Sunday, May 10, 2020

चूल - चुलीवरची भाकरी आणि पानगे !

पूर्वी खेड्यापाड्यातून स्वयंपाक करायचा, तर स्टोव्ह अपवादानेच असायचा. गॅसचा तर प्रश्नच नसे ! स्वयंपाक करायचा तर, बहुतेकांकडे चूल असायची. त्यांवर करायचा स्वयंपाक ! मग त्यासाठी लाकडे, सरपण लागायचे. ते असायचे काहीवेळा ओले, तर काहीवेळा कोरडे ! कोरडे असेल, तर सुरूवातीपासूनच चूल चांगली, धगधगून पेटीयची. स्वयंपाक लवकर व्हायचा ! सरपण जर ओलं असेल, धूरच धूर ! नीट जाळ व्हायचा नाही. फुंकणीने फुंकून फुंकून गरगरायला लागायचे. पण जाळ लागायचा, थोडावेळ टिकायचा. त्यामुळे कोणाला स्वयंपाक येत नसला, की लाकडे ओली होती, हे सांगीतले जाई ! अशी कोणी कारणे सांगीतली, की त्यांवर कोणीतरी म्हणायचेच - नाचता येईना अंगण वाकडे आणि स्वयंपाक येईना ओली लाकडे !
या ओल्या लाकडांवर पण बराचसा स्वयंपाक होत आला, की त्या लाकडातील ओल चुलीतील जाळाच्या धगीने जायची, मग लाकूड कोरडे व्हायचे. चूल जर आव्याची असेल, तर मग शेजारी पण जाळ जायचा, तिथे वरण वा भात किंवा भाजी शिजायला ठेवली जायची. आपल्या भाकऱ्या पोळ्या करून होताहेत, तोवर ते पण शिजलेले असायचे. कित्येक वेळा लाकडाची मोळी ओली आहे, हे लक्षात आले, की त्या मातीच्या चुलीवर मागच्या बाजूला दोनचार लाकडं ठेवली जायची, ती कोरडे होण्यासाठी ! अशा उटारेटा व हायउपस करत, घरातील गृहिणी, अन्नपूर्णा स्वयंपाक करायची, आणि आपल्याला जेवायला द्यायची.
त्यावेळी स्वयंपाक करतांना फक्त घरातील माणसेच मोजायची नसत, कारण जेवतेवेळी फक्त घरातील माणसंच जेवायला असतील असे नाही, तर ऐनवेळेस कोणी पण अतिथी यायचा. त्याला पण वाढावे लागे. तोपर्यंत भाकरीसाठी ज्वारीच्या पिठाचा उंडा, किंवा पोळ्या असतील तर कणकेचा गोळा, परातीत ठेवलेला असायचा आणि चूल धगधगत असायची, ती ऐनवेळेस कोणी आला, तर त्याला गरम स्वयंपाक तयार मिळायचा.
भाकरी करायची, तर तिचा करतांना तुकडा पडू नये, म्हणून तव्यावर पाणी गरम केले जायचे, आणि ते ज्वारीच्या पीठात टाकले जाई. पाणी तव्यावरच गरम केले जाई, एखाद्या पातेल्यात यासाठी पाणी गरम केले आहे, हे मी काही बघीतले नाही. थपथप भाकरी थापून नेटकी तव्यावर टाकली, की डावीकडच्या वाडग्यातील पाणी उजव्या हातात घेऊन, सर्रर्रऽऽऽ करत पाण्याचा हात पूर्ण भाकरीभर फिरवला जाई. हा जितका सफाईदार, तितका भाकरीला चांगला पोपडा सुटण्याची शक्यता अधिक ! काहीवेळा हा हात, त्या गरम झालेल्या तव्यावर पण सर्रकन फिरायचा ! हाताला चटका बसायचा. पण सांगायचे कोणाला ? जरा भाकरी नेटकी झाली, की सराट्याने म्हणजे उलथण्याने उलथवून हातात घेतली जायची, आणि चुलीतील जळक्या लाकडांवर उभी ठेवली जाई. चुलीत एक भाकरी फिरतेय, आणि एक भाकरी तव्यावर ! चुलीतील भाकरी दोन्ही हातात घेऊन, नीट चाचपून बघीतली जाई, नीट झाली आहे का ? नीट झाली असेल, तर पोपडा छान सुटायचा ! त्यावेळी काही वेळा भप्पकन हातावर वाफ यायची ! ‘वाफेचा चटका जोरात बसतो’ या भौतिकशास्त्रातील नियमाचा अनुभव त्या माऊलीला रोज मिळायचा, मग ती शिकलेली असो, वा नसो ! असे चटके खात, ‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताले चटका, तेव्हा मियते भाकर’ ही बहिणाबाईची कविता अनुभवत भाकरी व्हायची ! संसारात हे सहन करावेच लागणार, हे त्या माऊलीने गृहीत धरले असायचे. आपल्या नवऱ्याला आणि पोरांना जेवू घालायचे, तर हे स्विकारायलाच हवे, आणि याविरूद्ध बिचाऱ्यांची काही विशेष तक्रार पण नसायची. त्यांच्या हालाला पारावार नसायचा, तो त्यांना सासुरवास असला तर ! सासुरवासात कोणत्या गोष्टी नसायच्या ? सर्व असायच्या !
स्वयंपाक जरी झाला, तरी सकाळी शाळेत गेलेली मुले यायला, निदान साडेबारा-एक वाजायचा, कारण शाळाच बारा वाजता सुटायची ! तोपावेतो घरातील कर्त्या मंडळींची जेवणे होऊन, ते त्यांच्या कामाला पण गेले असायचे. शाळेतून घरी येणाऱ्या मुलांच्या अगोदर जेवायला, कोणती आई तयार होईल ?
‘जेवणाची वेळ झाली, तर घरातल्या बाईने जेवण करून घ्यावे, काही कोणासाठी थांबत बसू नये’ असे कोणीतरी म्हणायचे, अर्थात नव्या पिढीतील असायची ती ! मग माझी काकू यांवर, खास ऐकवायची - ‘अग काही वाटते का ? अजून घरची ही मंडळी राहिली आहे, आणि तू खुशाल जेवायला बसतेय ! अग, तुझे पोरं पण शाळेतून यायचे आहेत ना ? आणि त्यांच्या अगोदर तू जेवतेय ? खरं आहे ग बाई, ‘कलियुगाचा उलटा पाया, लेकराआधी जेवती माया’ ! काही म्हणजे काही राहिले नाही.’ तोपर्यंत शाळेतून पोरं यायची मग त्यांची जेवणे आणि या लेकरांच्या आईचे जेवण सोबत व्हायचे ! म्हणजे घरातील, या सर्वांची जेवणे झाली, की मग सर्वात शेवटी घरातील अन्नपूर्णेच्या आणि तिच्या लेकरांची पंगत !
अजून एक असायचे, भाकरी पोळ्या करताकरता, शेवटी उगीच थोडासा गोळा रहायचा. त्याची नेहमीप्रमाणे भाकरी, वा पोळी होत नसे, लहानच व्हायची. मग नेहमीचे उद्गार ‘हा शेवटचा पानगा लावावा लागेल, असं दिसतंय !’ असे म्हणत उरलेला पिठाचा किंवा कणकेचा गोळा हातानेच भाकरीपोळी सारखा करत तव्यावर लावला जाई. तो जरी शेवटचा असला, तरी चुलीवरील गरम तवा थंड झाला, की चुलीच्या फपुट्यात तो ठेवल्यावर चांगला खरपूस भाजला जाई. कुरकुरीत लागत असे. त्यांत त्याला जर, तेल आणि मीठ चांगले चोपडून लावले, की त्याच्या खाण्यातील आनंद सांगता येणार नाही.
या सगळ्या गडबडीत दोन गोष्टी मात्र ती घरातील अन्नपूर्णा कटाक्षाने पाळत असे. घरातील मुलगी जरी हाताशी आली असेल, स्वयंपाक-पाणी करण्यासारखी झाली असेल, तरी तिला सर्व स्वयंपाक झाल्यावर चुलीवरचा तवा उतरवू देत नसे, आणि तो शेवटचा कुरकुरीत लागणारा पानगा, घरातील मुलीला खायला दिला जात नसे. याचे कारण मात्र खास मातृह्रदय दाखवणारे असे - ‘अरे, हे मुलीला करायला लावले, किंवा तिने केले, तर तिला लग्नानंतर सासुरवास होतो.’
मुलीला तिच्या आयुष्यात चटके तर सोसावेच लागणार आहे, आपल्या माणसांना जेवूखावू घालायचे असेल तर ! मात्र तिला हा सासुरवास व्हायला नको. तिने सुखात रहावे, आणि मुलीला तिच्या लग्नानंतर, या किरकोळ गोष्टी केल्याने सासुरवास होणार नसेल, तर काय हरकत आहे, त्या करायला ? त्या केल्या नाही तर सासुरवास होणार नाही, किंवा केल्या, तर नक्की सासुरवास होईल, याला काय आणि कसला आधार ? मात्र हा असला आधार आईजवळ मागायचा नसतो ! तिच्याजवळ असला आधार मागण्याएवढे ह्रदयाचे सामर्थ्य आणि ममता, कोणाजवळ असणार ? —- आणि ती माऊली बिचारी आपल्या लेकीसाठी, तिला सासुरवास होऊ नये यासाठी, यापेक्षा जास्त तरी काय करू शकणार ?
© ॲड. माधव भोकरीकर
(पोस्ट आवडल्यास आपण शेअर करू शकतात.)



7.5.2020

No comments:

Post a Comment