Sunday, May 10, 2020

वार्षिक परिक्षेत मार्क्स मिळवण्याचे हमखास उपाय !

वार्षिक परिक्षेत मार्क्स मिळवण्याचे हमखास उपाय !
वार्षिक परिक्षेच्या काळात सकाळी उठून, शाळेत परिक्षा देण्यासाठी जावे लागे. अभ्यास केल्यावर पेपर सोपा जाईल याची पण खात्री नसायची ! शिक्षक लोक, खरोखर का इतका कठीण पेपर काढत असावेत, हे अजूनही समजत नाही. परिक्षा हाॅलमधे पेपर लिहीण्यासाठी गेले, की आपल्याला त्या विषयाचे काहीही आठवत नाही, तर पेपर कसा लिहायचा, ही भावना, त्यावेळी बऱ्याच जणांची होत असे.
पेपर सोपे जाण्याचे पण आमचे विद्यार्थ्यांचे काही ठोकताळे होते. त्यांत पेपरला जायच्या वेळी मंदीरातील घंटेचा नाद ऐकू यायला हवा. त्यासाठी गांवातून शाळेत जातांना काहीजण मुद्दाम स्टेशनरोडवरील टांगास्टॅंडजवळच्या महालक्ष्मी मंदीरात जाऊन घणघणघणाट करत देवीचे दर्शन घेत असत. तिथे चारपाच घंटा टांगलेल्या होत्या. काहींचे घंटेपर्यंत हात पोहोचायचे, तर काहींचे नाही; मग त्यांचा हात, हा हवेतूनच वार करत खाली यायचा. काही असो, मात्र हा आवाज केवळ मंदीरात घंटा वाजवणाऱ्यासच नाही, तर रस्त्याने जाणाऱ्यासपण ऐकू येई. महालक्ष्मी म्हणजे आमच्या गावाची ग्रामदेवता ! तिला गांवातील सर्वांचीच काळजी असायची ! अभ्यास करणाऱ्या असो, का न करणाऱ्या असो, दोन्ही लेकरांची काळजी तिलाच ! ऐकायची ती माऊली, हा या लेकरांनी उड्या मारमारून केलेल्या घंटांचा घणघणाट !
काहीजण रेल्वे स्टेशनवरून शाळेत यायचे. ते तुलनेने जरा जास्त भाग्यवान ! कारण त्यांना शाळेत येतांना महादेवाचे आणि शनिचे अशी दोन मंदीरे लागायची ! शनि जर प्रसन्न झाला, तर काही प्रश्नच नाही. महादेव तर बिचारा भोळा सांबच ! तो तर भक्तांवर प्रसन्न होण्यासाठीच या विश्वात अवतरला आहे. काही भक्त तर नंतर महादेवाचा वर घेऊन, जगात कमालीचा उच्छाद मांडतात; पण त्याचा महादेवाच्या भोळेपणावर काडीमात्र परिणाम होत नाही. तो मात्र भक्तांना वरावर वर देतोच आहे. अलिकडे कलियुगात जरा प्रमाण कमी झालेय, पण धोका टळलेला नाही. आसपास काही मंडळींनी मांडलेला उच्छाद बघीतला, तर मला अजूनही शंका येते, की यांना महादेव प्रसन्न आहे.
बरं, स्टेशनवरून येणारे भाग्यवान तरी किती ? महादेवाच्या मंदिराच्या बाहेरच, तिथे शनिमंदीराच्या महाराजांची गाय आणि वासरू बांधलेली असे. आता ‘गायवासरू’ म्हणून कोणी भलतेच चित्र डोळ्यापुढे आणू नका. इथे कसलेही राजकारण नाही, वा अर्थकारण नाही. इथे भक्तीकारण आहे, आणि ते पण बिचाऱ्या कायद्याने देखील अज्ञान असणाऱ्या मुलांचे ! बरं, हे गायवासरू प्रत्यक्ष समोर बघीतल्यावर, आता ही एवढी सुवर्णसंधी कोणी सोडणार आहे, होय ? तिच्या पोटात तर तेहतीस कोटी देव ! मग विचारूच नका ! एखाद्या धांड्याची काडी, त्या गोमातेला कोणीतरी भक्तीभावाने टाकायचा, आणि तिला नमस्कार करायचा.
आम्हा गांवातून शाळेत येणाऱ्यांना तर, काहीवेळा स्टेशनवरून येणाऱ्यांचा हेवा वाटायला लागायचा ! परिक्षेत पहिले येण्याचे सर्व उपाय स्टेशनवरून शाळेत येण्याच्या मार्गात आहेत, ही आमची पक्की धारणा असायची. यांत आम्ही, त्यांना पायी जास्तीचे अंतर यावे लागते, हे पण विसरून जायचो. अहो, इतका तिहेरी मारा असल्यावर कोणीही परिक्षेत चांगले मार्क्स मिळवतील, त्यांत काय विशेष ? फक्त त्यातल्यात्यात आम्हाला, काही वेळा थोडे बरे वाटायचे, ते शाळेत जातांना शनिमंदीराचे महाराज रस्त्यात दिसले की ! जरा धीर यायचा ! शनि नाही तर नाही, पण निदान शनि मंदिराचे महाराज का होईना, पण दिसले !
अजून एक म्हणजे, सकाळीसकाळी कोणी दूधदही, डोक्यावर मडक्यात घेऊन जातांना दिसलं, की ते पण चांगलं असतं म्हणतात ! मात्र याबाबतीत स्टेशनवरचे आणि गांवातले विद्यार्थी यांची बाजू बरीचशी समसमान होती, उगीच दोनचारचा फरक ! दुधाच्या बादल्या किंवा बरण्या घेऊन जाणारे दिसायचे. बादल्या हातात घेऊन जाणारे पायी असायचे, तर बरण्या घेऊन जाणारे सायकलीवर असायचे. गांवातील गल्लीबोळातून डोक्यावर मातीच्या मडक्यात दही घेऊन विकायला निघालेल्या, या गोकुळातील स्त्रिया, अगदी तालात दैऽऽऽय्या, असा शेवटच्या ‘या’ अक्षराला थांबवत जेव्हा म्हणत, ते ऐकावेसे वाटे. मातीच्या छोट्या मडक्यात दही असे, ते मडके त्यांच्या डोक्यावर कापडाच्या छोट्या चुंबळावर ठेवलेले असे. मडक्यावर अल्युमिनिअमची छोटी ताटली ! अल्युमिनीअमचा डाव आणि दही मोजण्याची मापे बऱ्याचवेळा त्या ताटलीवर असे, तर काही वेळा हातात पण असे. काहींजवळ माप नसेल, तर चिनीमातीचा कप दिसे. त्याला कच्चा पावशेर मानत. कोणी घासाघीस केली, तर एखाद्या चमचाभर घट्ट दह्याची कोर टाकायला पण त्यांची ना नसे !
एक मात्र मला कायम आश्चर्य वाटे, ते हे की, ‘आपले दोन्ही हात, डोक्यावर दह्याने भरलेले मडके असतांना, मोकळे सोडून शेजारच्या दुसऱ्या तशाच दहीवालीशी गप्पा मारत आणि अधूनमधून पुन्हा ‘दैऽऽऽऽय्या’ अशी आठवणीने हाक देत, या रस्त्यावरील वर्दळ सांभाळत चालतात कशा ? इथे लहानपणी घरातल्या घरात हातात पाण्याचा तांब्या घेऊन येतांना धडपडून तांब्या किंवा मी किंवा दोन्ही काही वेळा, कोणीही समोर नसतांना सांडलो आहोत. त्यांवर ‘खायला मिळत नाही का ?’ किंवा ‘हातापायात काही जोर नाही का ?’ अशी विचारणा व्हायची. त्यांवर ‘जमिनी सारवायला झाल्या आहेत, पोपडे निघायला लागले आहेत’ असे साळसूद उत्तर मी द्यायचो.
त्यांना एकदा, ‘तुमच्याकडील दही असे घट्ट कसे काय असते ?’ हा प्रश्न विचारल्यावर, मात्र ती मावशी हसली.
‘पोरा, बऱ्याच चवकशा रे तुला !’ असे हंसत म्हणाल्यावर पण तिने सांगीतले, ‘दूध चांगले हवे. ज्या मडक्यात पाणी चांगले गार होते, ते मडके घ्यावे दह्यासाठी ! मग दह्याचे मडके मात्र, कोमट पाण्याने रोज खळखळून धुवावे लागते. त्यात शेरभर कोमट दुधाला उगीच कपभर विरजण लावावं आणि हे मडकं झाकण ठेवून कोपऱ्यात पडू द्यावं ! दूध जरा चांगलं नाही असं वाटलं, तर किंचीत तुरटीचा हात त्यात फिरवून घ्यावा. दही चांगले लागते. पोरा, हे ऐकून तू काय करणार आहे रे ?’ असे म्हणत ती उठली.
ते काहीही असलं, मात्र इतके असूनही, परिक्षेचा निकाल हा गांवातल्यांच्याच बाजूने लागायचा ! काय कारण असावे कोणास ठाऊक ?
सध्या घरात बसून राह्यल्यावर पण, उन्हाचा तडाखा जाणवतोय ! सकाळी उठल्यावर थोडाच वेळ काय, तेवढं बरं वाटते. बाहेर जाणे तर कधीचेच बंद आहे. मग आता उन्हाळयात सकाळीसकाळी उठलो, की अशी काहीतरी आठवण येते ! आता दहीवाल्या बायका डोक्यावर दह्याचे मडके घेऊन जात, ‘दैऽऽऽऽय्या’ म्हणत दिसत नाही. त्यामुळे हे ऐकू आल्यावर पण मनाला वाटणारा थंड दह्याचा गारवा पण आता मनांतून लुप्त झाला आहे. आता कोणत्याही वार्षिक परिक्षेत मार्क्स मिळवायचे राहिले नसल्याने पण त्या गोकुळातील गवळणी आपले शुभशकुनाचे घडे आपल्याला दाखवत नसाव्यात. भगभगीत उन्हात, टळटळीत दुपारच्या वेळी मुकाट्याने घरात बसून रहाणे सध्या नशिबात आहे.
© ॲड. माधव भोकरीकर
(पोस्ट आवडल्यास आपण शेअर करू शकतात.)

4.5.2020

No comments:

Post a Comment