Sunday, May 10, 2020

पंजाबी डीश आणि पातळ भाजी !

पंजाबी डीश आणि पातळ भाजी !
परवा दोन-तीन दिवसांपूर्वी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावर ‘आपली आवड’ ऐकत होतो, सादर करत होते, मंगेश वाघमारे ! छान गाणी ऐकायला मिळत होती. हे ऐकतांना आपली आवड सादर करणारे, पूर्वीचे जळगांव आकाशवाणीतील तीनचार निवेदक मला आठवले - उषा शर्मा, मोहिनी पंडीत, दत्ता सरदेशमुख ! हे पण सुंदर कार्यक्रम सादर करायचे. निवेदिका सौ. मोहिनी पंडीत आता आपल्यांत नाही. श्रीमती उषा शर्मा फेसबुकवर आहे, माझ्या मित्र यादीत आहे. निवेदक श्री. दत्ता सरदेशमुख यांची माझी बऱ्याच वर्षांत भेट नाही.
रेडिओवर गाण्यापूर्वीचे संगीताचे चिरपरिचीत स्वर ऐकू आले. हो, शिवरंजनी रागाचे ! गाण्यापूर्वीच्या संगीतावरूनच क्षणांत लक्षात आले, ‘जाने कहा गये वो दिन’ हे गाणे आहे म्हणून ! राज कपूरच्या बहुचर्चित ‘मेरा नाम जोकर’ मधील हे गाणे, ‘हसरत जयपुरी’ यांचे ! संगीत दिले होते, राजकपूरच्या आवडत्या जोडीने शंकर-जयकिशन यांनी, आणि आवाज पण, जो खास राजकपूरचा म्हणून ओळखला जातो, त्या ‘मुकेश’ यांचा ! पूर्ण गाणे ऐकले शांतपणे, आणि मन गेलं जळगांवच्या माझ्या महाविद्यालयीन काळात !
त्यावेळी गणेशोत्सव, दुर्गोत्सव वगैरे सार्वजनिक कार्यक्रमात विविध वाद्यवृंद म्हणजे आर्क्रेस्ट्रा नेहमी बोलवायचे. दूरदर्शनचा एवढा प्रचार व प्रसार झालेला नव्हता, तर आज दिसत असलेली असंख्य चॅनेल्स आणि त्यावरील भरमसाठ कार्यक्रम दिसण्याचा प्रश्नच नव्हता. गांवातीलच काही कलाकार एकत्र येऊन असा कार्यक्रम सादर करायचे नियमीतपणे ! जळगांवचे पण तीन वाद्यवृंद आठवतात मला !
उल्हास साबळे -
जळगांवला ‘मुकेश-ए-महेफिल’ या नांवाने उल्हास साबळे त्यांचा वाद्यवृंद चालवायचे ! बहुतांशपणे मुकेश यांनी गायलेली गीते, त्यांत असायची. ‘जाने कहा गये वो दिन’ हे त्यांच्या आवडीचे खास गाणे ! गाणं ऐकत असतांना, खरोखर मुकेश यांची आठवण यायची ! त्यांच्या कार्यक्रमांत बहुतांशपणे चित्रपटातील गीते असायची. आमच्या नूतन मराठा काॅलेजमधे पण त्यांचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी मंत्री असलेल्या आणि नंतर भारताच्या राष्ट्रपती झालेल्या श्रीमती प्रतिभाताई पाटील, यांनी पण त्यांचे कौतुक केले होते.
शशिकांत आणि अपर्णा राजदेरकर -
दुसरा परिचित वाद्यवृंद म्हणजे, राजदेरकर दांपत्याचा ! शशिकांत राजदेरकर आणि अपर्णा राजदेरकर यांनी सुरू केलेला ‘आपली आवड’ या नांवाचा ! यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेले असल्याने, यांच्या कार्यक्रमांत भावगीते, भक्तीगीते, चित्रपटगीते पण असायची. एकदा जळगांवच्या ‘मल्टी पर्पज हाॅल’मधे कसल्यातरी निमित्ताने कार्यक्रम झाला होता. त्यावेळी त्यांनी म्हटलेले ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे गाणे आज पण माझ्या कानांत आहे.
ते आठवणीने नेहमी म्हणायचे एक अहिराणी गाणे ! ते जर विसरले, तर या गाण्याची खास फर्माईश व्हायची ! त्यातील एक ओळ फक्त आठवते. जावाई लग्नात रूसून बसलेला असतो, त्याची सर्व जण समजूत काढतात, पण तो राजी होत नाही. कोणी फटफटी देऊ म्हणून सांगतात, कोणी मोटार देऊ म्हणून सांगतात, तरी तो ऐकत नाही. शेवटी शरणागती पत्करून सर्व जण त्यांनाच विचारतात, काय हवे म्हणून ! मग तो सांगतो -
मले फफ्फटी नको, मले मोटर बी नको,
मले भातावर फक्त गूय पाह्यजे, गूय पाह्यजे !
शशिकांत राजदेरकर यांची बऱ्याच वेळा भेट व्हायची, ती जळगांवचे प्रसिद्ध संगीतज्ञ गोविंदराव कुलकर्णी यांच्याकडे ! एका वर्षी त्यांची मुलगी, तिचे आता नांव आठवत नाही, आमच्या रावेरला आमच्याकडे संगीताची परिक्षा द्यायला पण आली होती.
श्रीमती सुवर्णा दातार -
अजून जळगांवमधील तिसरे नांव, म्हणजे श्रीमती सुवर्णा दातार यांचे ! या तर शास्त्रीय संगीताच्याच गायिका आणि शिक्षिका ! तसा यांचा थोडा परिचय पूर्वीपासूनच ! जळगांवच्या खान्देश मील जवळ व रेल्वे स्टेशन लगतच त्यांचे घर ! जळगांव माझे आजोळ ! यांच्याकडे माझ्या आजीसोबत गेल्याचे पुसटसे आठवतेय !
त्यांचा मोठा वाद्यवृंद नाही, पण दर्जेदार गाण्यांचे सुंदर कार्यक्रम करायच्या त्या ! त्या स्वत:, हार्मोनिअम वादक, तबला वादक आणि मागे एखादा साथीदार, बस ! त्यांचा एक कार्यक्रम ऐकल्याचा आठवतोय, बळीराम पेठेत, ब्राह्मण सभेच्या गल्लीत झालेला ! गूंज उठी शहनाई, अमर भूपाळी वगैरे सारख्या चित्रपटातील कर्णमधुर गाणी त्यांनी म्हटली होती. संत ज्ञानेश्वरांचा ‘रूणूझुणू रूणूझुणू रे भ्रमरा’ हा त्यांनी म्हटलेला सुंदर अभंग आज पण लक्षात आहे.
त्यांची पण काहीवेळा भेट संगीतज्ञ गोविंदराव कुलकर्णी यांच्याकडे झाली होती. त्यांची अजून न विसरतां येण्यासारखी आठवण म्हणजे, आमच्याकडे अखिल भारतीय गांधर्व मंडळाचे परिक्षा केंद्र होते. माझी आई चालवायची ते केंद्र ! या संगीत केंद्रावर रावेरला, संगीताच्या परिक्षा घेण्यासाठी आमच्याकडे जुन्या घरी, भोकरीकर गल्लीत, त्या आल्या होत्या. आईचे माहेर जळगांवचे आणि या पण जळगांवच्या ! त्यांच्या झालेल्या भरपूर गप्पा थोड्या आठवतात.
त्यांचा वारसा आता समर्थपणे त्यांची मुलगी सौ. कस्तुरी दातार अट्रावलकर चालवते आहे.
आता गांवातीलच कलाकारांनी उभारलेले, हे असे वाद्यवृंद जवळपास संपलेले आहेत. आपल्याला काही ऐकायचे असले, की कोणत्याही मोठ्या कलाकाराचे नांव इंटरनेटवर टाकायचे, ‘यु ट्यूब’वर त्यांचे गाणे उपलब्ध असतेच ! ऐकावे आणि समाधान मानावे ! गांवातील, आपल्यात रोज वावरणाऱ्या मंडळींचा बैठकीवजा असलेला कार्यक्रम ऐकण्यातला घरगुतीपणा संपलेला आहे. बैठकांचे इव्हेंट झाले !
—— काही म्हणा, घरी केलेल्या पातळभाजीची अमृतासम चव, ही हाॅटेलमधल्या पंजाबी डीशला कशी येणार ?
© ॲड. माधव भोकरीकर

7.2.2020

No comments:

Post a Comment