Sunday, October 20, 2019

राग- पूर्वी

राग- पूर्वी
शाळेतून घरीआल्यावर जेवण झाले, की आम्हा गल्लीतील सर्व मुलांचा, गल्लीत खेळायचा कार्यक्रम असायचा. आमचे खेळ हे ऋतूप्रमाणेबदलायचे, हाच तो काय फरक! शाळा नुकतीच सुरू झाली असेल, तर उन्हाळ्यातील विटीदांडूआणि गोट्या खेळण्याची धुंदी मनावरअजूनहीअसायची. मात्र तोपावेतो पाऊस बऱ्यापैकी झालाअसेल, तर पावसाळ्याने सर्वदूर चिखल व चिकचिकअसायची. त्यावेळी पाऊस बऱ्यापैकीआणि वेळेवर व्हायचा. अशावेळी मग गल्लीभर, घरांच्या भिंतीच्या कडेकडेने त्या ओल्या झालेल्या मातीत, ‘छिन्नी खुपसणे’ हा खेळअसायचा. सर्वांच्या घरातील स्वयंपाकातील लोखंडी सराटे या खेळासाठी बाहेर यायचे. मुलांना बोलबोलून कंटाळलेल्या त्यांच्या आया, शेवटी‘जाऊ द्या. आताच शाळा सुरू झालीआहे’, असे म्हणत नाईलाजाने गल्लीत मुलांना खेळूद्यायच्या. त्यांच्यापण डोक्याला शांतता असायची, हे पण एक कारणअसायचे.
खेळून कंटाळल्यामुळे, संध्याकाळी लवकर घरातआलो, आणि आभाळ भरून आलेले असलं, तर मग वाचनालयांत जाणे, शक्य नसायचे. घरीच थांबावे लागे. आईकडे आलेल्या संगीताच्या शिकवणींच्या मुलींना पण घरी लवकर जायचेअसायचे. आईजवळ समोरच हार्मोनिअम असायचा.
‘बसतो कारे, काही म्हणायला?’ तिची मला विचारणा. गाणं शिकायची मला, काही फारशी उत्सुकता नसायची. मात्र तिची काहीतरी म्हणण्याची इच्छा आहे, हे लक्षात यायचे. मग मीच म्हणायचो, ‘या रोज येणाऱ्या मुलींना, तू म्हणते, ते गाणे का शिकवत नाही?’
‘अरे, ते पुढच्या परिक्षेला आहे. त्यांना आता कुठे शिकवणार?’ ती म्हणे.
‘तूच म्हण, कोणतं तरी गाणं!’ मी.
‘आता बघ, वाटेल तेव्हा वाटेल ते गाणं, वाटेल तो राग म्हणून चालत नाही.
प्रत्येक रागाची वेळ असते. त्याला पण भावभावना असतात. आता बघ, ही वेळआता संध्याकाळची आहे. तेव्हा संधीकालीन, संध्याकाळी म्हटले जाणारे राग म्हणायला हवे. ही आपणचआपल्याला शिस्त लावायची असते.’ ती.
‘पण जो रागआवडतो, तोच नेहमी म्हटला, तर काय बिघडले? त्याला कसली आहे वेळआणिकाळ?’ मी.
‘तसं नसतं रे. प्रत्येक राग नियमांनी बांधलेला आहे. त्यात कोणते स्वर घ्यायचे, कोणते घ्यायचे नाही, म्हणजे कोणते स्वर वर्ज्यआहे, याचे पण नियम आहेत. त्या रागाचा मुख्य स्वर, म्हणजे‘वादी’ स्वर कोणता आणि त्या खालोखाल महत्वाचा, म्हणजे‘संवादीस्वर’ कोणता, हे पण ठरलेले आहे.’ ती.
‘आता कोणता म्हणता येईल?’ मी.
‘आता संध्याकाळ होते आहे, त्यामुळे ‘मारवा’ ‘पूर्वी’ हे राग म्हणता येतील पहा.’ ती. मला काय वाटले, मी म्हणालो, ‘पूर्वी’ हे नांव कसे वेगळेच वाटते. तो म्हण!’
‘त्या रागाची माहिती ऐक.’ म्हणत तिने माहिती सांगीतली आणि ‘पूर्वी’ राग म्हटला.
त्यावेळी माझ्या शालेय वयांत तिने मला सांगीतलेले, आता माझ्या काय लक्षात असणार? मात्र तिची भावना त्यावेळी थोडी समजत होती; आज मात्र जाणवते. आपण त्या उंचीपर्यंतआलो, की आपल्याला उंच झाल्याच्या अडचणी दिसायला लागतात. आपल्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिबिंब आईवडील आपल्या मुलांत बघत असतात. आपण काही गोष्टी, कोणत्याही कारणाने का होंईना, पण करू शकलो नसेल, तर त्या आपल्या मुलांनी तरी पूर्ण कराव्या, एवढीच त्यांना इच्छा करता येते. या आशेवर ते आपले आयुष्य पुढे लोटत असतात, आणि आपल्या लेकरांना आपला कमी केलेला घास देत असतात. ती मुलं कशी निघतात, हे तर त्यांना त्यांच्या उत्तरार्धात समजते. आपल्या मनासारखे झाले, तर समाधान वाटते. मात्र मनासारखे झाले नाही, तर होणारी निराशा त्यांचे संपूर्ण मन व्यापून टाकतअसेल, त्यांच्या गतकालीन इच्छा-आकांक्षा जळून खाक झाल्याने आयुष्याच्या झालेल्या धुराएवढी असेल का निराशा? अर्थात शरीराने आणि बऱ्याच वेळा मनानेदेखील गलीतगात्र झालेले ते, त्यावेळी समजून पण फार काही करू शकत नाही.
पूर्वी हा राग, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ‘पूर्वी’ याच थाटातील आहे. यांत आरोह-अवरोहात सर्व स्वर असतात, म्हणून याची जाती संपूर्ण-संपूर्ण आहे. याचा वादी ‘गंधार’ असून संवादी ‘निषाद’ आहे. यांत रिषभ आणि धैवत कोमल लागतात. मध्यम हा कोमल, तसेच तीव्र पण उपयोगात आणला जातो. बाकी सर्व स्वर शुद्ध लागतात. याची गाण्याची वेळ, म्हणजे दिवसाचा चौथा, म्हणजे शेवटचा प्रहर!
याचेआरोह- स, रे, ग, म प, ध, नि सा। आणि अवरोह- सं, नि ध, प, म ग, रे,
सा। याची पकड, म्हणजे ज्यामुळे राग क्षणांत डोळ्यांसमोर उभा रहातो, ती आहे - नि, स रे ग, म ग, रे ग, रे स।
या रागाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सायंकाळी, संधीप्रकाशकाळी गायला जातो. पूर्वांगप्रधान असलेला हा राग, याचा विस्तार हा विशेषकरून मंद्रसप्तक आणि मध्यसप्तकांत जास्त होतो. हा राग प्रकृतीने गंभीर आहे. आरोह अवरोहात तीव्र मध्यम घेतात, तर शुद्ध मध्यम हा अवरोहात वक्रतेने घेतात. पूरिया-धनाश्रीपासून वेगळा स्पष्टपणे त्यामुळे दिसतो. तार सप्तकातील षडजावर जातांना, पंचमाचा विशेष उपयोग करत नाही. मींड आणि गमकाचा योग्य उपयोग करून या रागाचे स्वरूप जोरकसपणे दाखवता येते. विषाद, निराशयुक्त करूण रस या रागातून व्यक्त करता येतो.
आज असाच बसलो होतो. ‘मीरा’ या चित्रपटातील पं. रविशंकर यांनी संगीत दिलेले, संत मीराबाईंचे ‘करूणा सुनो श्याम मोरी’ हे वाणी जयराम यांनी गायलेले भजन ऐकले, आणि त्यावेळची अशीच काहीतरी आठवण आली. तिने गायलेल्या ‘पूर्वी’ रागाचे सूर माझ्या कानांत अजून आहेत, ते कायम रहाणार ! तिने गायलेला ख्याल आणि चीजेचे शब्द आठवत नसले म्हणून काय झाले? बाकी माझ्या कानांत कायम गुंजत असलेले, हे सूर तर आपल्यापर्यंत पोहोचविता येतात !
(पोस्ट आवडल्यास ‘शेअर’ करायला हरकत नाही)

30.8.2019

No comments:

Post a Comment