Sunday, May 10, 2020

पोरगी ‘बापाला’ कोर्टात खेचते — वाटणीसाठी !

पोरगी ‘बापाला’ कोर्टात खेचते — वाटणीसाठी !
कायद्यातील तरतुदी या समाजातील नितीमूल्ये लक्षात घेऊन केलेल्या असतात. अपेक्षा असते, समाजातील सर्व जण ती नितीमूल्ये पाळतील. काही अडचण आली, तर न्यायालयांत खरेखुरे सांगतील. त्यामुळे न्यायदानाच्या कामांत सुलभता येईल. खराखुरा न्याय मिळेल. मात्र या आदर्शाची कल्पना, ही प्रत्यक्षात येणं कठीण असते. समोर स्वार्थ दिसायला लागला, की स्वार्थापुढे सत्य पळ काढते. अशीच एक घटना समोर आली.
साधारणत: दीड महिन्यापूर्वीची घटना ! कोर्टाची हिवाळी सुटी नुकतीच संपली होती. मी माझ्या कार्यालयात बसलो होतो. समोर नेहमीप्रमाणे काही पक्षकार बसले होते, त्यांचे बोलणे सुरू होते, तेवढ्यात एक पक्षकार आला. मागच्या खुर्चीवर जाऊन बसला. त्याचे वय साधारण पन्नाशीच्या आसपास, निराश मन:स्थितीत ! सर्व पक्षकारांशी बोलणे आटोपले. ते निघून गेले. हा मग पुढे समोरच्या खुर्चीत येऊन बसला.
‘साहेब, हायकोर्टात अपील दाखल करायचे आहे.’ असे म्हणत, त्याने जवळचे कागद मला दिले.
‘याचा खर्च किती येईल ? फी किती पडेल ?’ तो.
‘खर्च जो काय येईल तो येईल, तुम्ही तुमच्या हाताने करा. फी मी काम वाचून बघीतल्यावर सांगतो. आम्हाला त्रास जास्त, तर फी जास्त आणि कमी त्रास तर, फी कमी ! माझं सरळ गणित असतं !’ मी. तो उदास हसला.
‘त्रास कमी काय, आणि जास्त काय ! त्रास हा त्रास असतो. माझे दोन्ही निकाल विरूद्ध लागले आहे, खालच्या कोर्टात ! काय खरं आणि काय खोटं ! देवाला पण सांगता येत नाही. त्रास मात्र आहे.’ त्याचे बोलणे असे कुठून दुरून आल्यासारखे वाटत होते. त्याची काहीतरी गाडी बिघडली आहे, हे मी ओळखले, आणि ‘कागद वाचल्यावर सांगतो फी, पण काय घडले, ते अगदी पहिलेपासून सांगा. काहीही लपवू नका आणि गाळू नका.’ हे मी म्हटल्यावर, तो सांगू लागला.
साहेब, मला हे माझ्या म्हाताऱ्याने आणि आईने सांगीतले आहे. सुरूवातीला तर आमचा जन्म नव्हता, त्यामुळे त्यावेळचे काही माहीत असण्याचा प्रश्नच नाही ! नंतर आम्ही मोठे झालो, अन् समजायला लागले. वाईट आहे साहेब, कोणाचं काही करू नये. आमच्या म्हाताऱ्याने आमच्यापेक्षा जास्त दुसऱ्याच्या पोरीचं केलं, त्याला दया आली, आणि त्याच्या दयेपायी त्याने पण कोर्टाच्या फेऱ्या मारल्या, अन् आता त्याच्यानंतर आम्ही कोर्टाच्या फेऱ्या मारतोय !
माझ्या आजोबाला, दोन मुले आणि एक मुलगी ! माझ्या वडिलांपेक्षा एक मोठा भाऊ, त्यांचे लग्न झाले, त्यांना एक मुलगी झाली, ती १९५६ ला, लग्नानंतर दीड वर्षाने ! ती दीड वर्षाची होती, तोच ते काका साप चावल्याने वारले, सन १९५८ मधे ! काकूने लगेच दुसरे लग्न केले, त्यांची मुलगी इथेच ठेवली, माझ्या आईजवळ ! ती तिच्या संसारात रमून गेली. आईला आम्ही उशीरा झालो. माझा जन्म १९७१ चा ! आईच्या पोटी लवकर काही झाले नाही, आईने या बापाविना असलेल्या पोरीला तिची आई बनून सांभाळले. तिची जन्मदाती तर तिला सोडून, दुसरा घरठाव करून चालली गेली.
घरची पाच-सात एकर कोरडीची शेती, ती पण चार वेगळ्या ठिकाणी ! करायला परवडत नव्हती ! माझे बाबा कसेबसे शिकले, मराठी शाळेत शिक्षक झाले ! त्यांच्या खेडोपाडी बदल्या होत. तिथं जायचं, या पोरीला सोबत घेऊन ! तिचे सर्व करायचे, ती त्यांचीच पोरगी झाली होती. मराठी शाळेच्या त्यावेळच्या मास्तरच्या पगारात, माझ्या वडिलांनी आत्याचे लग्न केले. आमच्या समाजात लग्नाचे वेळी जावयाला हुंडा आणि पोरीला सोनं भक्कम द्यावं लागते. तुमची ताकद असो, का नसो. कसेबसे ते पण निभावले. माझे आजोबा गेले, सन १९६७-६८ ला, आमचा जन्म नव्हताच ! जातांना त्यांनी शेती बाबाच्या नांवावर केली, ‘सांभाळ पोरा ! तुला सगळंच सांभाळायचे आहे.’ म्हणत एके दिवशी हे जग सोडून गेले.
माझी ही चुलत बहीण, तोवर लग्नासारखी झाली होती. सन १९७५-७६ ला बाबाने तिचे लग्न ठरवले. त्यांच्याजवळ एवढे कुठले पैसे, मग कसे तरी इकडून तिकडून पैसे उभे केले. जावायाला हुंडा द्यावा लागला. पोरीला देण्यासाठी सोन्याचा प्रश्न आला. बाबा आईला म्हणाले, ‘या पोरीला आपण पोरीसारखे सांभाळले आणि नंतर त्यामुळे आपल्याला पोरसोर झाले. आपली पोरच आहे ती ! तुझ्याजवळचे तुझे सोने तिला लग्नात दे. आजची वेळ तरी साजरी कर ! आता माझ्याजवळ सोन्यासाठी काही पैसे नाही. कुठून आणू आता ? त्यासाठी पोरीचे लग्न नको रहायला ! आपली शेती किती आहे, आणि कोणती पिकते आहे ?’
‘अहो, माझ्या पोरीसाठी ते सोनं राहू द्या ! आपल्याला पण पोरगी झालीय ना ? तिला लग्नात द्यायला कामास येईल. त्यावेळी कुठून आणणार ? मला माझ्या आईने दिले आहे, माझ्या लग्नात ! हे काही तुमचे नाही आहे !’ आई म्हणाली.
‘आपल्या पोरीला अजून १०-१२ वर्ष आहे, घेऊ त्यावेळेस नंतर ! मी घेऊन देईन !’ प्राथमिक शिक्षकाची ताकद ती काय असणार ? पण आईला कसेतरी समजावयाचे, म्हणून त्यांनी काहीतरी सांगीतले. बाबांच्या या बोलण्यावर, आई काय बोलणार ? तिला आपल्या नवऱ्याची अवस्था दिसत होती, आणि तिचं पण मन शेवटी आईचे होते. शेवटी तिच्या लग्नात आईकडून मिळालेले सोनं, तिने बाबांच्या हवाली केले. सोनं देतांना तिचे डोळे आणि सोनं पण ओलं झालं होतं. तिच्या, काकाच्या पोरीच्या अंगावर, तिच्या लग्नात माझ्या आईचे तिच्या अश्रूंनी ओलं झालेलं सोनं घातलं. काकाच्या मुलीचे, बहिणीचे लग्न झाले ! आईच्या गळ्यात नंतर फक्त काळी पोत राहीली. हातातील चांदीचे तोडे पण इतर खर्चापायी गेले. नवऱ्याने मागीतल्यावर नाही कसे म्हणणार ? आणि पोटच्या पोरीसारखे जिला आजवर सांभाळले, तिच्या लग्नासाठी नाही काय म्हणणार, असे मनाचे समाधान करत आई गप्प बसली.
लग्न झाले. चुलत बहीण मुंबईला सासरी गेली. त्यानंतर दोन-पाच वर्षे गेली. मेहुणे कुठे नोकरीला होते. त्यांना तिकडे रहायला घर घ्यायचे होते. बहिणीने पैसे मागीतले, बाबांकडे ! त्यांनी पुन्हा कसे तरी उभे केले. आत्याच्या घरचे आणि बाबांनी तिथे जाऊन तिला पैसे दिले. त्यांचे घर झाले. आम्हाला लोकांचे देणे झाले.
या घडामोडीपर्यंत काळ कोणासाठी थांबत नाही. तोवर आम्ही लग्नाला आलो होतो. मी नाशिकला नोकरीत होतो. धाकटा भाऊ पण कष्टाळू ! तो पण नोकरीला होता. दोन पैसे साठले. माझी बहीण लग्नासारखी झाली. वडील तर थकले होते. रिटायरमेंटनंतरच्या पैशात पडलेले घर बांधले, आणि त्यांच्याजवळचे पैसे संपले. माझ्या आईला हे सर्व दिसत होते, तरी आईने मात्र, धोशा धरला, ‘माझ्या पोरीच्या लग्नात माझे घेतलेले दागिने आणि तिला द्यायचे दागिने, असे दोन्ही तिच्या अंगावर घाला. वडिलांजवळ तर विशेष काही रक्कम नव्हती, जे काही तुटपुंजेच पेन्शन यायचे तेच ! पण आम्ही दोन्ही भावांनी जोर लावला आणि तिला लग्नात दागिने घातले. जावाईंना हुंडा दिला. आमच्यात, चुकीची आणि जीवघेणी अशी, पद्धत आहेच ! बहिणीचे लग्न झाले, १९९२-९३ ला ! चुलत बहीण लग्नात होतीच. आमचे पण लग्न झाले होते. आता जरा डोकं शांत झालं, असं वाटलं !
चुलत बहीण मात्र नंतर कुरबूर करायला लागली. आम्हाला काही समजेना ! सन १९९६ ला, आपल्याकडे काही तरी कायदा आला, मुलींना पण वडीलोपार्जित मिळकतीत हिस्सा मिळणार म्हणून ! तिला कोणी भर घातली, आणि तिने माझ्या बाबांच्या विरूद्ध कोर्टात वाटणीचा आणि उत्पन्नाचा दावा घातला. गांवातल्या लोकांनी समजावले, नात्यागोत्यातील माणसांनी समजावले, पण तिने ऐकले नाही.
माझ्या बाबाने तिला समजावले, ‘पोरी तुला मी आणि तुझ्या काकूने काय कमी केले ? दीड वर्षाची असतांना तुझा बाप, माझा भाऊ गेला. तुझी आई तुला सोडून लग्न करून दुसऱ्या घरी गेली. त्यानंतर तिने तुला बघीतले पण नाही. तुझ्या काकूने तुझे सगळे केले. स्वत:चे दागिने तिच्या पोटच्या पोरीला दिले नाही, अन् तुला दिले. तुझे वर्षभराचे सणवार केले, नंतरचे तुझे सर्व बाळंतपण केले. तुला घराला पैसे दिले. पोटच्या पोरीसाठी जे करायचे, त्यापेक्षा जास्त आणि सर्व तुला केले. आता पोटच्या पोरीला द्यायला माझ्याजवळ काही नाही ! तिचे भाऊ तिला सांभाळतायत ! आता तू मला कोर्टात खेचते आहे, वाटणीसाठी ! पोरी तुझ्या हिश्श्यापेक्षा जास्त दिले आहे तुला ! तूच विचार कर आणि हिशोब कर ! या कोरडीच्या जमीनीचे काय उत्पन्न यायचे ? तुला काहीच आठवत नाही ? अग, माझ्या नाशिकच्या पोराची नोकरी पण गेलीय ! काय पाच-सात एकर आहे, त्याला राहू दे ! तो काय खाईल ?’ तिला पाझर फुटला नाही. तिने ऐकले नाही.
कोर्टात बाबांनी त्यांचे लेखी म्हणणे दिले. जाबजबाब घेण्याची वेळ आली. बाबांनी डोळ्यातील पाणी आवरत, साक्ष दिली. त्यांच्या साक्षीदारांनी साक्ष दिली. जाबजबाब चांगले झाले. मात्र तिच्या आईबापाच्या पश्चात, तिला पोटच्या पोरांपेक्षा जास्त केले, आणि तिने आपल्यावर कोर्टात केस करावी ? वाटणी मागावी ? तिच्या बापाने काय आणि किती ठेवले होते तिच्यासाठी ? काही ठेवले नव्हते ! मग माझी आई पण तिला आणि माझ्या बाबांना खूप बोलली ! कुटुंबावर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा, पहिला आणि मर्मभेदक फटका बसतो, तो कुटुंबातील गृहीणीला ! मुलांना काही समजत नसते, वयच नसते त्यांचे ! घराचा कर्ता बसलेला धक्का कोणाला दाखवत नाही. मनांत कुढत रहातो. आपण फसवले गेलो, याची वेदना जवळून गेलेल्या पैशांपेक्षा, आणि आपल्या दारिद्र्यापेक्षा जास्त भीषण आणि वेदनादायक असते. आयुष्यभर सहन करू शकत नाही माणूस ! याची बाबानी हाय खाल्ली. गप्पगप्प राहू लागले. आयुष्यभर शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत आलेली, नितीमूल्य्यांची ही दारूण चिरफाड त्यांना सहन झाली नाही. कोर्टाचा निकाल काही बाबांनी बघीतला नाही, ते आम्हाला सोडून गेले. वारस म्हणून नंतर आम्हा भावाबहिणींची आणि आईची नावे केसला लागली. न्यायदेवता आंधळी असते ना ? तिला या माझ्या फसवल्या गेलेल्या बाबांच्या डोळ्यातलं पाणी कसं दिसणार ? तिला हवे असतात, कागदपत्र ! तिला तेवढंच दिसत असावं ! ते मात्र भरपूर होते. कोर्टाने तिचा दावा मंजूर केला, आणि तिचा हिस्सा तिला द्यावा, असा हुकूम केला. एवढेच नाही, तर आजपावेतोच्या उत्पन्नाची चौकशी करून, ते द्यावे हा पण आदेश केला. माझी आत्या पण त्या दाव्यांत होती, तिला पण हिस्सा आणि उत्पन्न द्यावे, हा हुकूम झाला.
आईला हा कोर्टाचा निकाल सांगीतला. आईच्या डोळ्यांत पाणी आले. ‘पोरांनो, तिला माझे दागिने तिच्या लग्नात दिले, त्यावेळी वाईट वाटलं होतं, पण एक समाधान होतं, ज्या पोरीला पोटच्या पोरांपेक्षा जास्त सांभाळले, ती सासरी तिच्या घरी जातेय ! जाऊ द्या ! आपण काही वाईट करत नाही. देवाने आपल्याला, ही धर्माची पोर सांभाळायला दिली, द्या तिला ! पण आता फक्त वाईट वाटतंय, ज्या पोरीचे पोटच्या पोरीप्रमाणे केले, तिने तुझ्या बाबांवर केस केली ! अरे, त्या माणसाने मला दिले नाही, पण तिला सर्व दिलं ! आईबापाविना पोर, म्हणून मी पण केलं ! आणि तुमच्या बापाला, माझ्या नवऱ्याला शेवटी तिने कोर्टात खेचावं ? कशासाठी व माय ? कितीतरी जास्त दिलं व तुले ! इतलं खाऊनपिऊन, तुझा हिस्सा जसाच्या तसा ! अन् तू माह्या नवऱ्याले जगातून कायमचा उठवला, हे बरं नाय केलं ! वरच्या कोर्टात जावा ! अजून वरच्या कोर्टात जावा ! विचारा त्या वरच्या देवाला !’ आयुष्यभर चुलीसमोर बसून, मान वर न करता, आपले जीवन चुलीपुढील स्वयंपाकात संपवणाऱ्या आईचा हा अवतार, मला नवीन होता. ती आता चुलीवरच्या जाळावर मुकाट स्वयंपाक करणारी राहिली नव्हती. चुलीतली जाळ आणि त्याची धग, तिच्या ह्रदयांत आली होती. ह्रदय जाळत होती. सरळ नवऱ्याला फसवल्या गेल्याची वेदना, इतक्या सहजासहजी शांत होणार नव्हती.
आम्ही या निकालाविरूद्ध जिल्हा कोर्टात अपील केले. वकील पण चांगले लावले, पण शेवटी या कोर्टात पण, निकाल मात्र विरूद्ध लागला. आईला निकाल सांगीतला. आई एकच वाक्य बोलली, ‘भारतातले वरचे सर्व कोर्ट संपले का ?’ आम्हाला तिचे म्हणणे समजले, आणि आता तुमच्याकडे आलोय. वरच्या कोर्टात, हायकोर्टात अपील करायचे आहे. मी सुन्न झालो होतो. मी कागद घेतले. अपील तयार करतो, म्हणून सांगीतले. त्याचे हे इतके ऐकल्यावर, त्यावेळी त्याला फी सांगावी असे काही वाटले नाही.
गेल्या पिढीतील ही घटना ! आपल्या स्वार्थासाठी मतलबाचे, तेवढेच सत्य सांगायचे, हे दाखवणारी ! आपल्या एकत्र कुटुंबात, त्यातील कर्ता, त्याच्या सदस्यांसाठी कागदपत्रे तयार करून घेतल्याशिवायच खूप गोष्टी करत असतो. आपण पोरांसाठी करतो, बायकोसाठी करतो. आपल्या या आपल्या कर्तव्य करण्याची कागदपत्रे करायची, त्याचा भविष्यात दस्तऐवज म्हणून कोर्टात उपयोग होईल, हा विचार कधी त्याच्या ना त्याच्या डोक्यात येतो, ना मनांत येतो. ही कल्पनाच त्याला सहन होत नाही. ही आपल्या संस्कृतीमधील नाही, तर समाजमनांत रूजणार कशी ? जे समाजात रूजलेच नाही, ते वर तरी कसे येणार ?
अलिकडे या अशा घटना खूप दिसतात. मुलींना एकत्र कुटुंबातील हिस्सा अवश्य मिळायला हवा, तसा कायदाच आहे. प्रश्न आहे, कायद्याव्यतिरिक्त आपल्या संस्कृतीने आपल्या वडिलधाऱ्यांवर जे कर्तव्य पार पाडायला हवे, ही जबाबदारी ठेवली आहे, त्याचे काय ? कायदा आणि त्यातील तत्वे पाळायची, का आपल्या संस्कृतीतील नितीमूल्ये ? कायदा पाळला नाही, तर त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी, समाजाने ही भलीमोठी न्यायव्यवस्था उभी केली आहे. न्यायालयाचा आदेश पाळला नाही, तर त्याचा अवमान होतो. आदेश न पाळणाऱ्याच्या मुसक्या आवळत त्याला आदेश पाळायला भाग पाडले जाते. ऐकले नाही तर तुरूंगाची हवा खावी लागते.
मात्र आमच्या संस्कृतीमधील, ही आमची चिरंतन मानली गेलेली नितीमूल्ये पाळली गेली नाही, तर त्याची तक्रार कोणत्या कोर्टात करणार ? ती पाळली गेली नाही, तर कोणाचाच अपमान होत नाही ? आमच्या या वैभवशाली, चिरंतन संस्कृतीचा पण नाही ? कागदपत्रे नसलेली, कर्तव्ये यापुढे कोणावरच पाळण्याची जबाबदारी नाही ? पुढच्या पिढीने मागच्या पिढीला असे फसवले, तर मुकाट सहन करायचे ? कोर्टाच्या फेऱ्या आपण आणि आपल्यानंतर आपल्या वारसांनी आयुष्यभर मारत रहायच्या ? पदराचे पैसे खर्च करून ? माणसाची कुतरओढ होते, ती इथं ! आपल्या अशा खूप प्रश्नांची उत्तरे, हा आपला समाज, लबाड माणसांच्या वागण्यातून शोधत असतो, पापभीरू आणि सरळ माणसांसाठी ! त्यांना न्याय मिळावा म्हणून !
© ॲड. माधव भोकरीकर
(आपल्याला पोस्ट शेअर करावी, असे वाटले तर अवश्य शेअर करा.)

23.2.2020

No comments:

Post a Comment