Sunday, May 10, 2020

पण असे ‘गुडविल’ कमावणे इतके सोपे नसते बरं का !

येथील एखाद्याच्या लेख, पोस्टमधे त्यांचा काही विचार, भावना मांडण्याचा प्रयत्न असतो. काही वाचकांना तो पटतो, काहींना पटत नाही, तर काहींना अपूर्ण वाटतो. जो तो आपली स्वाभाविक प्रतिक्रिया कोणत्यातरी रूपात देतो. इथपर्यंत सर्व ठीक असते, अपेक्षेप्रमाणे असते. वातावरण शांत, स्थिर असते.
मग मधेच एखादा येतो, अन् तिथे असं काही लिहीतो, की ते वाचल्यावर, खळबळ उडते, चर्चेला दुसरीच दिशा लागते. एकमेकांवर फेकाफेक सुरू होते. त्याने असे का लिहीले असावं, याचा विचार केल्यावरही फार काही निष्पत्ती होत नाही. मग काही कारण नसतां, त्याची प्रोफाईल पहाण्याची उत्सुकता लागते. तिथं पण निराशा होते. तिथल्या त्याच्या माहितीप्रमाणे त्याची प्रतिक्रिया जुळत नाही. काहीवेळा तिथं काहीच माहिती नसते, वा स्वतंत्र पोस्ट नसतात. मग अजून गोंधळ ! मात्र हळूहळू या माणसांची भेट ठिकठिकाणी होते. त्यातून स्वभाव दिसायला, समजायला लागतो. मग मात्र त्याच्या प्रतिक्रियेचे विशेष वाटेनासे होते.
चिखलांत दगड फेकणारी, दुधात मिठाचा खडा टाकणारी, काळ्या जिभेची ही माणसं असतात ! यांच्या आसपास कोणी थांबत नाही. त्यांचा समज असतो, की ‘आपला दरारा वाढला’ ! असो. ते त्याचे ‘गुडविल’ असते. अशा ‘गुडविल’वाली मंडळी वाढत आहेत का ? चांगलं व विविध विषयांवर लिखाण करणारी मंडळी बाजूला जात आहे का ? मला, अर्थशास्त्र शिकवणाऱ्या आमच्या प्राध्यापकांचे एक वाक्य नेहमी लक्षात आहे, ‘खराब चलन, हे चांगल्या चलनाला चलनातून बाहेर काढते’ !
— काही असो, पण असे ‘गुडविल’ कमावणे इतके सोपे नसते बरं का !

4.3.2020

No comments:

Post a Comment