Sunday, May 10, 2020

एका गांवी, नातेवाईकांकडे मौंज होती. आग्रहाचे निमंत्रण होते, त्यामुळे तिथं गेलो होतो. मौंजीचे विधी करणारे गुरूजींजवळ बसलो होतो. वेळ मिळाला, की आमचे बोलणे व्हायचे, अर्थात निरूपद्रवी ! गुरूजींना पण, बोलूनबोलून ‘मी काय बोलणार’ याचा अंदाज असावा. माझा व्यवसाय वकिलीचा आहे, हे त्यांना कळल्यावर मग तर त्यांना उत्साह आला. त्यांचा ठोकताळा, की माझा या विधी, संस्कार वगैरेवर काही विश्वास नसावा, आणि याबद्दल मला काही कल्पना पण नसावी. मी पण माझे, तिथे कोणी विशेष परिचित नसल्याने, गुरूजींच्या जवळ बसून सर्व पहात होतो. कोणी कुठं पहात होतं, कोणी कुठं फिरत होतं, मी मात्र तिथं निवांत बसलो होतो, कदाचित वकिलांच्या वाटेस जाऊ नये, म्हणून पण माझ्या वाऱ्याला कोणीनउभे रहात नसावे.
मी एकटा व निरुपद्रवी आहे, याचा अंदाज घेऊन गुरूजींनी मग त्यांच्या आवडीचे सांगून, त्याच्या कामाच्या महत्वासोबतच, ‘अलिकडच्या लोकांना शास्त्रांत कसा रस नाही, थातुरमातुर करायची अपेक्षा करतात. मला ते कसे आवडत नाही. शास्त्रार्थ जे सांगीतले आहे, ते का टाळू नये’ वगैरे सुरू केले, माझ्यापासून कसलाही धोका नाही, या समजुतीने ! मी ऐकत होतो. त्यांचा मला काहीच माहीत नसावे, हा अंदाज मात्र चुकला. माझ्या वाचण्याच्या बेफाम भुकेने मी नाहीनाही ती पुस्तके वाचली आहेत. संगीताची, ज्योतिष्य, हस्तरेषा, रत्नशास्त्र वगैरे ! तसेच सोळा संस्कार, त्याचे विधी व महत्व याबद्दल पण मी वाचले होते.
मला राहवले गेले नाही, आणि मग मी काही शंका, प्रश्न त्यांना विचारल्यावर ते जरा बुचकाळ्यात पडले. नंतर मी त्यांना काही, कदाचित नवीन असलेली, माहिती सांगीतल्यावर, त्यांची माझ्याकडे बघण्याची नजर बदलली. त्यानंतर तर ते मुकाट्याने विधी करू लागले, आणि नंतर मी जाईपर्यंत माझ्याशी बोलले नाही.
त्यामुळे लग्नकार्याला गेल्यावर सर्वजण फक्त भोजन, फोटो काढवून घेणे किंवा काढणे, तसेच ज्याच्या त्याच्या वयोमानाप्रमाणे आपापले महत्वाचे काम करत असतात. विधीकडे कोणाचे लक्ष नसते, हे एका दृष्टीने चांगलेच असते. मात्र सर्वच ठिकाणी तसे होत नाही. माझ्यासारखी मंडळी, कुठं अपरिचित ठिकाणी गेली, तर अशा माणसांमुळे काही वेळा, काही जण निष्कारण अडचणीत सापडतात. 😀😀
Rama Tamhankar यांनी जुनी आठवण करून दिली.

5.3.2020

No comments:

Post a Comment