Sunday, May 10, 2020

मी नुकताच वकील झालो होतो. एल्एल. बी. ला शिकण्याचे माध्यम इंग्रजी होते. त्यामुळे अभ्यासक्रमातील सर्व विषय इंग्रजीतून, नंतरही इंग्रजीतूनच वाचण्याची सवय ! कायद्यातील इंग्रजी ही क्लिष्ट मानतात.
आमच्या गांवातील इंग्रजीचे प्राध्यापक, चांगले गुणवत्ताधारक, ते तर मला नेहमी म्हणायचे, ‘माधवराव, तुमची कायद्याची पुस्तके वाचली, की ते इंग्रजीत आहे, इतकेच समजते. बाकी काही समजत नाही.’ तर सांगायचे तात्पर्य असे, की कायद्यातील इंग्रजीचा अर्थ सहजपणे, सर्वसामान्यांना लागत नाही. आता कदाचित आम्हाला सवय झाल्यामुळे जाणवत नसेल इतकाच काय तो फरक ! यासाठी आम्हाला Interpretation of Statutes हा विषय होता अभ्यासाला !
अर्थात मी कायद्याच्या अभ्यास शिकायला सुरू करण्यापूर्वी, मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो, नंतर गांवच्याच हायस्कूलला ! ते पण मराठी माध्यमाचेच ! मराठी मात्र आमच्याकडून चांगले घासूनपुसून तयार करून घेतले असावे, असे वाटते. म्हणजे लोकमान्य टिळकांच्या, साहित्यसम्राट न. चि. केळकर यांच्या लिखाणातील एकेका परिच्छेदाचे वाक्य असलेले धडे आम्हाला होते. जास्त धडपड म्हणून, अवांतर वाचनात गीतारहस्य, ज्ञानेश्वरी, प्रतिभासाधन, रा. श्री. जोग, गं. बा. सरदार यांची पुस्तके, मोरोपंतांच्या आर्यांचा अभ्यास वगैरे शहाणपणा पण आम्ही केला. ‘माझ्या मराठीची बोली कवतुके, अमृतातेही पैजा जिंके’ म्हणत आम्ही मराठी शिकलो.
थोडक्यात काय, तर सोपं लिहीणे कठीण असतं, हे समजायला आम्हाला, हे इतकं वाचावं लागलं ! त्यामुळे सध्या सोपं समजायला तशी अडचण पडत नाही, मात्र मराठी किंवा इंग्रजी पण कठीण असले, तरी समजते, हा माझा समज, किंवा सार्थ अभिमान !
मात्र या समजाला काल धक्का बसला, तो येथील फेसबुकवरील एकाची पोस्ट वाचल्यावर ! पोस्ट मराठीतच होती. एकदा वाचली. दुसऱ्यांदा वाचली, पण समजेना ! बरं, त्यांवर ‘लाईक्स्’ आणि ‘काॅमेंटस्’ येताहेत ! म्हणजे, मी सोडून सर्वांनाच समजली होती तर पोस्ट ! कधीही न्यूनगंड येत नसलेल्या माझी पंचाईत झाली ! कारण न्यूनगंड पण येईना मला !
शेवटी माझ्या सरळ स्वभावाने, मी प्रतिक्रिया तशीच दिली, ‘पोस्ट वाचली. पुढे काय ?’ मला वाटलं, पोस्टकर्त्याचे यांवर काही स्पष्टीकरण येईल ! पण कसले, काय ? माझ्या प्रतिक्रियेवर इतरांचे लाईक्स् व स्मायली सुरू झाल्या ! प्रतिक्रिया समजल्याच्या खुणा, आणि ‘पुढे काय ?’ यांवर प्रतिक्रिया ! शेवटी परमेश्वराचे नांव घेत मी थांबलो.
तात्पर्य काय डोंबलाचे ? —— कोणीही असे समजू नये, की त्याला मातृभाषा असली, म्हणजे समजेलच ! आणि त्यात जर फेसबुकवरील पोस्ट असेल, तर अजूनच कठीण होऊ शकते.
टीप - पोस्ट कोणाची होती, हे कृपया विचारू नये. मी सांगणार नाही. काही संकेत पाळायचे असतात. आपण आपापला अंदाज लावू शकता. त्यांवर बंदी नाही.

3.4.2020

No comments:

Post a Comment