Sunday, May 10, 2020

नंदाघरी नंदनवन फुलले !

नंदाघरी नंदनवन फुलले !
शालेय वयात आमच्याकडे रेडिओ नव्हता. गल्लीत एक-दोन जणांकडे होता. आमच्या घरासमोर असलेले ना. रा. भावे सर, यांच्याकडे पण होता. त्यांना गाण्याची आवड पण होती. रेडिओवरची गाणी, ही फक्त आपल्यालाच ऐकता यावी, अशी कोणाची भावना नसायची. त्यामुळे हे असे कार्यक्रम निदान अर्ध्या गल्लीला तरी ऐकता यायला हवेत, असा रेडिओचा आवाज असायचा. व्हाल्वचे रेडिओ असायचे आणि कार्यक्रम नीट ऐकू यावे म्हणून घरात जाळीचा पट्टा लावलेला असायचा.
आकाशवाणीवर विविध कार्यक्रम लागायचे. जळगांव आकाशवाणी नंतर सुरू झालं. त्यावेळी जास्त ऐकले जायचे, ते मुंबई आणि पुणे केंद्र ! आकाशवाणी मुंबई केंद्रावर ११ वाजता हिंदी बातम्या असायच्या ५ मिनीटांच्या, आणि त्यानंतर लागायचा कामगारांसाठी कार्यक्रम ‘कामगार सभा’ ! रोज वेगवेगळे गीत प्रकार असायचे. शुक्रवारी लोकगीते आणि गुरूवारी भक्तीगीते, हे ठरलेले असायचे. इतरवेळी भावगीते, नाट्यगीते वा मिश्रसंगीत !
गुरूवारी ‘आर एन् पराडकर’ यांनी गायलेले दत्तभजन हमखास, आणि शुक्रवारी रोशन सातारकर व सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या लावण्या असायच्या. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ‘नाचत ना गगनात नाथा’ व ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ हे असायचे. भावगीतांचा दिवस असला की आशा भोसले, लता मंगेशकर यांच्या सोबत अजून एक नांव असायचे, ‘सुमन कल्याणपूर’ ! यांनी गायलेली सुंदर भावगीते, चित्रपटगीते नियमीत लागायची. ऐकायला खूप छान वाटायची आणि अजून पण वाटतात. त्यात,
असावे घर ते अपुले छान
एकतारी सूर जाणी
कशी करू स्वागता
कशी गौळण राधा बावरली
केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
चल उठ रे मुकूंदा
जिथे सागरा धरणी मिळते
रिमझिम झरती श्रावणधारा
देव माझा विठू सावळा
नंदाघरी नंदनवन फुलले
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले
अशी कितीतरी गीते असायची. आज त्यांचा जन्मदिन ! आमचे संगीत जीवन ज्यांनी समृद्ध केले, त्यांच्याप्रति ही एक भावांजली -
नंदाघरी नंदनवन फुलले
बोल बोबडे श्रीरंगा चे
गोकुळात घुमले
रिंगण घाली शाम सावळा
बाळकृष्ण तो रांगत आला
हात धरून चालू लागला
पुढेपुढे ग पाऊल पडले
हातच चिमुकला उंच नाचवी
छमछम वाळा मधुर वाजवी
स्वतःला हसूनी जगास हसवी
कौतुक करते गोकुळ सगळे
गीत - योगेश्वर अभ्यंकर, संगीत - दशरथ पुजारी आणि गायिका - सुमन कल्याणपूर
© ॲड. माधव भोकरीकर

28.1.2020

No comments:

Post a Comment