Sunday, May 10, 2020

गाण्याची एकसारखीच वाटणारी धून आणि वेगवेगळी गीते, वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळे चित्रपट !

गाण्याची एकसारखीच वाटणारी धून आणि वेगवेगळी गीते, वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळे चित्रपट !
कुठल्या वेळी कसली आठवण येईल सांगता येत नाही. माझ्या मुलाने बऱ्याच दिवसांपूर्वी, '१०१ हिट्स ऑफ १९५० तो १९५९' या हिंदी चित्रपट संगीताच्या 'डीव्हीडी' आणल्या होत्या. त्यातील गाणी तर सुंदर, श्रवणीय, कर्णमधुर आहेतच, पण मला ऐकायला जमल्या नव्हत्या. कामाच्या गडबडीत विसरून पण गेलो. आता बाहेर निघाल्या, तेव्हा बघीतल्या, आणि सर्व गाणी डोळ्यांसमोर नाचू लागली, आणि कानांत त्यांचे गुणगुणणे ऐकायला येऊ लागले. माझं एक तत्व मी शक्यतोवर पाळतो, म्हणजे पुस्तक वाचतो, ते अगदी प्रस्तावनेपासून ! चित्रपट बघायला जायचे, तर चित्रपटगृहाचा कोरा पडदा बघायला मिळाला हवा, ही इच्छा ! चित्रपटापूर्वीचे ट्रेलर, जाहिरात पण मी बघतो ! या स्वभावधर्मानुसार, त्या गाण्यांची यादी बघीतली, आणि ‘Play All’ ही कमांड दिली. ऐकायला लावायलाच हवी, म्हणून लावली. पहिले गाणे, दुसरे गाणे झाले, आणि मग तिसरेच गाणे ऐकू आले - 'ठंडी हवाएँ, लहरा के आयें' हे 'नौजवान' या सन १९५१ सालात निघालेल्या, चित्रपटातील 'साहीर लुधियानवी' यांचे गीत ! त्याला संगीत दिले आहे, सचिनदेव बर्मन आणि गायलं आहे, अर्थात - लता मंगेशकर यांनी !
हे गाणे ऐकल्यावर, मला हे आणि काही गाणी ऐकायला मिळावी म्हणून, काय गमती व करामती कराव्या लागायच्या याची आठवण आली. आमच्याकडे पूर्वी रेडिओ पण नव्हता. माझे आकाशवाणीवर अधूनमधून कार्यक्रम व्हायचे, मात्र घरी ऐकता यायचे नाही. मग काय, ते कार्यक्रम मी शेजारी ऐकायला जायचो. विद्यार्थ्याने शिकायचे, तर त्याला विचलीत करणाऱ्या गोष्टी नकोत, त्याने विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांसारखेच रहायचे ! या विचाराच्या छायेत मी वाढलो, ते बरोबर का चूक, हा विचार करायचा नाही. मात्र तो बहुतांशी बरोबर असावा, असे वाटते. जळगांव आकाशवाणीच्या ‘युववाणी’त दर आठवड्याला, बहुदा बुधवारी, ‘रंगतरंग’ हा कार्यक्रम असायचा. त्याचे लिखाण पण बऱ्याच वेळा मी करायचो, त्यांत त्या आठवड्यातील विशेष घटना, प्रसंग आणि मग त्या प्रसंगानुरूप गाणी असायची. गाणी तर माझ्या आवडीची असायची आणि ती टाकायचो. मात्र बऱ्याच वेळा, आवडत्या गाण्यानुरुप प्रसंग लिहायचो. हेतू काय तर, ती गाणी ऐकायला मिळायची.
आवडती गाणी ऐकायची, अजून एक संधी मला आकाशवाणीवर मिळायची, ती म्हणजे माझी ‘कॅज्युअल अनाउन्सर’म्हणून काम करण्याची वेळ यायची तेव्हा ! दिवसभराचे काम आटोपल्यावर, रात्रीची ड्युटी मला सोयीची असायची, ती मला मिळायची आणि मी पण मागून घ्यायचो ! कदाचित ती इतरांना गैरसोयींची पण असावी, म्हणूनही मला मिळत असावी ! कारण त्याचा कालावधी हा सर्वात जास्त असायचा. या काळांत, ‘आपली आवड’ व ‘आपकी पसंद’ हे खास श्रोत्यांच्या आवडीच्या हिंदी आणि मराठी गीतांचे कार्यक्रम असायचे. माझी गाण्यांची आवड, इतकी वाईट नसल्यामुळे म्हणा, किंवा त्यावेळी लोकांची आवड चांगली असल्याने म्हणा, माझ्या आवडीची पण गाणी त्यात असायचीच ! मग ती ऐटीत ऐकायला मिळायची. या दरम्यानच आणि या निमित्ताने, आकाशवाणीवरच्या बऱ्याच मंडळींची भेट झाली. कार्यक्रम अधिकारी असलेले - अशोक बडे, विजयसिंग गावीत, नीळकंठ कोठेकर, पातंजली मादुस्कर, अरूण जोशी, भगवान भटकर, गोपाळ आवटी, भगवंत इंगळे इतके आठवतात. याव्यतिरिक्त इतर जबाबदारी असलेले, भैया उपासनी, मोहिनी पंडीत, अंबादास ढोक, दत्ता सरदेशमुख, उषा शर्मा, बाळकृष्ण फरांदे, लियाकतअली सैय्यद, प्रभाकर शार्दूल ही आठवतात.
या महाविद्यालयीन काळांत, तोपर्यंत जे संगीत कानावर पडलेले होते आणि नंतरही पडत होते, त्यांत मला एक चाळा लागला होता, की कोणतं गाणं कोणत्या गाण्यासारखं वाटतंय ! एकाच रागावर जरी आधारलेली गाणे असली, तरी त्यांच्या चाली वेगळ्या आहेत, हे स्पष्ट जाणवायचे. आम्हाला हवं असायचं, ते दोन वेगवेगळ्या व भिन्न काळातील गाण्यांच्या चाली गुणगुणल्या, की त्या साधारणत: सारख्याच वाटायला हव्या; म्हणजे आम्ही काही तरी विशेष शोधलं असं आम्हाला वाटे. कोणी कोणाचे काय चोरलंय, ही कल्पना त्यावेळी आमच्या मनांत नव्हती, दोन गाण्यांतील फक्त साम्य हुडकायचे ! अर्थात त्यावेळी खूप काही गाणी ऐकायला मिळायची, असं पण नाही, पण हा चाळा लागला.
सन १९५० ते निदान १९७५-८० पर्यंत सुवर्णकाळ म्हणता येईल असे चांगले संगीत होते, त्यांत सातत्य होते. बहुसंख्य गाणी चांगली असायची. कित्येक वेळी चित्रपटात दम नाही, पण गाण्यांनी त्या चित्रपटांला तारले असायचे ! अमीन सयानी यांच्या निवेदनाद्वारे कायम चर्चेत असणारी, दर आठवड्याला ऐकता येणारी, ‘बिनाका गीतमाला’ऐकायला गांधी चौकाच्या पानटपरीवर बरीच मंडळी, त्यांना पान जरी खायचं नसलं, तरी ती गाणी ऐकण्यासाठी फक्त यायची. त्यावेळी आलेल्यांपैकी याला पानतंबाखूचा षोक असावा, अशी कोणी शंका पण घेत नसावी. आता ‘कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ती वेळ गेली, 'बिनाका गीतमाला' गेली आणि केवळ गाणे ऐकण्यासाठी पानाच्या टपरीवर रात्री जाणे पण गेले. आता अलीकडच्या काळांत तर क्वचित, एखाददुखत गाणं ऐकावं, असं असते. थांबून गाणं ऐकायला हवं, घरातून बाहेर पडून, फक्त गाणे ऐकायला पान टपरीवर जाण्याचा तो काळ गेला.
आताच सांगीतलं, की ‘ठंडी हवाएँ, लहरा के आयें’हे मूळ गाणे समजू या, कारण ते सर्वात पहिले गाणे ! हे गाणं सन १९५१ सालच्या ‘नौजवान’या चित्रपटातील व संगीत एस् डी बर्मन यांचे ! नलिनी जयवंत, प्रेमनाथ, यशोधरा काटजू, कमल मेहरा, झेब कुरेशी आणि कक्कू यांच्या या महेश कौल यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात भूमिका होत्या.
या आठवण येईल अशी काही गाणे मला आठवतात, यानंतरच्या काळातील ही गीते आहेत. आपण पण ती ऐकावीत यासाठी हा प्रपंच ! '‘यमन कल्याण’या रागावर आधारलेली हिंदी व मराठी चित्रपट संगीतात खूप गाणी आहेत, ‘ठंडी हवाएँ, लहरा के आयें’हे पण गाणे त्याच रागावर आधारलेले आहे. हे गाणे ऐकल्यावर बघा, त्या नंतरच्या हिंदी चित्रपटातील ही खालील गाणे आठवतात का ?
१. तेरा दिल कहा है - 'चांदणी चौक' हा हिंदी चित्रपट 'बी. आर. चोप्रा' यांनी दिग्दर्शित केलेला सन १९५४ मधील एक चित्रपट ! नौजवान या आपल्या मूळच्या चित्रपटानंतर, सुमारे तीन वर्षांनी आलेला ! याचे संगीत प्रसिद्ध संगीतकार 'रोशन' यांनी दिलेले, आणि गीते मजरुह सुलतानपुरी, शफीउद्दीन शेख, कामिल रशीद, शैलेंद्र आणि राजा मेहदी अली खान यांनी लिहीलेली. मीनाकुमारी, शेखर, अचला सचदेव, जीवन, स्मृती बिश्वास यांनी या चित्रपटांत भूमिका केलेल्या ! यांतील 'तेरा दिल कहा है' हे मजरुह सुलतानपुरी यांचे आशा भोसले यांनी गायलेले हे अप्रतीम गीत ! चांदण्या रात्री आपल्या हातांतील वाद्य वाजवीत ती, अत्यंत प्रेमळ स्वरांत त्याला विचारते - 'तेरा दिल कहा हैं' ! वास्तविक पहाता मागे अत्यंत अनुकूल असे वातावरण असूनही, हा अरसिक मात्र, आपल्याला प्रेमळ आवाजांत विचारात असलेल्या तिला काही उत्तर देत नाही.
२. यही हैं तमन्ना तेरे दार के सामने - 'आप की परछाईया' हा हिंदी चित्रपट, 'मोहन कुमार' यांनी दिग्दर्शित केलेला सन १९६४ मधील एक चित्रपट ! 'नौजवान' या चित्रपटानंतर सुमारे १३ वर्षांनी आलेला हा चित्रपट ! याचे संगीत 'मदन मोहन' यांनी दिलेले आणि गीते लिहीली ती, राजा मेहंदी अली खान यांनी ! यातील भूमिका धर्मेंद्र, शशिकला, ओमप्रकाश, मनोरमा आणि सुप्रिया चौधरी यांनी केलेल्या ! दरवाज्यातून येत तो, धर्मेंद्र, तिला,सुप्रिया चौधरीला विचारतो, 'यही हैं तमन्ना', आणि विचारता विचारता संपूर्ण घरभर फिरतो, किंवा ती त्याला फिरविते, पण उत्तर अजिबात देत नाही ! आपल्याला हे समजते, की त्याला उत्तर समजलेले आहे, तसेच त्याला उत्तर समजले आहे, हे तिला पण माहीत आहे, पण बोलत मात्र नाही.
३. रहे ना रहे हम - 'ममता' हा हिंदी चित्रपट 'आसित सेन' यांनी दिग्दर्शित केलेला, सन १९६६ मधील चित्रपट ! 'नौजवान' या चित्रपटानंतर सुमारे १५ वर्षांनी आलेला हा चित्रपट ! 'मजरुह सुलतानपुरी' यांच्या गीतांना संगीत, 'रोशन' यांनी दिले ! लता मंगेशकर यांनी स्वतंत्रपणे आणि मग मोहम्मद रफी व सुमन कल्याणपूर यांनी दोघांनी असे गायले आहे हे गीत ! सुचित्रा सेन, अशोक कुमार आणि धर्मेंद्र यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट !
गर्भश्रीमंत असलेला तो, तिला सांगतो - असू दे, तुझ्यापासून दूर जातोय परदेशांत शिकायला, पण पत्र पाठवेल तुला, अगदी वेळोवेळी ! विसरणार नाही तुला, मग आल्यावर आपण आयुष्यभर सोबत आहोतच ! त्याच्या एकेक वाक्यासोबत तिच्या आयुष्यातील स्वप्नांचा चक्काचूर, ती सहजपणे चालतचालत पण जड पायाने, ती आपल्या हातातील फुलाची एकेक पाकळी तोडून, पाण्यांत टाकते आहे. कदाचित तिला तिच्या भविष्यातील अनिश्चिततेच्या अनुभवाची भिती वाटत असावी, पण त्यावेळी ती करणार तरी काय ? या वेळी कोणाच्या हातांत तरी काय असते? तो म्हणतो, 'काहीही होवो, आपली भेट होवो ना होवो, पण माझ्या हृदयांत तूच आहे, म्हण बरं, 'आपण असो किंवा नसो --- 'रहे ना रहे हम'. त्याच्या हृदयातून आलेल्या मागणीवर मात्र, ती आपल्या होणाऱ्या विरहाच्या वेदनेने गायला सुरुवात करते - 'रहे ना रहे हम' ! लता मंगेशकर यांच्या हृदयावर विरहाचा चरा पाडत जाणाऱ्या आवाजांत, चित्रपटांत सुचित्रा सेन, अशोक कुमार याच्या आर्जवाने केलेल्या मागणीने गाते ! तिला कल्पना असते का आपल्या भविष्यांतील परवडीची आणि हे स्वप्न प्रत्यक्षात येणार नाही याची ?
काही वर्षांनी आपल्या उत्तरार्धांत पुन्हा एकदा भेटलेले अशोक कुमार आणि सुचित्रा सेन, यांच्या कानावर ऐकू येते ते हेच गीत, पण गात असते पुढची पिढी ! धर्मेंद्र आणि सुचित्रा सेन ! मोहंमद रफी आणि सुमन कल्याणपूर आपल्या आवाजांत !
४. सागर किनारे दिल ये पुकारे - 'सागर' या रमेश सिप्पी यांचा सन १९८५ मधील, दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील हे गीत ! 'नौजवान' या चित्रपटानंतर सुमारे ३४ वर्षांनी आलेला हा चित्रपट ! जावेद अख्तर यांनी लिहीलेल्या या गीताला संगीताचा साज चढविला आहे, तो सचिन देव बर्मन यांचे सुपुत्र, राहुल देव बर्मन यांनी ! किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेले हे गीत, आपल्याला 'ठंडी हवाएँ... ' याची पुन्हा आठवण करून देते. ऋषी कपूर, कमल हसन, डिंपल कापडिया, नादिरा, सईद जाफरी, सतीश कौशिक यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ! गोव्यांत छोटेसे रेस्टारंट चालविणारी मोना, तिचा मित्र असतो राजा ! तो तिच्या प्रेमात असतो, पण ते व्यक्त करणे त्याला जमत नाही. गर्भश्रीमंत असलेला रवी गोव्याला येतो, आणि मोनाची भेट झाल्यावर तिच्या प्रेमात पडतो. राजाला या सर्वांची काही कल्पना नसते. मग दाखविलेय ते उल्हसित भावातील मोना आणि रवीच्या भावनेचे गीत ! गायले आहे, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी !
नंतर मोनाच्या प्रेमाची सर्व मोडतोड झाल्यावर, सागर किनाऱ्यावर, आपल्या भग्न मनाने एकटीच गात असलेली मोना ! हे गायले आहे, लता मंगेशकर यांनी !
आपल्याला शेवटी, ज्या मूळ गीतापासून आपण सुरुवात केली, ते गीत ऐकावेसे तर वाटणारच, मात्र वाचावेसे पण निश्चितच वाटेल -
ठंडी हवाएँ, लहरा के आयें
रुत है जवां
तुमको यहाँ, कैसे बुलाएँ
ठंडी हवाएँ...
चाँद और तारे, हँसते नज़ारे
मिल के सभी, दिल में सखी, जादू जगाये
ठंडी हवाएँ...
कहा भी न जाए, रहा भी न जाए
तुमसे अगर, मिले भी नज़र, हम झेंप जाए
ठंडी हवाएँ...
दिल के फ़साने, दिल भी न जाने
तुमको सजन, दिल की लगन, कैसे बताएँ
ठंडी हवाएँ...
© ॲड. माधव भोकरीकर
(पोस्ट आवडली असल्यास शेअर करू शकतात.)
1. तेरा दिल कहा है - https://www.youtube.com/watch?v=DEo1ygD5GPk
2. यही हैं तमन्ना तेरे दार के सामने - https://www.youtube.com/watch?v=eKGk91vXhPU
3. रहे ना रहे हम - https://www.youtube.com/watch?v=BDAyzXC-ayE
4. सागर किनारे दिल ये पुकारे - https://www.youtube.com/watch?v=OtKmx4E4RqQ आणि https://www.youtube.com/watch?v=MBudI7bloaQ

23.4.2020

No comments:

Post a Comment