Sunday, May 10, 2020

माझे दंतपुराण !

माझे दंतपुराण !
एकदा माझा दांत दुखत होता. दातांच्या डाॅक्टरकडे गेलो होतो. तिथं त्यांची ती खुर्ची, त्यांत बसलो. मला आ करायला सांगून, माझ्या तोंडावर काहीतरी बसवले, तर मला तोंड मिटतां येईना. तोंडांत मग त्यांची विविध आयुधे टाकली, रस्त्यावर मजूर लोक ड्रिलींग करतांना जसा आवाज काढतात, तसा आवाज येत असल्याने, त्याची आठवण झाली. वेदना तर होत होतीच. नंतर कसली तरी रबरी नळी हातात घेतली आणि फाऽऽस्स फुस्सऽऽ करत नळीने हवा दातांत सोडून झाली. तोंडावर बसवलेले स्टीलचा जबडा नंतर काढला, त्यामुळे बोलता आले. मी काही बोलायच्या आंत, ‘गुळण्या करा’ म्हणून सूचना ! गुळण्या केल्यावर, गुळणीचे पाणी लालभडक ! तोंडात काहीतरी रक्तरंजित क्रांती झालेली दिसत होती.
‘तिकडे पाहू नका. पुन्हा गुळणी करा. स्वच्छ पाणी येईपावेतो.’ डाॅक्टर !
पुन्हा गुळण्या ! पुन्हा आ आणि पुन्हा तोंडावर ते स्टीलचा जबड्याची उघडझाप बंद करणारे बसवून झाले. पुन्हा नळी तोंडात आणि हवेचे फास्सऽऽऽ फुस्सऽऽऽ !
‘जीभ हलवू नका हो !’ डाॅक्टर !
‘जिभेला हाड नसल्याने ती आपोआप हलत असावी’ हे मी सांगणार होतो, पण जबड्यावर ते बसवल्याने काहीही बोलता येईना. वकिलाचे बोलण्याचेच शस्त्र निकामी करून, हे डाॅक्टर माझ्याशी बोलत होते. बोलत कशाला, आदेश देत होते, मी यथाशक्ती मुकाट पाळत होतो.
तेवढ्यात त्यांच्या कंपाउंडरने माझे पूर्वीच दाताचे फोटो काढले होते, ते आणून दिले. माणसाचे फोटो काढतात, हे लहानपणापासून माहीत होते. शाळेत विज्ञानाची ओळख झाल्यावर ‘शरीरातील हाडे आणि त्यांची रचना’ शिकतांना क्ष-किरण वगैरेची ओळख झाली. तेव्हा हाडांचे पण फोटो काढतात हे समजले. मात्र दातांचा फोटो काढतात, हे तोपर्यंत माहीत नव्हते. आता ते पण समजले. त्यांनी क्ष-किरण, ज्ञ-किरण वगैरे काय ती तपासणी केली, नंतर या निष्कर्षाला आले, की एक दांत काढावा लागेल. त्याची फी सांगीतली. एका दातांवर आणि दातासाठी इतके पैसे लागतात, हे पाहून मी माझ्या तोंडातील बत्तीस दातांचा मनातल्या मनांत हिशोब केला. असा जर खर्च झाला, तर नंतर दातांवर मारून फेकायलासुद्धा पैसे रहातील का नाही, ही शंका आली. दांत कोरून पोट भरावे लागण्याची वेळ यायला नको, असे पण वाटले. मी माझ्या विचारात होतो, आणि डाॅक्टरांचे काम सुरूच होते. त्यांनी काय केले, माहीत नाही, पण जीवघेणी की काय म्हणतात, ती कळ निघाली.
‘तुम्हाला योग्य वाटेल, ते करा !’ मी खुणेनेच सांगीतले.
त्यांनी माझ्या तोंडावर बसवलेला, तो स्टीलचा जबडा जामर काढला. पुन्हा गुळण्या, पुन्हा लालभडक पाणी ! डाॅक्टरांनी मग त्यांच्या टेबलवरील इंजेक्शनला छोटी तिरपी सुई जोडली. त्याच्यात बाटलीतून कसले औषध घेतले. माझ्याजवळ आले. तोंड उघडण्यास सांगीतले. मी तोंड उघडले, पण इंजेक्शन द्यायचा आणि माझे तोंड उघडण्याचा काय संबंध हे लक्षात येईना. इंजेक्शनच्या वेदनेमुळे, जी वेदना होईल, आणि आरोळी ठोकली जाईल, त्यावेळी ‘आ वासला जाईल’ त्यावेळी वेळ वाया जाऊ नये, ही काळजी घेत असावेत, हा पण विचार मनांत आला.
‘इंजेक्शन तोंडात गालाला आंतून द्यायचे आहे, म्हणजे बधीरता येईल. दांत काढतांना त्रास होणार नाही. काळजी करू नका, एका इंजेक्शनने काम होईल.’ इति डाॅक्टर !
मी काही म्हणेपर्यंत त्यांनी इंजेक्शन दिले, आणि ‘दहा मिनीटांनी आपण बघू. बधीरता यायला तितका वेळ लागतो’ असे सांगीतले. मी त्या खुर्चीतून उठून बाकावर बसलो. त्यांचा दुसरा पेशंट माझ्याकडे पहात, त्या मी रिकाम्या केलेल्या खुर्चीत बसला.
आता दहा मिनीटे मला काही काम नव्हते. माझ्यावर केलेले सर्व प्रयोग, डाॅक्टर त्याच्यावर पण करत होते. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि व्यक्त होणाऱ्या भावभावना, तसेच उत्स्फूर्त प्रतिक्रिया पाहतांना दहा मिनीटे संपली, आणि त्या पेशंटला त्यांनी क्ष-किरण काढण्यास पाठवले. मला पुन्हा खुर्चीत बसायला बोलावले. मी मुकाट बसलो.
त्यांनी कसलीशी सांडशी घेऊन, दातांवर टाकटूक केले. मला वेदना झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. काहीशा आश्चर्याने त्यांनी विचारले, ‘दुखतोय का ?’ मी न बोलता होकार भरला.
‘तोंड जड वाटतंय का ?’ डाॅक्टर ! मी नकारार्थी मान हलवली. त्यांनी काहीतरी पुटपुटत पुन्हा टेबलावरील इंजेक्शन उचलले आणि त्याला सुई लावली, बाटलीतून औषध इंजेक्शनमधे घेत त्यांनी मला तोंड उघडण्यास सांगीतले.
‘पुन्हा ?’ मी प्रश्न केला.
‘हो. तो भाग बधीर झाला नाही, त्यामुळे पुन्हा द्यावे लागेल.’ डाॅक्टर ! तेवढ्यात आंत क्ष-किरण तपासणीसाठी गेलेला पेशंट बाहेर आला. पहातो तो काय, ‘डाॅक्टर इंजेक्शन देण्याच्या तयारीत आणि माझा ‘आ वासलेला’ हे पाहून ते ‘गर्भगळीत’ की काय म्हणता, ते झाला असावा. त्याचा चेहराच सांगत होता. मला इंजेक्शन दिल्यावर पुन्हा दहा मिनीटे बाकावर बसा सांगण्यात आले. मी बसलो मुकाट्याने !
त्यांनी तिसरा पेशंट घेतला. पुन्हा त्याचे सर्व सोपस्कार पूर्वीप्रमाणेच झाले. माझी स्मरणशक्ती सुदैवाने बरी असल्याने, माझ्या अपेक्षित अंदाजाप्रमाणे त्याने प्रतिक्रिया दिल्या. त्याला मग क्ष-किरण तपासणीस पाठवले. पहातापहाता दहा-पंधरा मिनीटे गेली. आता डाॅक्टरांनाच चैन पडत नसावी. त्यांनी मला खुर्चीत बसण्यास बोलावले. मी गेलो व बसलो. मला तोंड उघडण्यास सांगीतले. पुन्हा टाकटूक झाली दातांवर ! मला वेदना होतच होत्या.
‘तोंड जड वाटते का ?’ डाॅक्टर ! मी नकारार्थी हुकांर दिला.
‘वेदना होताहेत का ?’ डाॅक्टर ! मी होकारार्थी हुंकार भरला.
‘काहीतरीच आहे’ असे म्हणत डाॅक्टर पुन्हा टेबलाकडे गेले, आणि इंजेक्शन उचलले, सुई लावली. त्यांत औषध घेतले. पुन्हा माझ्याजवळ आले. मला तोंड उघडण्यास सांगीतले. तेवढ्यात तिसरा पेशंट आला. त्याने माझ्याकडे बघीतले, डाॅक्टरांच्या हातात इंजेक्शन व माझा आ वासलेला, आणि त्याने भीषण चेहरा केला !
मी दोन्ही पेशंट आणि डाॅक्टर यांच्या चेहऱ्याकडे बघीतले. डाॅक्टरच्या चेहऱ्यावर - काय माणूस आहे, का हैवान ? तीनतीन इंजेक्शन द्यावे लागताय म्हणजे काय ? अजून बधीरता येत नाही. हे भाव होते.
तर दोन्ही पेशंटच्या चेहऱ्यावर - काय डाॅक्टर आहे का कोण ? गालफड्यात तीनतीन इंजेक्शन देतोय ! मरायचंय काम आहे. हे भाव स्पष्ट वाचता येत होते. तसेच याच्या हाती आपले काय होईल, ही भविष्याची पण चिंता होती.
शेवटी नाईलाजाने डाॅक्टरने मला तिसरे इंजेक्शन दिले, आणि बाकावर बसण्यास सांगीतले. मी बसलो. दोन्ही पेशंट चुळबूळ करत होते. त्यांच्यापैकी कोणाला बोलावले नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान मला स्पष्ट वाचता आले. दहा मिनीटानंतर मला पुन्हा खुर्चीत बोलावले. मी चौथ्याची मानसिक तयारी केली होती. दुसरे माझ्या हाती, पक्षी गाडफडात काही नव्हते. मात्र चौथ्या इंजेक्शनबद्दल माझा, अपेक्षाभंग करत, त्यांनी नंतर काहीही टाकटूक दातांवर न करता, माझ्या वेदनेकडे लक्ष न देता, तो दात काढला, आणि माझ्यासोबत स्वत:ची पण सुटका केली.
© ॲड. माधव भोकरीकर
(आपल्याला पोस्ट आवडली असल्यास शेअर करू शकतात.)

10.3.2020

No comments:

Post a Comment