Sunday, May 10, 2020

आज वैशाख शुद्ध द्वितीया, परशुराम जयंती !

आज वैशाख शुद्ध द्वितीया, परशुराम जयंती !
मला लहानपणापासून एक जाणवायचे, की आपल्यापेक्षा लहान असलेल्यास आशीर्वाद देतांना, त्याचे नांव लिहीतांना, अगोदर ‘चि.’ असे लिहायचे. तसे अलिकडे पण लिहीतात, प्रमाण कमी झालेय आता ! एक तर कोणाला माहिती नाही, आणि माहिती असले तर विश्वास नाही. मी मात्र एकदा प्रश्न केला आजीला, तिने मग श्लोक म्हणून दाखवला.
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥'
माझा पुढचा प्रश्न तयारच होता - चिरंजीव म्हणजे काय ?
‘अरे, चिरंजीव म्हणजे, ज्यांचे जीवन चिरंजीव, खूप असते, न संपणारे असते, ते चिरंजीव ! अश्वत्थामा म्हणजे द्रोणाचार्यांचा पुत्र, बली म्हणजे परम विष्णुभक्त प्रल्हादाचा नातू, व्यास म्हणजे सत्यवती आणि पाराशर ऋषी यांचा पुत्र की ज्यांनी अठरा पुराणे व महाभारत लिहीले, हनुमान म्हणजे आपल्या सर्वांना माहित असलेला रामभक्त हनुमान, विभीषण म्हणजे रावणाचा लहान भाऊ की जो रावणाच्या अधर्माला सोडून प्रभू रामचंद्रांकडे आला, कृप म्हणजे कृपाचार्य आणि परशुराम म्हणजे, रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी यांचा पुत्र ! हे सात जण चिरंजीव आहेत, असे मानले जाते.’ आजी मला सांगत होती.
भगवान विष्णुच्या विविध अवतारांचे जसे स्वतंत्र पुराण आहे, तसे भगवान परशुरामाचे काही स्वतंत्रपणे पुराण नाही. यांचा उल्लेख रामायणात येतो, तसा महाभारतात देखील येतो. अत्यंत पराक्रमी असे ब्राह्मण म्हणून जन्माला आलेले भगवान परशुराम, यांनी आपल्या शौर्याने एकवीस वेळा पृथ्वीला नि:क्षत्रीय केले, म्हणजे मदांध झालेल्या सत्ताधीशांचा पराभव केला. यांच्यासंबंधी एक श्लोक नेहमी म्हटला जातो, तो म्हणजे -
अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।
ज्ञानदर्शक असे चारही वेद आमच्या जिव्हेवर आहेत, आमचे मुखोद्गत आहेत. आमच्या पाठीवर धनुष्यबाण सज्ज आहे, म्हणजे आम्ही शस्त्रसज्ज व शौर्यवान आहोत. आम्ही ज्ञान देणारे, ब्रह्म जाणणारे आहोत, तसेच समाजपुरूषाचे रक्षण करणारे क्षत्रिय पण आहोत. आम्ही ज्ञानाने पराभूत करू शकतो, तसेच आमच्या युद्धकुशलतेने नेस्तनाबूत करू शकतो.
आपल्या आजच्या काळाला म्हणा, किंवा कोणत्याही काळाला लागू पडेल, इतके समर्पक उदाहरण यापेक्षा दुसरे कोणते असेल ?
परशुराम हे त्यांचे नांव कसे पडले, याची पण कथा आहे. ऋषी जमदग्नि आणि माता रेणुका यांना पाच पुत्र झाले. त्यांची नांवे - वसुमान, वसुषेण, वसु, विश्वावसु आणि राम अशी होती. भगवान शंकराने या रामाच्या तपश्चर्येने प्रसन्न होवून, त्यांना परशु दिला, तो त्यांनी धारण केला. तेव्हा, परशु धारण करणारा राम, तो परशुराम म्हणून विख्यात झाले. भगवान परशुराम हे विष्णुचे सहावे अवतार मानले गेले आहे.
कोकण भूमी ही सागर हटवून, परशुरामांनी निर्माण केलेली भूमी आहे, असे मानले जाते. गुजराथपासून केरळपर्यंत परशुराम निर्मित अशी भूमीआहे.म्हणून या भूमीला, कोकणला ‘देवभूमी’ मानण्यात येते.
श्रीक्षेत्र परशुराम हे शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेले महेंद्र पर्वतावरील तीर्थक्षेत्र आहे.चिपळूणपासून पाच मैलांवर असलेल्या या तीर्थक्षेत्रास श्रीपरशुरामांच्या वास्तव्यामुळे पौराणिक संदर्भ आहेत.
आजच्या परशुराम जयंती निमित्ताने त्यांना वंदन करू या !
© ॲड. माधव भोकरीकर
(पोस्ट आवडली असल्यास शेअर करू शकतात.)

25.4.2020

No comments:

Post a Comment