Sunday, May 10, 2020

इंद्रजीत वध आख्यान अर्थात सती सुलोचना !

इंद्रजीत वध आख्यान अर्थात सती सुलोचना !
उन्हाळयाची सुटी लागली आहे. संध्याकाळी मस्त सडा टाकून गार केलेल्या अंगणात, जेवणे आटोपण्यापूर्वीच गोधड्या टाकलेल्या आहेत. जेवणे आटोपल्यावर आम्हा बालगोपाळांनी दंगामस्ती करून, घरातील मोठ्यांच्या आवरासावरीला हातभार लावून, काम अजून वाढवण्याचा संभाव्य धोका टळावा, यासाठी घरातील एका वडिलधाऱ्याची आमच्यासाठी नेमणूक होत असे. मात्र आपल्यासोबत कोणी नाही, हा अन्याय आमच्या मनांत येऊ नये, म्हणून ही मोठ्यांनी लहानांशी केलेली तडजोड असायची, हा पण एक विचार यांत असावा. आम्ही रात्रीचे जेवण हेच, आमच्या दिवसभराच्या प्रचंड उद्योगामुळे कसेबसे केलेले असायचे. आमच्या डोळ्यात झोप मावत नसायची, पण नीट जेवले नाही, तर रात्रीअपरात्री उठून खायला मागतील, ही भिती मोठ्यांना !
जेवण आटोपले, की गारगार झालेल्या अंथरूणावर ! अंगणातील आकाशाकडे, तारमंडळाकडे पहात, जी चांदणी समोर येई, त्याला अनुसरून काहीवेळा गोष्ट सांगीतली जाई. मग त्यात, व्याधाची चांदणी असे, शुक्राची चांदणी असे, धृवतारा आणि सप्तर्षी असत, गुरूचा वा शनिचा ग्रह दिसला हे कल्पिलेले असे, मंगळाचा तारा असे आणि अजून काही काही असे ! सर्वच ग्रहतारे आम्हाला दिसावे, किंवा समजावे, हा पण आमचा आग्रह नसे. शनीच्या साडेसातीवर हमखास उतारा आणि रामबाण औषध म्हणून ‘जय बजरंगबली’ आमच्यासमोर प्रभू रामचंद्रापेक्षाही लवून उभे असत. या सर्व गोष्टी आम्हाला सांगण्याचे काम, आनंदाने आमच्या आजोळी बहुदा करायची, ती आमची पुष्पामावशी ! ती आता या जगांत नाही. मात्र तिच्या सांगीतलेल्या गोष्टी अजून आठवतात.
तसं बघीतलं, तर गोष्टी ऐकायला कोणाला आवडत नाही ? यांत लहानमोठा असे काही नाही. जरा काही ऐकावेसे वाटले, की आजपण आपले कान टवकारले जातात. डोळ्यांसमोर चित्र आणा नुसते, की समोरचा मंचावर उभा आहे. आपला तिन्ही सप्तकात फिरणारा आवाज, कौशल्याने उपयोगात आणून सांगीतल्या जाणाऱ्या कथेतील भावभावना आपल्यापर्यंत पोहोचवीत आहे. समोर बसलेला श्रोतृवर्ग कथा ऐकण्यात तल्लीन झालेला आहे. कथा ऐकायला आलेली बाळगोपाळ मंडळी तर या जगातून, त्या कथेच्या विश्वात कधीच पोहोचली आहे. केवळ ऐकणारेच तल्लीन झालेले नाही, तर वातावरण देखील कथामय झाले आहे. त्या वक्त्याच्या भावविश्वात विरून गेले आहे. अशी अवस्था निर्माण करण्याचे सामर्थ्य असणारे वक्तृत्व, फार कमी जणांकडे असते. ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ उगीच म्हणत नाही !
ज्यांचे निरूपण, कथाकिर्तन मी ऐकले, त्यांची लहानपणापासून जसे आठवेल तशी यादी करायची म्हटले, तर प्रवचनकार, किर्तनकारांपासून सुरूवात होते, ती व्याख्यात्यांशी थांबते ! दत्तजयंती उत्सवात दत्तमंदीरात रावेरला किर्तनासाठी यायचे, ते उज्जैनकर महाराज ! नंतर दत्तमंदीरात आणि थड्यावरील तोबा गर्दीतील ज्यांचे किर्तन आठवते, ते औरंगाबादचे कमलाकरबुवा औरंगाबादकर !
तसे रावेरला खूप ऐकायला मिळाले नाही, ऐकायला मिळाले ते जळगांवला ! निजामपूरकरबुवांचे किर्तन ऐकले ! ज्यांच्या किर्तनाच्या तारखेसोबतच त्यावरील बंदीची बातमी यायची, ते गोविंदस्वामी आफळे ! अगदी अलिकडचे सांगायचे, तर आमचे मित्र, योगेश्वर उपासनी ! कामानिमीत्त पूर्वी मुंबईला, दादरला रहायचो, त्यावेळी तिथं जवळपास दोन आठवडे एका किर्तनसंस्थेत जेवण झाले की जायचो. तिथं रोज रात्री नऊ ते अकरा, असे दोन तास कोणाचेतरी किर्तन असायचे. छान वाटायचे.
ज्यांचे प्रवचन ऐकायला विद्वान मंडळी यायची, ते सोनोपंत दांडेकर, मुळेशास्त्री, विष्णूजी क्षीरसागर ! आपल्या भाषेच्या साधेपणाच्या विद्वत्तेने गुंतवून ठेवणारे राम शेवाळकर, शिवाजीराव भोसले, दाजी पणशीकर ! अभ्यास शब्दाशब्दातून जाणवे, असे न. र. फाटक, सेतुमाधवराव पगडी, पुरुषोत्तम नागेश ओक, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ! काव्य-शास्त्र-विनोद व साहित्यातले अनुभव सांगणारे - विद्याधर गोखले, ना. सं. इनामदार, ग. वा. बेहरे, जयंत नारळीकर, आदिती पंत !
—— काय आणि किती नांवे सांगावीत ? मात्र माणूस वयाने कितीही मोठा झाला, तरी त्यांच्यापुढं असणारा एक चेहरा, कायम असतो; तो पुसला जात नाही. त्याच्या पुढच्या आयुष्यात यापेक्षा देखील अनेक कर्तृत्ववान भेटतात, पण हा बालमनांतील चेहरा या सगळ्यांना दशांगुळे पुरून उरला असतो. तसा माझ्यासमोर एक प्रसिद्ध चेहरा आहे, आमच्या गांवच्या किर्तनकार, सुधाकर देवराव मुकीम उपाख्य मुकीमबुवा यांचा ! नारदीय किर्तन परंपरा मानणारे आणि पाळणारे ! त्यांचे मी ऐकलेले बहुदा शेवटचे किर्तन म्हणजे, माझ्या मुलाच्या पहिल्या जन्मदिनी झाले ते ! त्यांचे आणि आमचे पिढीजात संबंध आणि जाणेयेणे ! त्यांना मला जिथे शक्य असेल तिथे ऐकले !
तसे ते सांगत, की ते मूळचे पैठणच्या गोदाकाठचे ! त्यांचे पूर्वज म्हणजे संत अमृतराय ! त्यांचे आपल्यालाला माहीत असलेले, प्रसिद्ध पद म्हणजे - ‘अजि मी ब्रह्म पाहिले’ हे आशा भोसले यांनी गाऊन सोन्याला सुगंध दिलेले पद ! मात्र कधीतरी हे पैठणच्या एकनाथांच्या गोदाकाठाला सोडून रावेरला मुक्ताईच्या तापीकाठी आले, आणि तिथेच स्थायिक झाले. त्यांच्याकडचा ‘दास नवमीचा’ मोठा उत्सव ! त्यांची आवडती आख्याने म्हणजे - प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, संत नरसी मेहता, चिलयाबाळ, संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत सेना न्हावी, संत सावता माळी, संत गोरा कुंभार, दामाजीपंताचे आख्यान अशी पुराण आणि संत महात्म्यांची कितीतरी असायची !
सध्या दूरदर्शनवर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ सुरू आहे, ते बघतोय ! आणि आज त्यांचे अजून एक आख्यान आठवले, ते म्हणजे ‘इंद्रजीत वध आख्यान’ म्हणजे सती सुलोचना - इंद्रजिताची पत्नी’ हिची कथा !
आपल्या नेहेमीच्या अमृतराय यांच्या पदाने, म्हणजे ‘आम्ही जाणो हरिचे पाय’ किर्तनाची सुरूवात व्हायची. पूर्वरंगात एखाद्या श्लोकाचे निरूपण केले, की उत्तररंग सुरू व्हायचा. पूर्वरंगातील निरूपणास अनुरूप अशी कथा सांगीतली जायची. आम्हा बाळगोपाळांच्या दृष्टीने ती गोष्ट महत्वाची असायची. रामरावण युद्धातील इंद्रजीत वध आख्यान लावायचे काही वेळी ते !
प्रभू रामचंद्राचे सीतावियोगाचे दु:ख, सीतेला तिच्या पतीचा म्हणजे रामाचा होणारा विरह आणि रावणाने तिचा आरंभलेला छळ, रावणाचा पराक्रम आणि तो धर्माचरण न केल्याने कसा वाया गेला, कुंभकर्ण आणि विभीषणाने रावणाला समजवण्याचा वेगवेगळ्या वेळी केलेला अयशस्वी प्रयत्न आणि त्यांनी निवडलेले मार्ग ! यासोबत ते सांगत, ते रावणाचा पुत्र मेघनाद हा इंद्रजित कसा झाला, आणि त्याचा रामरावण युद्धातील पराक्रम !
महापराक्रमी रावणाचा मुलगा मेघनाद, म्हणजे इंद्रजिताची पत्नी, सुलोचना, ही नाग वंशाची ! शेषनागाची मुलगी, म्हणजे पराक्रमी व प्रसिद्ध घराण्यातील ! आपल्या मुलीची प्रत्येक पित्याला असलेली काळजी, प्रत्येक मुलीला, आपल्या वडिलांचा असलेला अभिमान आणि आपल्या संकटाच्या वेळी ते कोणत्याही परिस्थितीत धावून येत, मुलीचे संकट दूर करतील, हा त्यांच्याप्रति असलेला विश्वास !
बापलेकीच्या नात्याला आणि त्यातील चिवटपणा, रेखाटायला भलेभले थकतात ! आपल्या मानसकन्येची, शकुंतलेची रवानगी तिच्या सासरी करतांना, आपल्या भावना रोखू न शकणारे कण्व मुनी ! त्याचे चित्रण करून संस्कृतातील ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ ही सर्व साहित्यातील अजरामर कलाकृती, निर्माण करणारा, कविकुलगुरू कालीदास ! साहित्याचा विषय ही मोठा, आणि कलाकृती निर्माण करणारे पण मोठे !
सुलोचना, जिचे नयन म्हणजे डोळे सुंदर आहे, अशी ! पतिव्रता ! अलिकडे सुलोचना, हिचे डोळे कसे असतील ते सांगता येत नाही. सीताकांत स्मरण जयजय राम, हऽऽऽरी विठ्ठल ! बुवासाहेब सांगत असायचे ! रामायणातील इंद्रजीत हा महापराक्रमी, आपल्या पित्यासारखाच ! त्याने प्रत्यक्ष इंद्राचा पराभव केला, म्हणून तो इंद्रजीत ! याचे युद्ध झाले, ते लक्ष्मणाशी ! घनघोर संग्राम, तीन दिवस आणि तीन रात्री !
इंद्रजीताने फेकलेल्या नागपाशात रामलक्ष्मण बद्ध झाले. हनुमानाने भगवान विष्णुचे वाहन गरुडाला बोलावून नागपाशातून मोकळे केले. दुसऱ्या दिवशी पुन्हा भीषण संग्राम, यांत इंद्रजीताने फेकलेली शक्ती लक्ष्मण सहन करू शकला नाही. तो बेशुद्ध झाला. सैन्यात चिंतेचे वातावरण ! प्रभू रामचंद्रांना झोप तरी येईल का ? वैद्य सुषेण यांना आणले. महाराज, पेशंटकडून ॲडव्हान्स पैसे न घेता, औषध देणारे दवाखाने आणि डाॅक्टर होते त्याकाळी ! सीताकांत स्मरण जयजयराम !
तर महाराज, वैद्य सुषेण यांनी लक्ष्मणाची नाडी पाहून, उपचारासाठी संजीवनी वनस्पती आणायला सांगीतली. हे सर्व लंकेत तर वनस्पती हिमालयात, सूर्योदयाच्या पूर्वी ती आणायला हवी, तरच उपयोग ! बजरंगबली निघाले हिमालयात, संजीवनी वनस्पती आणायला ! तिथे पोहोचले. आजच्या गाड्यांसारखी त्यांची गाडी लेट नव्हती जात ! तिथे गेल्यावर पवनपुत्र हनुमानाला समजेना हो, सर्वच वनस्पती चमचम लखलखत होत्या. कोणती घ्यावी ? महाराज, तो रामसेवक हनुमान होता. ‘आता काय करायचे, याचे मार्गदर्शन मिळावे, म्हणून पत्र लिहीणारा, आजचा सरकारी कर्मचारी नव्हता ! रामाच्या काळातला, सत्ययुगातला होता. कलियुगातला नाही. त्याने उचलला संपूर्ण द्रोणागिरी पर्वत आणि निघाला ! सर्व अडचणी पार करून सूर्योदयापूर्वी पोहोचला. वैद्यांनी हव्या त्या वनस्पतीपासून औषध केले आणि दिले. लक्ष्मण शुद्धीवर आला. रामाच्या सैन्यात आनंदीआनंद !
सकाळी लक्ष्मण इंद्रजिताशी लढण्यास सज्ज ! त्या दिवशी मात्र लढाईची कमाल झाली ! शेवटी आपल्या अमोघ अस्त्राने लक्ष्मणाने इंद्रजिताचे हात व मस्तक उडवले. ते थेट पडले त्याच्याच प्रांगणात ! सुलोचना बाहेर आली, तो आपल्या पतीचे मस्तक आणि हात ! ती दु:खीत झाली, पण तिला शंका आली. पतिव्रता असल्याने, ‘तिने घटना काय घडली ते लिहीण्यास सांगीतले.’ तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्याने झालेली घटना, त्या हाताने लिहीली. लक्ष्मणाने आपल्या इंद्रालासुद्धा पराभूत करणाऱ्या आपल्या पतीला मारले, हे समजल्यावर तिचा संताप अनावर झाला.
‘स्वामी, काय झाले हे ? मी आपल्या पराक्रमावर निश्चिंत होते. आपल्याला जर शंका होती, तर मला कल्पना दिली असती. मी माझ्या पित्याला बोलावले असते. माझे वडिल तुमच्या मदतीला आले असते, तर जगातील कोणीही तुमचा पराभव करू शकले नसते.’ आपल्या पत्नीचे, सुलोचनेचे हे ऐकल्यावर, मात्र ते मस्तक खदखदा हसू लागले. तिला भिती वाटली.
महाराज, इंद्रजिताचे जीव नसलेले मस्तक का हसले ? बुवासाहेब, उजवा हात पेटीवर आणि डावा हात तबल्यावर ठेवून त्यांना थांबवत विचारतात. आम्ही तर अवाक झालेलो. मेलेल्या माणसाचे हात लिहून राहिले आहे, आणि मुंडके हसते आहे, हे बघीतल्यावर भुताटकी यापेक्षा वेगळी काय असणार आहे ? पण प्रत्यक्ष रामलक्ष्मणाकडून आणि हनुमंताचा उपस्थितीत हे असे भुताटकीचे प्रयोग होतील, यांवर विश्वास ठेवायला, आमचे मन तयार नसे. मात्र सुलोचनेप्रमाणे आमची पण गाळण उडाली असे.
‘महाराज, इंद्रजिताचे शिर बोलू लागते.’ बुवासाहेब सांगत असतात. आम्ही सावरून बसतो.
‘सुलोचना, ज्यांना म्हणजे तुझ्या वडिलांना, तू माझ्या मदतीला बोलावणार होती, त्या शेषनागाचेच लक्ष्मण अवतार आहे. त्यांनीच मला मारले आहे. ज्यांनी आपल्याला वाचवायचे असते, तोच जर आपणांस मारणार असेल, आपला संहार करणार असेल, तर येथील आपले कार्य संपले आहे, असे समजावे.’ इंद्रजिताच्या शिरातून हे बोलणे ऐकल्यावर मात्र तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रुधारा लागल्या.
‘आपला पती इतक्या चुकीच्या मार्गावर गेला, इतका अधर्माने वागू लागला, की प्रत्यक्ष वडिलांनी अवतार घेऊन पतीचा नाश केला. आता हे हात आणि शिर घेऊन, युद्धभूमीवर जाऊन रामलक्ष्मणांकडून प्रार्थना करून पतीचे धड आणावे आणि आपल्या पतीसोबत सती जावे.’ सुलोचना मनाशीच बोलत होती. बघताबघता ती निघाली त्यासाठी ! सतीच्या पतिव्रतेच्या विनंतीवर प्रभू रामचंद्र नाही कसे म्हणणार ?
तेवढ्यात पेटीवाल्याने भैरवीचे सुर लावलेले असतात, आणि तबलेवाल्याने तबल्यावर थाप दिली असते.
‘आता जर तुम्ही सुलोचनेला विचारले, तर ती सांगणार, ‘मला आता काही माहीत नाही, आम्ही काही जाणत नाही. आम्ही जाणतो, ते एकच ‘आम्ही जाणो हरीचे पाय !’
सर्व किर्तन डोळ्यांसमोर उभे राहीले ते रामायण पाहतांना ! मात्र त्यांत ही कथा आली नाही, का कुणास ठाऊक ? सती सुलोचना ही खूप गाजलेली कथा आहे. यांवर तीनचार विविध भाषांमधले चित्रपट पण निघाले आहेत. काल रामायणातील इंद्रजीत वध बघतांना, हे सर्व आठवले. कुठल्या वेळी, काही आठवते आणि मग लिहून ठेवावे वाटते, आपल्या सर्वांसाठी !
© ॲड. माधव भोकरीकर
(पोस्ट आवडली असल्यास शेअर करू शकतात.)

17.4.2020

No comments:

Post a Comment