शाळेत लस देणारी मंडळी !
सध्या काहीही ऐकायचे, म्हणजे तुम्ही कोणाला फोन करा, त्याला रिंग जाण्याच्या अगोदर तालासुरात खोकलेले ऐकू येते, आणि मग कोरोनाची जाहिरात ! जरा रेडिओ लावला, तर एखादे गाणे होत नाही, तोच कोरोनाची जाहिरात ! कुठं चर्चा काय सुरू आहे, यासाठी जरा कान दिला, तर दोन मिनीटांत ऐकू येते, ते कोरोना विषाणूबद्दल ! आता काय करावे ? काही करू शकत नाही, पण यावरून आलेली आठवण मात्र काही, रोखू शकत नाही.
मी शाळेत जात होतो, त्या काळातील ! त्यावेळी साधारणत: पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी होते. झाडी भरपूर होती. तुलनेने आरोग्याची आजच्याएवढी समज नव्हती. घरात शौचालये वगैरे असणे, ही मोठ्या माणसांची लक्षणे समजली जायची. काही जणांची तर यापेक्षा पण विचित्र अवस्था होती, घरात जरी शौचालय असले, तरी ‘चांगली साफ होण्यासाठी’ बरेच जण गांवाबाहेर, नदीवर जायची. सध्या आपण वापरतो, तशी शौचालये नसायची, तर ‘पेवाचे संडास’ असायचे. घरात माणसांची संख्या जास्त आणि शौचालये कमी, याचा जो काही परिणाम व्हायचा, तो व्हायचाच ! असो. विषय तो नाही.
त्यावेळी ७ जूनला, जवळपास वेळेवर पाऊस सुरू व्हायचा, आणि १२ जून उजाडला, की आमची शाळा सुरू व्हायची. मग जरा दोनतीन आठवडे झाले, की बेफाम पाऊस सुरू व्हायचा. नद्या दुथडी भरून व्हायच्या, रस्ते बंद व्हायचे, सर्वदूर चिकचिक व्हायची ! डांसाची बेफाम वाढ, नदीतलावांत प्रदूषण आणि त्याचा परिणाम, मग रोगांच्या साथी सुरू व्हायच्या ! त्यांत देवी, काॅलरा, कावीळ ही नांवे जास्त असायची, तर टायफाईड, नारू, पटकी की नांवे कमी असायची. ही नांवे ऐकायला, कितीही चांगली आणि धार्मिक असली, तरी त्या रोगाचे वर्णन मात्र भयंकर असायचे. ते होऊ नये, म्हणून होणारे उपाय देखील, काही कमी भयंकर व विचीत्र नसायचे.
मग एखाद्या दिवशी शाळेत दुसऱ्या तासालाच, काही वेगळी आठदहा माणसे आणि तीनचार बायका, हातात बॅगा घेतलेल्या अवस्थेत दिसायच्या ! मग खुणेनेच तुम्ही हा वर्ग, आम्ही हा वर्ग असे ठरायचे. ही मंडळी वर्गात आल्यावर तासावरचे शिक्षक, त्यांना टेबल रिकामा करून देत. मग ही मंडळी बॅगा उघडून इंजेक्शने, सुयांच्या डब्या आणि रबरी बुचाने काचेच्या बाटलीचे तोंड बंद केलेल्या बऱ्याच मोठ्या बाटल्या दिसायच्या ! काही वेळा शिक्षक सांगायचे, ‘काॅलऱ्याची लस द्यायला नगरपालिकेची माणसे आली आहेत’ ! नगरपालिकेच्या कामांबद्दल आम्ही नागरिकशास्त्रात वेगळेच शिकलेले असायचे ! शाळेतील गरीबबापड्या मुलामुलींना कोंडून इंजेक्शन द्यायचे, हे त्यांचे काम काही शिकलो नव्हतो.
ही मंडळी आली, की आमची शाळा, आम्हा विद्यार्थ्यांच्या बाबतीत भलतीच क्रूर व्हायची. सर्वप्रथम शाळेच्या चारही गेटवर, कुणाच्या गळ्यात वायरीला बांधलेली शिटी, कुणाच्या हातात लपलप करणारी हिरवीगार कडुलिंबाची काडी, कोणाचा दरारा तर इतका की त्यांना या कृत्रिम वस्तूंची गरज नसायची, असे शिक्षक उभे असायचे. आमचे बाहेर जाण्याचे चारही मार्ग बंद व्हायचे. ‘रसद तोडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ, या अशा टोकदार प्रात्यक्षिकाने शिकायला मिळायचा. आमचे काही शिक्षक तर, इतके दक्ष असायचे, की मैदानावर खेळत असलेल्या विद्यार्थ्यांना आंत वर्गात घेऊन यायचे, आणि यांच्या स्वाधीन करायचे.
यांतील एखादा जरा बरा माणूस, मोठ्या बाटलीतले औषध चांगले हलवायचा. हातातील काचेच्या सिरींजला उजव्या हातात घेऊन, वर डाव्या हाताच्या चिमटीत धरलेल्या बाटलीच्या तोंडावरच्या रबरी बुचात, ती सुई खुपसली जायची आणि गुईई करत त्यातील औषध, त्या इंजेक्शनमधे यायचे. संपूर्ण वर्ग त्याकडे एकाग्रतेने बघत असायचा. मात्र कोणाच्याही कसल्याही नजरेचा, त्या इंजेक्शनवर परिणाम व्हायचा नाही. आम्हा सर्वांच्या निष्पाप नजरेने, काय परिणाम होणार असायचा ? इंजेक्शन हातात घेऊन पहिल्या बेंचकडे जायचा. इंजेक्शनवाला डाव्या हाताने विद्यार्थ्याची डावी बाही वर करायचा, आणि मग टुच्चूक ! उउउउऽऽऽउईऽऽऽ करत आणि चेहऱ्यावरील भाव वाचता येणार नाही, असे गच्च डोळे मिटून तो इंजेक्शन सहन करायचा. ते बघीतल्यावर शेजारच्या विद्यार्थ्याची तर गाळण उडालेली असायची, मात्र त्याच्यावर पण हाच प्रयोग ! आम्ही वह्यापुस्तके दप्तरात ठेऊन द्यायचे. शेवटच्या रांगेतल्या बहुतेक मुली, केव्हाही भोकाड पसरायचे आहे, या अवस्थेत असायच्या. माझ्यासारखा एखादा उजवा हात घाबरत पुढे करायचा, तर तो बाजूला करत, डाव्या दंडावर तोच प्रयोग व्हायचा.
हा सर्व शाळाभर गोंधळ सुरू असायचा. घरी गेल्यावर हे सर्व सांगायचे, तर ‘संध्याकाळी अंग कोमट होईल’ हे सांगीतले जायचे. खरोखर रात्री ताप यायचा. सकाळी उठल्यावर, डावा हात इतका काही जड झाला असायचा, की फारच सुजलेला असेल, म्हणून बघायला गेलो, तर तेवढाच असायचा ! मात्र ताठ मानेप्रमाणे, हा हात अगदी ताठ झालेला असायचा ! दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्याचा प्रश्नच नसायचा ! एका आठवड्यात गांवातील सर्व विद्यार्थी वर्ग हा ‘ताठ हाताने’ जपून चालत असायचा !
© ॲड. माधव भोकरीकर
(आपणांस पोस्ट आवडल्यास शेअर करू शकता.)
18.3.2020
No comments:
Post a Comment