Saturday, May 9, 2020

नवऱ्याचे दुसरे लग्न आणि बायकोची उलटतपासणी !

नवऱ्याचे दुसरे लग्न आणि बायकोची उलटतपासणी !

सध्या कोरोनामुळे असलेल्या रिकामपणात, माझा कोर्टाचा नेहमीचा अभ्यास थोडा रेंगाळत सुरू आहे, मात्र नव्या केसचे वाचतावाचता आपोआपच, एखादी काही जुनी  केस आणि घटना आठवू लागतात. त्यातून सुखरूपपणे ज्या पद्धतीने बाहेर पडलो, त्याचा काही इथे उपयोग, होऊ शकतो का, असा पण विचार आपल्या मनांत सहज येऊन जातो. आज एक काम चाळत होतो, त्याचा विषय आहे, पहिली पत्नी हयात असतांना, पतीने तिला कायदेशीरपणे घटस्फोट न देताच, दुसरे लग्न केल्याने, कायकाय होऊ शकेल ? त्याचे परिणाम काय होतील, कोणाला कसे भोगावे लागतील ?

तसं बघीतलं, तर विवाहासंबंधीच्या समस्या या दोन्ही कुटुंबांनी, म्हणजे मुलाकडच्या आणि मुलीकडच्यांनी, त्या विषयाचा कडेलोट होण्याच्या अगोदरच समजुतीने, आणि शक्यतोवर कोणातही कटुता निर्माण न होता, सोडवायला हव्यात; निदान काही झाले तरी पती-पत्नीच्या संबंधात कटुता यायला नको. एकमेकांत वाद होणे, आणि कटुता होणे, यांत असलेला फरक आपण कायम लक्षात ठेवायला हवा. अर्थात हे माझे मत झाले, याच्या नेमके विरूद्ध केवळ काही वकीलांचेच नाही, तर प्रत्यक्ष मुलामुलींच्या पालक व नातेवाईकांचे पण असू शकते. व्यक्ती तितक्या प्रकृती, आणि गांव तिथे हागणवाडी !

लग्नाच्या पूर्वी मुलाला आणि मुलीला देखील, त्यांच्या संभाव्य आणि कोणकोणत्या नात्याबद्दल, काय जबाबदाऱ्या व कर्तव्ये आहेत, आणि ती कशी पार पाडावयाची असतात, याची नीट माहिती द्यावयास हवी. जर दोघांपैकी कोणीही, याबाबतीत कामचुकार वाटत असेल, तर या जबाबदाऱ्या व कर्तव्ये जर पार पाडली नाहीत, तर त्याचे संभाव्य परिणाम काय, आणि कसे, तसेच किती भीषण होऊ शकतील, याची पण कल्पना द्यावयास हवी. मुलामुलींना व त्यांचेकडील माणसांनाच काय पण, सर्वांनाच आपापले हक्क चांगले माहीत असतात, ते त्यांना कोणी सांगण्याची क्वचितच वेळ येते. उलट तर, जे आपले हक्क नाही, ते पण आपले हक्कच आहे, असे पण त्यांना वाटू लागते; त्यापासून मात्र अवश्य त्यांना आवरायला हवे.

हे सर्व करतांना, वेळेचे भान अवश्य ठेवून, ‘बैल गेला आणि झोपा केला’ असे व्हायला नको. अशी वेळ तर अजिबात येऊ द्यायला नको, की नंतर दोन्हीकडच्यांची जरी आपसांत सामोमपचाराने एकत्र यावे, अशी इच्छा निर्माण झाली, तरी दोघांच्या परतीचे दोर दोन्हीकडून, अथवा कोणा एकाकडूनही कापले गेले असल्याने, ते जमणे शक्य होणार नाही. त्यातून त्यांच्यात नंतर जी आयुष्याबद्दलची उदासीनता, वैफल्य निर्माण होते, त्यातून ते क्वचितच त्याच्या पुढील आयुष्यात सावरले जातात ! शेवटी दोघांनाही जगायचे असते, ते जगतात; मात्र त्यात राम नसतो.

आम्हा वकीलांना काय, मुलीच्या किंवा मुलाच्या वतीने, जो येईल, त्याच्यावतीने काम चालवावे लागते, आणि त्यांना उपलब्ध होऊ शकणारी कायद्याची मदत द्यावी लागते. प्राप्त परिस्थितीत मुलामुलींनी आणि त्या दोघांच्या नातेवाईकांनी त्या केसचा, आणि मुलामुलींच्या आयुष्याचा, जो काही घोळ घालून ठेवला असतो, त्यांच्यासह आमच्याकडे काम येते. आतापर्यंत अशी बरीच कामे आली आहेत, चालवली आहेत. या केसचा निर्णय हा माझ्याबाजूने समाधानाचा एकच असतो, तो म्हणजे हाच, की - ते दोघे एकत्र सुखाने नांदू लागले ! मात्र नेहमी आपल्या मनाप्रमाणेच होईल, असे होत नाही. मागे इथे लिहीलेल्या एका आठवणीत, एकदा दोघे सुखाने नांदू लागल्याचे लिहीले होते. आता एक आठवण आहे, ती एकत्र जमण्याची शक्यता असल्यावर पण, हलगर्जीपणाने त्यांचा संसार मोडला. हलगर्जीपणास अर्थात, मी कोणा एका बाजूस जबाबदार धरणार नाही, त्याला दोन्ही जबाबदार ! कोणी कमी, तर कोणी जास्त !

ही घटना साधारणत: सन १९८७-९० दरम्यानची ! मी बाररूममधे बसलो होतो. माझा कारकून पंढरी निरोप घेऊन, एकासोबत माझ्याकडे आला. सोबत आलेल्याजवळ याच तालुका न्यायालयाची नोटीस आणि त्यासोबत आलेले कागद होते. सोबत सात-आठ जण होते. मी उठलो, आणि लालचंदच्या हाॅटेलकडे निघालो. एका ठिकाणी बसून, चहा पिता पिता, व्यवस्थित माहीती घेता यावी, यासाठी !

मी बऱ्याचवेळा कागद नंतर वाचतो, त्यांत क्वचितच संपूर्ण हकीकत लिहीलेली असते, त्याची अनेक कारणे आहेत; पण आलेल्या पक्षकाराला मात्र त्याची हकीकत तपशीलवार विचारतो, तशी त्याला पण विचारली ! विचारल्यावर त्याने सांगीतले, ते - नुकतेच काही वर्षांपूर्वी त्याचे लग्न झालेले ! जेमतेम शिकलेला हा मुलगा, वर्णाने काळासावळा आणि तब्येतीने उत्तम ! एका राष्ट्रीय बॅंकेत शिपाई म्हणून असलेला, नोकरीत कायम झालेला ! भविष्यात पदोन्नतीने कारकून व त्यापुढील पण संधी होत्या त्याला ! मुलाचे एवढे चांगले स्थळ कोण सोडणार ? मुलीवाले शोधात असतातच, त्याप्रमाणे जवळच्या खेड्यातील आणि त्याच्याच समाजातील मुलीशी, त्याचे यथावकाश लग्न झाले. मुलगी लग्न झाल्यावर त्याच्याकडे आली. घरी मुलाचे आईवडील, एक लग्न झालेला व एक लग्न न झालेला भाऊ ! सर्व जवळपास एकत्र असलेले, त्यामुळे अपेक्षा ही की, नव्या नवरीने सर्वांसोबत खेळीमेळीने रहावे. घरातील पडणारे काम बिनबोभाट, स्वत:चे घर असल्याने करावे ! अर्थात ही अपेक्षा काही फार गैर नव्हती. त्यांचे काही महिने सुरळीत गेले. मग मात्र याच्या बायकोने, तणतण सुरू केली; त्यात ठरल्याप्रमाणे तिच्या वाटेचे काम न करणे, स्वयंपाकपाणी न करणे, तिच्या सासूसासऱ्यांना जेवायला न वाढणे, लहान दीराला काहीतरी टोचून बोलणे, हा प्रकार काही दिवस ! त्याला हे त्याचे आईवडील सांगायचे व त्याच्या जवळपास विरूद्ध त्याची बायको सांगायची ! समजवण्यात काही दिवस गेले, मार्ग निघेल या आशेवर ! हा बॅंकेत शिपाई असल्याने बॅंकेत सर्वात अगोदर जायचे, आणि बॅंक बंद झाल्यावर घरी यायचे, हा नित्यनेम झाला होता. कसेतरी धकवणे सुरू होते. मग अडेलतट्टूपणा सुरू झाला, मुद्दाम खोड्या काढणे सुरू झाले. एकदा जेवणाच्या डब्यात उंदराच्या लेंड्या सापडल्या, आणि मग एकदम आरडाओरड झाला. संध्याकाळी ‘तुझी बायको आम्हाला मारायला निघाली आहे’ असे सांगत आईवडिलांनी, त्याला घडलेली घटना सांगीतली. रात्री बायकोने अजून काही वेगळे सांगीतले. तो या नित्याच्या घरातील व बॅंकेतील कटकटीने कावून गेला होता. शेवटी एकीकडची म्हणजे घरातील कटकट कमी होईल व वातावरण बदल म्हणून, त्याने बायकोला माहेरी आणून सोडले. तिच्या माहेरी घडलेल्या सर्व हकीकती, आडपडदा न ठेवता, दोघांच्याही सांगीतल्या ! त्यांवर मात्र तिच्या आईवडिलांनी अविश्वास दाखवला, मुलीने त्यांचे, म्हणजे तुमच्या माणसांचे, का करावे ? तुम्ही वेगळे का रहात नाही ? हा प्रश्न पण उपस्थित केला. याला आश्चर्य वाटले.
‘माझी बदली आता होण्यात आहे. बदली झाल्यावर आपोआपच मार्ग निघेल. काही दिवस कळ काढा.’ हे त्याने सामोपचाराचे सांगीतले.
‘आमची पोरगी, त्यांचे करण्यासाठी तुमच्याकडे दिली नाही.’ यांवर त्यांचे उत्तर !
‘विषय ताणण्यात अर्थ नाही. आईवडीलांनी माझे केले आहे, आता माझी जबाबदारी आहे त्यांच्या म्हातारपणी करण्याची ! आता तुमची सून तुमच्यातच रहात आहे ना ? ती पण तुमचे करते आहे ना ?’ या त्याच्या प्रश्नावर, ‘तो आमच्या घरचा मामला आहे. तुम्ही त्यात लक्ष घालून, आमच्यांत भांडणे लावू नका.’ असे बजावले.
‘हे पहा, मी सरकारी नोकर ! बॅंकेतील त्या दिवसभराच्या कामाने पिचून जातो, त्यात घरी आल्यावर कोणी कटकट करू नये, असे वाटते. आईवडीलांना जास्त काय सांगणार ?’ असे म्हटल्यावर, विषय थांबला. जेवणे झाली. तो रात्रभर तिथे राहीला. सकाळी एकटा त्याच्या घरी आला. येतांना बायकोला व तिच्या आईवडीलांना ‘मी बदलीचा प्रयत्न करतो, तो पर्यंत तिला इथेच राहू द्या !’ हे शांततेने सांगीतले.

दोनचार महिने गेले. त्याची बदली झाली नाही. एक दिवस बॅंकेच्या पत्यावर त्याला रजिस्टर आले. त्याने सोडवले, तर त्यात ‘तुमच्या बायकोला नांदवायला घेऊन जावे’, म्हणून वकीलांची नोटीस ! दुसऱ्यातिसऱ्या दिवशी, हा सोबत दोनचार लोकांना घेऊन, तिच्याकडे तिला आणायला गेला. तिथे गेल्यावर त्यांचेपण सातआठ जण होते. बरीच चर्चा होऊन, ‘बदली का होत नाही ? बदली झाल्याशिवाय किंवा स्वतंत्र घर घेतल्याशिवाय, आम्ही मुलीला पाठवणार नाही. आमची मुलगी तुमच्या माणसांचे करायला तुम्हाला दिली नाही.’ वगैरे वगैरे असे भरपूर बाचाबाचीचे ऐकून ही मंडळी, मुलीला न पाठवल्याने, मुलीशिवाय परत आली. याचे मनस्वास्थ्य हरवले ! कामाच्या धबडक्यात, आणि काहीतरी मार्ग निघेल या आशेवर, पुन्हा दोनचार महिने गेले. दरम्यान तिकडून आडूनपाडून धमकीचे निरोप याला येऊन गेले.
‘तुमची सरकारी नोकरी आहे, हे लक्षात ठेवा. माझ्या मुलीशी जास्त चालबाजी कराल, तर नोकरीतून घरी बसवेल !’ अशी धमकी आल्यावर, मात्र हा विचारात पडला. त्याच्या पुढील आयुष्याचा आणि भवितव्याचा प्रश्न होता. आज नमते घेऊन आणले, तरी ‘स्वभावावर औषध नसते’, पुन्हा असे काही अजून होणारच नाही, याचा भरवसा कोणी द्यावा ? ही याची अवस्था त्या बैठकीतला एक सूज्ञ आणि धूर्त इसम होता, त्याने ओळखली, ‘पोरा, आयुष्यभर ही मानेवर सुरी घेऊन जगणार आहे का ? मान काटली गेल्यावर काय ? नीट विचार कर !’ हे विचारल्यावर त्याच्या बदलीचा विचार मागे पडला, आणि तसेच तिला परत माहेरून पण आणायचा विचार मागे पडला.

एक दिवस त्याच्या बॅंकेत कोर्टाचा बेलिफ, त्याची विचारणा करत आला. त्याला त्याने तातडीने बाहेर नेले. चहापाणी केले. त्याने दिलेले कोर्टाचे कागद बघीतले, तर खावटीची नोटीस ! तिथल्या वकीलांकडे जाणे भाग होते. त्यांनी सांगीतले, ‘तुमची बायको आहे, तर खावटी द्यावी लागेल.’ त्याला याची ना नव्हतीच ! कोर्टाच्या तारखा सुरू झाल्या, यांत साधारणत: वर्ष निघून गेले. समोरचे काहीही करायला तयार नव्हते. ते मला धडा शिकवणार होते. दरम्यान त्या सूज्ञ व धूर्त माणसाने, ‘तिला आणायचे नाही, हे नक्की आहे, तर तुमचे आयुष्य काय वाया घालवताय ? माझे ऐका, तुम्ही दुसरे लग्न करून घ्या !’ म्हणून सांगीतले.
‘मी सरकारी नोकर ! असे काही केले, तर माझी नोकरी जायची !’ मी हे सांगीतल्यावर, ‘तुम्ही काळजी करू नका ! माझी पोरगी लग्न झाले नाही, असे गरज पडली तर कोर्टात सांगेल !’ असे सांगीतले. शेवटी विचार करकरून डोके बधीर व्हायची वेळ आली. परिणामी गुपचूप लग्न झाले. ही बातमी कशीतरी नंतर त्यांना समजली. त्यांनी ही दुसरे लग्न केल्याची केस केली.

माझ्या सर्व लक्षात आले. मी त्याने दिलेल्या कागदावर नजर टाकली, आणि ते बघून ‘यांत दिलेल्या तारखेला सर्वांना कोर्टात हजर ठेवा, आणि सोबत येतांना जामिनदार घेऊन या’ असे सांगीतले. त्या ठरलेल्या दिवशी सर्व आले. केसमधे हजर झालो, जामीन दिले. इतर आरोपींची गैरहजेरीची माफी मिळावी म्हणून अर्ज दिला. तो काही अटींवर मंजूर झाला. नंतर प्रत्येक तारखेस तो नियमीत येऊ लागला. यांत वर्ष संपले. पुढे काहीच होईना ! त्याने मला विचारल्यावर, ‘तुझे लग्न झाले आहे ना ? आता तुला काय अडचण आहे ? जे केले आहे, ते मला विचारून केले का ? मग आता धीर धर ! निष्कारण घाई करू नको.’ त्यांवर तो गप्प बसला. इकडे त्या मुलीकडच्यांचा जो समज होता, की वर्षभरात याला खडी फोडायला पाठवतो, आणि नोकरी घालवतो, तसे होईल का नाही, त्याबद्दल त्यांना पण शंका यायला लागली. काहीही होत नव्हते. तारखेवर येणे, थांबणे आणि तारीख मिळाल्यावर पुढच्या तारखेला येणे !

एकदा कोर्टासमोर, त्यांच्या वकीलांनी आमच्या पक्षकाराची गैरहजेरीची परवानगी रद्द करावी, म्हणून अर्ज दिला. तो कोर्टाने रद्द केला. यांवर निदान केस तरी चौकशीला लावा, ही त्यांची विनंती कोर्टाने मंजूर केली. पुढील तारखेस मी त्याला व त्याच्या दुसऱ्या पत्नीला हजर रहाण्यास सांगीतले. येतांना फी बाकी आणण्यास सांगीतले. तारखेवर ते आले. नंतर पण चारपाच तारखा अशाच गेल्या. एकदा मुहूर्त लागला. कोर्टात याची तक्रारदार असलेली, पहिली बायको आली होती. केस सुरू होण्यापूर्वी तिच्या वकीलांना, मी ‘वस्तुस्थिती तुम्हाला माहीत आहे. यांत आपसात काही होईल का’, हे विचारले. ते मनाने सरळ होते. माझ्यापेक्षा वयाने बरेच मोठे होते. त्यांनी हे त्यांच्या पक्षकारांना विचारल्यावर, त्यांनी त्यांच्याच वकीलांवर शंका घेतली. शेवटी केस सुरू झाली.

तक्रारदार बायकोने, तिच्या तक्रारीत सांगीतल्याप्रमाणे जबाब दिला. पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदीरात लग्न लागले, दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घातले. तिथे आम्ही होतो. हरकत केली. आम्हाला धमकी दिली. हा कालवा झाला. आम्ही घाबरून परत आलो. इथे केस केली. हे अगदी व्यवस्थित आल्याने, तिकडील बाजू खूष होती. मी पक्षकाराला, ‘तक्रारीत लिहील्याप्रमाणे घडले का ?’ हे विचारल्यावर त्याने नकार दिला. नेमके काय झाले, हे विचारल्यावर त्याने सर्व सांगीतले. काळजी करू नको, केस जर काल्पनिक असेल, तर साक्षीदार टिकणार नाही, आपल्या बाजूने निकाल लागू शकतो, असा धीर दिला. त्याच्या नोकरीचा प्रश्न होता.

आता मी तिची उलटतपासणी घेणार होतो. पुराव्याच्या कायद्यातील सर्व तरतुदींचे कटाक्षाने पालन करून, साक्षीदाराला त्याचे चारित्रहनन होईल असे प्रश्न शक्यतोवर न विचारता, त्याच्या उपलब्ध असलेल्या जबाबाच्या बाहेर न जाता, त्याच्या जबाबातील सर्व विधाने, त्याच्याच उलटतपासणीच्या जबाबाने पुसून टाकणे, हे सोपे नाही. उलटतपासणी घेतांना आपले डोके शांत ठेवायचे. आपण कोणत्याही परिस्थितीत चाकोरी न सोडतां प्रश्न विचारायचे असतात. साक्षीदार धूर्त असेल, सहजासहजी उत्तर न देणारा असेल, तरी त्याच्या तोंडून हवी ती उत्तरे काढावयाची असतात. त्याला बोलते करावयाचे असते, नुसतेच बोलते नाही, तर त्याने अनावश्यक पण बोलायला हवे. तरी देखील आपण आपल्याच विरूद्ध उत्तरे देतो आहे, हे उत्तरे देणाऱ्यास समजायला नको. आपल्या केसमधील आपला संभाव्य बचाव, हा त्याच्या लक्षात यायला नको. हे सर्व अभ्यासाने आणि अनुभवाने येते.

उलटतपासणी सुरू झाली.
‘तुमचे शिक्षण काय झालेय ?’ मी.
‘दहावी !’ तक्रारदार पहिली बायको.
‘तुमची नेमकी तक्रार तुम्ही सांगीतली, पण या लग्नाच्या वेळी खरोखर कोणकोण होते ?’ मी. तिने यादीत दिलेल्या नावांव्यतिरिक्त अजून नांवे सांगीतली. त्यांची साक्ष घेणार असल्याचे पण सांगीतले.
‘सध्या काय चातुर्मास सुरू आहे का ?’ मी एकदम वेगळा प्रश्न सहज बोलल्यासारखा टाकला.
‘हो. आषाढी ते कार्तिकी एकादशी पर्यंत असतो.’ तक्रारदार पहिली बायको.
‘तुमच्या गांवात तर लगीनसराईची झुंबड उठली असेल नाही ? तुमच्या घरात कोणाचे ठरले की नाही ?’ मी. न्यायाधीशांनी आणि तक्रारदार पहिली बायको, या दोघांनीही माझ्याकडे चमत्कारिक दृष्टीने बघीतले. न्यायाधीशांच्या डोळ्यांत ‘दुसऱ्या लग्नाच्या केसमधे यांनी चातुर्मासाचे काय विचारणे लावलेय’ ही भावना ! आणि तक्रारदार पहिली बायको हिच्या डोळ्यांत, ‘नवऱ्याने काय पण वकील शोधलाय ?’ ही भावना !
‘अहो, चातुर्मासात कधी लग्न होतात का ?’ तक्रारदार पहिली बायको.
‘नाही, मला विचारायचे होते, आषाढी किंवा कार्तिकीला किंवा कधी पण पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला, तुम्ही कधी तिथं गेला होता का ?’ मी.
‘आता मी काय सांगते ? आम्ही सर्व तिथं गेलो होतो. तिथंच तर ही भानगड झाली.’ तक्रारदार पहिली बायको.
‘पहा बुवा, मी काही पंढरपूर अजून बघीतलं नाही. तुम्ही कोणत्या मंदीरात गेल्या होत्या ? तिथं तर पांडुरंगाची खूप मंदीरे असतील ?’ मी. न्यायाधीश आणि तक्रारदार पहिली बायको यांनी पुन्हा माझ्याकडे बघीतले. दुसऱ्या लग्नासंबंधाने मी एकही प्रश्न न विचारता, भलतेच प्रश्न विचारतो आहे, ही भावना होती, पण त्यापेक्षा ‘मी असे का विचारतो आहे’, याची उत्सुकता जास्त होती, कारण त्यांच्यासमोरचे माझे काम ! मात्र तक्रारदार बायकोची खात्री झाली, की वकीलात काही दम नाही.
‘जिथं यात्रा भरते, त्याच पांडुरंगाच्या मंदीरात झाली झुम्मड !’ तक्रारदार पहिली बायको.
‘पांडुरंग कुठे आणि रखुमाई कुठे होती ?’ मी. आपल्या नवऱ्याला हा तुरूंगात पाठवणार, या आत्मविश्वासाने तिने उत्तर दिले !
‘आता रखुमाई कुठे असणार हो ? पांडुरंगाच्या शेजारीच ! चांगले हिरवेगार लुगडे नेसले होते, आणि पांडुरंगाचा पिवळा पितांबर !’ तक्रारदार पहिली बायको.
‘काय सांगता ?’ मी !
‘साहेब, या अशा घटनेला कोण विसरणार आहे ? माझं नशिब फुटले आणि विठ्ठल-रखुमाई समोर या माणसाने दुसरे लग्न केले हो !’ तक्रारदार पहिली बायको. तिने तिच्या दृष्टीने तिची साक्ष अजून पक्की केली.
‘जाऊ द्या बाई ! पण तुम्ही पंढरपूरला गेले कसे ?’ मी.
‘सकाळी भुसावळला गेलो. तिथं गाडी उभीच होती !’ तक्रारदार पहिली बायको. भारतात रेल्वेने कुठेही जायचं असेल, तर आम्हाला सर्वात सोयीचे रेल्वे स्टेशन भुसावळ आहे. तिथे जावेच लागते. त्यामुळे मला त्याचे काही आश्चर्य वाटले नाही. पण पुढे कसे गेले, हे समजणे आवश्यक होते.
‘बरं मग ? सकाळी भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर पुढे काय ?’ मी.
‘असं हो कसं ? सुरत पॅसेंजर तिथे होतीच, लगोलग बसलो अन् गाडी निघाली ! दुपारपर्यंत तिथे !’ तक्रारदार बायको. यांवर मी काही बोललो नाही. नेहेमीच्या ‘सजेशन्स’ दिल्या. त्याला तिने जोरात नकार दिला. कोर्टाचा स्टेनो सर्व जबाब टाईप करत होता.

त्यांचे नंतर दोन साक्षीदार झाले. त्यांना पण तुमच्याजवळ प्रवासाची तिकीटे आहेत का ? पंढरपूरच्या पोलीसांकडे तक्रार का नोंदवली नाही ? त्यांवर त्यांनी दिलेली उत्तरे पण स्टेनोने टाईप करून घेतली. त्यांनी पुरावा संपल्याचे सांगीतले. आम्हाला कोणतेही साक्षीदार तपासावयाचे नाही, हे आम्ही सांगीतले. आम्ही सर्व कोर्ट हाॅलच्या बाहेर आलो. त्यांच्या वकीलांनी माझ्या पाठीवर हसतहसत थाप मारली. मी पण हसलो. त्यांच्या पुढच्या काही दिवसांत केस युक्तीवादाला लागली.

तक्रारदार यांच्या वकिलांनी युक्तीवाद केला. महिलांवर कसे अन्याय व अत्याचार होऊन राहीले आहेत. तिने तिचे आयुष्य कसे घालवावे, समाजात अशा लोकांना संरक्षण दिले, तर अनागोंदी वाढेल. न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडेल ! समाजस्वास्थ्य टिकण्यासाठी आरोपीला कडक शासन होणे आवश्यक आहे.

या नंतर मी युक्तीवाद करतांना, आपली न्यायव्यवस्था चांगली आहे. काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवून ती कोणासही शिक्षा देत नाही, हे ठासून सांगीतले. तसेच तक्रारदार बायकोने, आमच्यावर दाखल केलेली केस काल्पनिक आहे, हे दाखवण्यासाठी त्यांत तीनच मुद्दे सांगण्यासारखे होते -
पहिला म्हणजे मूळ तक्रारीतील दिनांक ही चातुर्मासात येत होती, आणि चातुर्मासात कोणी लग्न करीत नाही. तो दिवस पण चांगला नव्हता. माझे पंचांगाचे ज्ञान कामास आहे. हा मुद्दा वाईट नव्हता, पण खूप टिकण्यासारखा नव्हता. कारण तिथी, मुहूर्त वगैरे न पाळता, कोणी लग्न करणारच नाही, असे सांगता येत नाही.
दुसरा मुद्दा पूर्वीच्या तुलनेने बिनतोड होता, पंढरपूरच्या मंदीरात विठ्ठल आणि रखुमाई शेजारी नाहीत, याची नोंद पुराव्याच्या कायद्यानुसार भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, न्यायालय स्वत: घेऊ शकते. त्यामुळे ही तक्रार काल्पनिक असून रद्द करावी, ही विनंती केली.
तिसरा मुद्यावर तर उत्तरच नव्हते, भुसावळहून निघणाऱ्या सुरत पॅसेंजरने पंढरपूर हे ठिकाण लागतच नाही. त्यामुळे ही सर्वथा खोटी केस असून रद्द करावी. आणि आमच्या पक्षकाराला नुकसानभरपाई मिळावी, ही विनंती !

न्यायाधीश माझ्याकडे बघत हसले, ‘नुकसानभरपाई हवी, तुमच्या पक्षकाराला ?’
‘हो, केस खोटी व काल्पनिक आहे, या निष्कर्षाला आले असाल, तर नुकसानभरपाई द्यावी, ही आमची विनंती आहे.’ मी. न्यायाधीशांनी आमच्याविरूद्धची केस रद्द केली, पण नुकसानभरपाई दिली नाही. मात्र आमचा पक्षकार कमालीचा खूष होता !

त्याने पहिले लग्न अस्तित्वात असतांना केलेले, दुसरे लग्न आता धोक्यात येणार नव्हते. मात्र दुसरे लग्न पूर्वीच झाले असल्याने, आणि आता केसचा पण निकाल, त्याच्या बाजूने लागला असल्याने, तो हिच्याकडे अजिबात पहाणार नव्हता. आता या तक्रारदार बायकोला दुसरे लग्न करावयाचे असेल, तर त्याच्यापासून घटस्फोटासाठी, तिला त्या नवऱ्याचे पाय धरणे आवश्यक होऊन बसले, अन्यथा तो देत असलेली खावटी आयुष्यभर घेत, उरलेले आयुष्य कंठणे तिच्या नशिबात उरले होते.

—- माणसाने ताणावे, अवश्य ताणावे, कदाचित काही वेळा त्यामुळे लाभ पण होवू शकतो; पण कोणत्याही परिस्थितीत तुटेपर्यंत ताणू नये. नंतर हातात काहीही रहात नाही !

© ॲड. माधव भोकरीकर

(पोस्ट आवडल्यास आपण शेअर करू शकतात.)

No comments:

Post a Comment