Sunday, May 10, 2020

स्वररंगाची उधळण - कलर्स ॲाफ इमॅजिनेशन !

स्वररंगाची उधळण - कलर्स ॲाफ इमॅजिनेशन !
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, आणि थोडे नागपूर जर सोडले, तर विविध क्षेत्रातील कलावंत मंडळी, ही औरंगाबादला तशी कमीच आहे. मात्र याला अपवाद म्हणून, काही नांवे आहेत, त्यांत एक नांव त्यांत आहे, सौ. शुभदाताई पराडकर ! शास्त्रीय संगीतातील गायक कलाकारांमधे ठळक असलेले नांव !
सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांच्याकडे आम्हाला जाण्याचा व गप्पांचा योग आला होता. त्या गायिका म्हणून मोठ्या आहेत, तशाच गृहीणी म्हणून आदरातिथ्यात पण मोठ्या आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गाणं ऐकायला मिळाले, नाही असे नाही. मात्र त्यांना आपल्याकडे बोलवायला हवे, हे पूर्वीच ठरवलेले ! मी लाख ठरवले, पण माझ्या कोर्टाच्या कामातील रोजची गडबड आणि त्यांचा, सौ. शुभदाताईंचा, भारतातील व परदेशातील अत्यंत व्यस्त कार्यक्रम ! यांत जवळपास तीन वर्षे निघून गेलीत ! काल अचानक वाटले, आता अजिबात उशीर करायला नको. फोन केल्यावर, ‘त्या दोन-तीन दिवसांपूर्वीच’ आल्याचे समजले. ‘शुभस्य शीघ्रम्’ या उक्तीप्रमाणे ‘उद्या जमते का ?’ म्हणून विचारल्यावर सुदैवाने होकार मिळाला.
त्यांची येण्याची जी वेळ ठरली होती, त्या वेळेवर त्या हजर ! ‘सम चुकायला नको’ हे यांवर त्यांचे सांगितिक उत्तर ! कोणी घरी आलं, की माझ्यापेक्षा जास्त उत्साह असतो, तो माझ्या गृहमंत्र्यांना ! कोणाशी कसे वागावे, काय बोलावे, हे मला नीट समजत नाही, ही गृहखात्याची सुरूवातीपासूनच पक्की समजूत ! ती पक्की झाल्याचा रौप्यमहोत्सव होऊन गेला.
त्या आल्यावर गप्पा म्हणजे, त्यांच्याशी मी संगीताचे काय बोलणार ? त्या बोलतात, तेवढे ऐकावे. मात्र मला काही संगीत बैठकीच्या जुन्या आठवणी अवश्य सांगता आल्या. आकाशवाणीने आयोजित केलेल्या संगीत सभा ! आकाशवाणीची ‘चेन बुकींग’ ही चांगली योजना आता बंद पडली आहे, ही हळहळ ! आकाशवाणीच्या काही जुन्या अधिकारी व कलाकारांच्या आठवणी ! मात्र कोर्टातील आठवणी, पक्षकारांचे नमुने, कायद्याने निर्माण होणाऱ्या व त्यामुळे सुटणाऱ्या समस्या, या मात्र वकिलमंडळी सोडून सर्वांना नवीन असतात, अचंबित करणाऱ्या असतात. हे आम्हा वकिलमंडळींना बरे असते, —- समोरच्यावर थोडा तरी प्रभाव पडतो हो. (निदान आमची अशी समजूत !)
बोलता बोलता, त्यांनी बॅंकाॅक येथे झालेल्या त्यांच्या संगीत सभेची सीडी मला दिली. ‘Colors of Imagination’ या नांवाने असलेली. हुताशिनी पौर्णिमा म्हणजे होळीच्या दिवशी इतकी समर्पक भेट दुसरी कोणती असणार आहे. प्रत्यक्ष त्या कलाकाराच्या हातून आपल्याला, ही भेट मिळणं यापेक्षा काय हवे ?
गप्पा आटोपल्या ! निघतांना फोटो काढलेत ! अलिकडे फोटो काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोबत आमच्या शेजारची लहान मुलगी, अनुष्का जोशी, होती, टणटण बोलणारी ! आम्ही कुठंही असलो, तरी शेजारपाजारच्या लहान मुलांना आमचे घर, हे त्यांच्या घरापेक्षा जास्त प्रिय असते. तिचे बोलणे व बडबड ऐकून, ‘तू गाणं शिक छान’ हे सौ. शुभदाताईंनी तिला सांगीतल्यावर, तिने पण बेधडक सांगून टाकले, ‘मी मागच्या वर्षी फर्स्टला असतांना, गाणं म्हणण्यात फर्स्ट प्राइज मिळवले होते.
त्या निघून गेल्यानंतर, संध्याकाळी त्यांनी दिलेली सीडी ऐकायला घेतली. सुरूवातीला भैरव थाटातील, बिभास राग ! त्यातील बडा ख्याल, ‘अलबेलो मेरो’ ही तिलवाडा तालातील सुंदर रचना ऐकली, त्यानंतर छोटा ख्याल, ‘भोर भये अब सकल झाके’ ही तीनतालातील रचना झाली. त्यानंतर मग होता राग मुलतानी, यांतील ‘देरेना दीम’ ही झुमरा तालातील रचना, त्यानंतर ‘ता नोम तनन तन देरेना’ हा एकतालातील तराना ! शेवटी राग बसंत मधील, ‘बन भे राजे’ ही अध्धा तीनतालाच्या वजनात गायलेली रचना ! संपूर्ण कार्यक्रम आणि रेकाॅर्डिंग खरंच सुंदर आहे.
माझ्यासोबत सकाळी असलेली आणि फर्स्टमधे गाण्यात फर्स्ट प्राईज मिळवणारी, ती पण गाणं ऐकायला बसली होती. बिभास राग सुरू झाला, अप्रतिम स्वर लागत असला, की तो समजण्यास शास्त्रीय संगीताचे फार ज्ञान असण्याची आवश्यकता असत नाही. त्या छोट्या मुलीने, कोण गातेय ? हे विचारले.
‘सकाळी तू ज्यांच्याशी गप्पा मारत होती ना, त्या गात आहेत.’ मी सांगीतले.
‘काका, आपले एक चुकलेच !’ ती छोटी. मला समजेना, हिला पण चूक लक्षात यावी, असं काय घडलं ?
‘काय झालं ?’ मी विचारले.
‘आपण त्यांना गायला सांगायला हवं होतं. चांगलं म्हणताहेत !’ ती छोटी. मला हसू आले, तसेच एकदम मनांत जाणवलं की स्वराची आराधना ही परमेश्वराची आराधना असते.
निरागस असलेली लहान मुलं, या दैवी स्वराला किती लवकर ओळखतात नाही !

9.3.2020

Image may contain: 4 people, including Shubhada Paradkar and Dilip Mahajan, people sitting and people standing

No comments:

Post a Comment