Sunday, May 10, 2020

कंस वध !



कंस वध !
आमच्या गांवी बावीशे गल्लीच्या टोकावर, रामदास बुवा यांचे ‘बालकराम मंदीर’ आहे. ते बुवा आता हयात नाही. त्यांचे चिरंजीव, श्री. पांडुरंग ते मंदीर सांभाळतात. माझे बालपण त्या मंदीरात, माझ्या आईसोबत विविध उत्सावात, अगदी उत्साहाने सहभागी होत गेले. चैत्री नवरात्राचा उत्सव तिथं मोठा व्हायचा. आम्हा मुलांची तर मोठी पंचाईत व्हायची ! गांवात तीनतीन रामाची मंदीरे, श्रीरामबुवा साठे यांचे ‘मोठे राम मंदीर’, बाबुकाका डोखळे यांचे ‘चिमणाराम मंदीर’ आणि रामदास बुवा यांचे ‘बालकराम मंदीर’ ! सर्व मंदीरात दर्शनाला जाणे ठीक आहे, पण तिन्ही ठिकाणी जेवायला जाणे मात्र आम्हा मुलांना शक्य नसायचे ! आमची पोटे ती किती मोठी असणार ?
बाकी काही असले, तरी त्या मंदीरात दरवर्षी विविध पुराणे ते रामदास बुवा वाचायचे, त्यात ‘भागवत सप्ता’ पण व्हायचा. आम्हा मुलांना त्या पोथ्यापुराणांमधील फार काही समजत नसे. मात्र त्यांची निवेदन शैली खूप छान होती. त्या दिवशीचा भाग झाला, की ‘दक्षिणे लक्ष्मणो यस्य’ हा पूर्ण श्लोक व्हायचा. काही वेळा माझी आई एखादे कथेनुरूप गाणे म्हणायची.
भागवत पुराण सुरू असले, की कथा ऐकायला येणाऱ्या बायकांसोबत आमच्या वयाची, चौथीपाचवीतील पोरंसोरं पण गर्दी करायची. गोष्टी ऐकणं कोणाला आवडत नाही ? त्यांत जर, चमत्कारांनी भरलेल्या गोष्टी असल्या तर विचारायलाच नको ! भगवान कृष्णाच्या भागवतात, तर चमत्कार पावलोपावली ! बलराम आणि श्रीकृष्णात आम्ही मुलं, आमच्यातील आदर्श शोधत असायचो.
मग दिवस यायचा, तो ‘कंस वधाचा’ ! सर्वांच्या आया, त्या दिवशी आपापल्या मुलांना आवर्जून घेऊन यायच्या, त्यांच्याकडून त्या दिवशी नारळ फोडले जायचे ! येतांना प्रत्येकीसोबत एक नारळ असायचे. तिथं मंदीरात गेलं, की आम्हाला नारळ सोलायला सांगीतले जायचे. मंदीराच्या बाहेर पायरीजवळ एक दगड असायचा. तिथं आम्ही मुलं नारळ सोलत बसायचो. नारळ पूर्ण गोटा केलेले चालत नाही. त्याला शेपटी ठेवावी लागे. बायकांनी नारळ फोडू नये, हा समज ! त्यामुळे जर कोणासोबत, मुलगा नसेल, तर त्यांनी आणलेले नारळ पण फोडायचे काम आमच्यावर यायचे.
इकडे कुब्जेचे कुबड फक्त चंदनाच्या लेपाच्या बदल्यात नाहीसे झाले. राजाच्या धोब्याला बलराम कृष्णाने धडा शिकवून वस्त्रे परिधान केलेली ! मथुरेत या दोन्ही मुलांची चर्चा ! यज्ञाच्या ठिकाणी ते आलेले ! बेफाम झालेला हत्ती शांत केलेला ! आणि काय सांगता महाराज, ते पहाडाएवढे मुष्टीक व चाणूर, हे मल्ल या दोन बालकांना भिडले ! बायकांमध्ये सुस्कारे ! तेवढ्यात बलराम व कृष्णाने दोन्ही मल्लांना मारलेले ! आम्हाला उत्साह ! कृष्णाचा मामा कंस घाबरलाय ! यज्ञासाठी जमलेल्या प्रजेचा उत्साह ओसंडतोय नुसता ! आमची पण उत्सुकता शिगेला पोहोचलेली.
आम्ही सर्व मुले दरवाजाबाहेर नारळ घेऊन ! कृष्णाने झपझप उड्या मारत कंसाला गाठलेले. त्याला धक्का देऊन खाली पाडलेले. आमचा हात, सोललेले नारळ धरून वर ! कृष्ण कंसाच्या छाताडावर बसलेला. कृष्णाने कंसाला, त्याच्या मामाला, बुक्का मारलेला ! आम्ही नारळ हलकेच दगडावर आपटून, फोडायच्या तयारीत वर उचललेले ! शेवटी कृष्णाने कंसाला, त्याचा गच्च मजबूत बुक्का मारला आणि कंस भडाभडा रक्त ओकू लागला, त्याचा प्राण गेला. हे म्हटल्याबरोबर, आम्हा मुलांचे हात नारळासहीत दगडावर !
मग काहींचे नारळ फुटायचे, एक तुकडा हातात, व दुसरा तुकडा दूरवर पडायचा ! तो उचलायला, त्याला पळावे लागे. एखाद्याचे नारळ वेडेवाकडे फुटायचे आणि नारळातून सर्व पाणी इकडेतिकडे उडायचे. सोबत आणलेल्या पेल्यात, जेमतेम थेंबभर पाणी पडायचे. एखाद्याचे नारळास नुसतीच चीर पडायची, ते हाताने उघडायला जायचे, तर जबरदस्त चिमटी बसायची. असे एकेक करत सर्वांची नारळे फोडली जायची. आंतमधे मंदीरात, बुवा महाराजांनी कंसाचा वध झाला, हे सांगीतले असल्याने, सर्व मुलांच्या काकू-आया-मावशींच्या टाळ्याचा गजर व पुष्पवृष्टी सुरू असायची. मग आम्ही सर्व वीर फोडलेले नारळ घेऊन, आंत मंदीरात यायचो. मग या सर्व फोडलेल्या नारळातील खोबऱ्याचे, तुकडे करायचे काम पण आमच्याकडे असायचे ! सर्वांना त्याचा व खडीसाखरेचा प्रसाद वाटला जायचा. — आणि शेवटी पुन्हा, ‘दक्षिणे लक्ष्मणो यस्य —‘ हा रामरक्षेतील श्लोक म्हणत, त्या दिवशीचा कथाभाग संपायचा !
——- आज, दूरदर्शनवर महाभारतात ‘कंस वध’ दाखवला, आणि डोळ्यांसमोर ‘रामदास बुवा’ बालकराम मंदीरांत भागवत सांगत आहे. आमच्या हातात सोललेले नारळ आणि आम्ही ते फोडण्याच्या तयारीत, हे दृष्य उभे राहीले.

© ॲड. माधव भोकरीकर
(पोस्ट आवडली असल्यास शेअर करू शकतात.)

5.4.2020

No comments:

Post a Comment