Sunday, May 10, 2020

‘पालघर घटने’संबंधी लिहीलेली पोस्ट !

आताच Sameer Gaikwad यांची संयत भाषेत ‘पालघर घटने’संबंधी लिहीलेली पोस्ट वाचली.
ही समस्या कशामुळे निर्माण होत असावी ? त्याची काही कारणे त्यांनी सांगीतली आहे. अजून बरीच कारणे असतील. मला काही कारणे जाणवतात, ती सांगण्याचा प्रयत्न करतो. केवळ तेवढीच कारणे आहेत, किंवा असतील असे नाही. आपापल्या अनुभवातून अजूनही, नवनवीन आणि माहीती नसलेली कारणे उजेडात येऊ शकतील !
समाजाचा गाडा समाजातील नेते जसा काही अंशी हाकत असतात, तसाच अलिकडच्या काळात प्रामुख्याने हाकला जातो, तो राजकीय पक्षांकडून, सत्तापद प्राप्त झाल्यावर ! त्यामुळे सत्ताप्राप्ती हे मुख्य काम राजकीय पक्षांचे होऊन बसते. यासाठी मग ज्या काही भल्याबुऱ्या तडजोडी कराव्या लागतात, करणे भाग पडते, त्या केल्या जातात. त्यात काहीवेळ समविचारी मंडळींशी होतात, तर काहीवेळ भिन्नविचारी मंडळींशी होती. या तडजोडी काही वेळा उघडपणे असतात, तर काहीवेळ गुप्त देखील असतात.
सत्तेसाठी कोणी लाज सोडलेली नाही, किती जण निर्लज्ज झालेत, ही यादी करायची तर बरेच कागद लागतील. निर्लज्ज कोण नाही, ही यादी करणं सोपं आहे. कागदाची पण गरज पडणार नाही. हाताच्या बोटांवर निभावून जाईल.
काहीवेळ अटीतटीची परिस्थती उद्भवते, वा हितचिंतक तथा हितशत्रूंकडून निर्माण केली जाते; मग अपेक्षित लाभ मिळत नाही, हे लक्षात आल्यावर जनतेसमोर पूर्वी झालेल्या शपथा आणि तडजोडींना क्षणात वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. यांतून जनतेच्या मनांतील भावनेशी वा अपेक्षांशी, संबंधीतांचा हेतू साध्य झाल्यावर त्यांना जनतेशी पुढील निवडणुका होईपावेतो, काहीही कर्तव्य नसते. इथं मी संधीसाधू हा शब्द लिहीलेला नाही, तथापि त्याचा अर्थ सध्या हाच अनुभवण्यास येत आहे.
यांसर्व घडामोडी गेल्या कित्येक वर्षांपासून जनता बघत आहे. निष्कर्ष हा की, विविध पक्षांच्या, समाजाच्या नेत्यांची समाजातील व जनतेच्या मनांतील विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत आहे. लबाडी करणे, कुटील वागणे याला हुशारी, कौशल्य व बुद्धीवानाचे लक्षण समजले जात आहे.
अजून एक अनुभव वारंवार येतो, की कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्यांना, म्हणजे पोलीस व संबंधीत दले यांना, ही नेतेमंडळी निर्वेधपणे आणि नियमाप्रमाणे काम करू देत नाही; परिणाम कामे रखडतात. असे जास्त काळ करता येत नाही, मग शेवटी तडजोडीचे ठरून, दोन तुमचे आणि चार आमचे ऐकायचे, यांवर समाप्ती होते. त्यानुसार काम सुरू झाले, की जनता व तुम्ही आम्ही संभ्रमीत होतो; कारण अपेक्षेपेक्षा काम वेगळ्या दिशेने जातो.
न्यायालयांची दिशा प्रत्येक वेळी दाखविली जाते, मात्र ही सार्वजनिक विषयांची व समस्यांची सर्व चौकशी, बऱ्याच अंशी सरकारच्याच अंतर्भूत असलेले विभाग करतात. परिणामी मोठमोठे विषय घेवून, जे फुगे फुगवले गेले असतात, त्यांचा न्यायालयात ‘फट्’ असा आवाज होऊन फुटतो. हे वारंवार घडायला लागले, की निष्कर्ष हाच निघतो की ‘चोर व सरकार’ यांचे साटेलोटे आहे, आणि हे जनतेसमोर त्या नाटकाचे प्रयोग करत आहे.
न्यायालयांत आपल्या अपेक्षेप्रमाणे न्याय मिळावा, ही अपेक्षा तर प्रत्येक पक्षकाराचीच असते, त्याला अपवादानेच कोणतेही सरकार अपवाद असेल.
असा वारंवार अनुभव आल्यावर, मग जनता कोणावर विश्वास ठेवणार ? परिणामी अफवांमधे, बेमालूमपणे सत्यासत्य मिसळवून, त्या संपूर्ण सत्य म्हणून पसरविल्या जातात. ज्याच्या हिताची म्हणण्यापेक्षा ज्याला लाभ घेता येईल अशी घटना घडली, की असे होते.
एक मात्र नक्की, जनता भोळी असेल, पण मूर्ख नाही. तिला सत्य काय आणि असत्य काय, हे नक्की समजते.

20.4.2020

No comments:

Post a Comment