोशी काकू पण आपल्यात नाहीत. दोन महिन्यांपूर्वी माझी आई काळाच्या पडद्याआड गेली आणि आता तिची ही मैत्रीण !
नाशिकला जायचे ठरले, तर दोन-तीन ठिकाणी जावे लागते. माझी धाकटी मावशी, डाॅ. जोशी यांचे घर आणि काॅलेजमधला मित्र ! मात्र आता कधी नाशिकमध्ये गेलो, तर माझ्या आयुष्यातील, जुनी पाळंमूळं असलेले एक माणूस अजून कमी झालं !
20.7.2019

Image may contain: 1 person

No comments:

Post a Comment