Sunday, May 10, 2020

अष्टपैलू व्यक्तीमत्व - आर. बी. जोशी सर !

अष्टपैलू व्यक्तीमत्व - आर. बी. जोशी सर !
माझे गांव रावेर ! तसे छोटे गांव, माझ्या बालपणी, शालेय काळांत तर अजूनच लहान ! आपले गांव लहान असले, की जसे तोटे असतात, तसे बरेच फायदे पण असतात. तोटे म्हणजे, तुम्ही किंवा तुमची कामगिरी, कृत्य फार काळ कोणापासून लपून रहात नाही, त्याची फळे लगेच तुम्हाला मिळतात. मग फायदा म्हणाल, तर हीच गोष्ट तुमच्यासाठी फायद्याची ठरते. किरकोळ गोष्टी पण तुमचे संबंध, आयुष्यासाठी पक्के करतात.
मी बऱ्यावेळा प्रभाकरकाकांकडे, माझ्या वडिलांसोबत जायचो. तिथं आमचा वावर हा, त्यांच्या घरात ‘आसेतुहिमाचल’ असा असायचा. प्रभाकरकाका, म्हणजे डाॅ. प्रभाकर आठवले, माझ्या वडिलांचे बालपणापासूनचे मित्र ! तिथं पहिल्यांदा मी त्यांना, जोशी सरांना बघीतलं, नंतर पण मला, बऱ्याचवेळा ते तिथं दिसायचे. वडिलांना घरी परत जातांना, ‘ते कोण ?’ विचारल्यावर, ‘ते रामभाऊ जोशी सर ! आपल्या शाळेत आहेत. मात्र त्यांना काका म्हणायचं !’. त्यावेळी मराठी चौथीत असावा मी, पुढच्या वर्षी पाचवीत, मग कदाचित हायस्कूलमधे जायला मिळेल, हा अंदाज !
सरदार जी. जी. हायस्कूलमधे मी पाचवीमधे गेलो, तसा प्रवेश घेतला. उन्हाळ्याच्या सुटीनंतर शाळा नुकतीच सुरू झाली असली, की वर्गात आणि मैदानावर होणाऱ्या तासांचा, जो अविस्मरणीय गोंधळ सुरू असायचा, त्याला त्यावेळी अजिबात तोड नसायची, कदाचित आज पण तोड नसावी. आपल्याला वाटते, की वर्गात कोणीतरी शिकवायला येईल, म्हणून आपण काहीतरी पुस्तक काढून तयार असावे, तोच ‘एका रांगेत शांततेने नीट ग्राउंडवर चलायची’ सूचना आलेली असायची. ही वेळापत्रकाप्रमाणे नियमीत तास होण्याच्या सुरुवातीची अवस्था असायची, त्यामुळे वेळापत्रक हे फक्त शिक्षकांनाच माहीत असायचे, विद्यार्थ्यांना नाही. तसे बघीतले, तर आम्हाला एका पिशवीत त्या वर्षाची, सर्व वह्या आणि पुस्तके शाळेत नेण्याची रोजची सवय असल्याने, येणाऱ्या शिक्षकांनी कोणतेही पुस्तक सांगीतले, तरी आम्ही ते काढत असू. वह्यांचा अंदाज मात्र काही वेळा चुकत असे. त्यांवर आमचा उपाय ठरलेला होता. सर्वसमावेशक अशी ‘रफ वही’ त्याचवेळी कामास यायची. ज्या विषयाची वही आणलेली नसायची, त्यासाठी ही ‘रफ वही’ !
‘मोठ्या वर्गांना चांगले सर असतात, आपल्याला नाही’, असा भेदभाव का करतात, याचे कारण मला नेमके शाळेत असेपावेतो तरी समजले नाही. दीक्षित सर, जोशी सर, बोरोले सर, पुराणिक सर, भोकरीकर सर, पाटील सर, वानखेडे सर, वाणी सर, लोहार सर, जमादार सर, पितळे बाई वगैरे सर्व मंडळी आम्हाला का नको ? त्यांना वरच्या वर्गावरच का ? मात्र आमचे शालेय जीवन संपल्यावर लक्षात आले, तसं काही नसतं ! सर्वच शिक्षक चांगले असतात, जे आपल्याला शिकवत नसतात, त्यांची आपल्याला उत्सुकता असते.
माझी नववीपर्यंत तर सकाळचीच शाळा होती, दहावी व नंतरच्या वर्गाची शाळा दुपारून असायची. पाचवीत त्या शाळेत गेलेला मी, बघताबघता दहावीला गेलो. माझा दहावी, ‘अ’ चा वर्ग ! रोज दुपारी अकरा साडेअकराला शाळेत जायला निघायचो, तर मग मात्र शाळेत जातांना, सर शाळेच्या रस्त्यावर दिसायचे !
हो, आर. बी. जोशी सर ! अगदी गोरापान वर्ण, सरळ व धारदार नाक, अगदी घारे डोळे, गोलसर चेहरा ! नाक वर ओढतांना जिवणी डाव्याउजव्या, अशा दोन्ही बाजूला नेत नाक वर ओढण्याची लकब ! ओठ कायम घट्ट बंद केलेले पण काहीतरी बोलायला उत्सुक असलेले वाटतील, अशी ठेवण ! बेताची उंची, ढगळढगळ पॅंट, बहुदा काळसर वा करड्या रंगाची, क्वचित शेवाळ्या रंगाची पण ! शक्यतोवर पांढरा शर्ट, त्यांची पहिली गुंडी बहुदा लावलेली नसायची, आणि शर्टची निम्मी काॅलर मानेवर बरोबर उभी असलेली, आणि निम्मी काॅलरच्या नेहेमीच्या ठिकाणी ! शर्टच्या डाव्या खिशात दोन-तीन पेन व छोटी डायरी ! हे आपण त्यांना समोरून बघीतले तर क्षणांत लक्षात येईल, असे व्यक्तीमत्व ! हातात बहुतेक कडुलिंबाची लवचिक, आपल्या पेराएवढी जाड हिरवीगार आणि दीडहात भरेल, अशी काडी ! आणि छोटीछोटी पावले टाकत, चालण्याची सवय ! हे पाठमोरे बघीतले, तरी लक्षात येईल, अशी ठेवण !
मी दहावीला गेलो, तसे ते एकदा वर्गावर आले. हातात इंग्रजीचे पुस्तक ! आम्हाला आश्चर्यच वाटले, बराच वेळ ग्राउंडवरच दिसणाऱ्या सरांच्या हातात इंग्रजीचे पुस्तक ! त्यांनी शिकवायला सुरूवात केली, ती म्हणजे अवांतर गप्पांनी, इंग्रजी भाषा कशी सुधरवता येतील, या दृष्टीने ! त्यांनी आम्हाला इंग्रजीतला दुसरा धडा, ‘Rubber’ यांवरचा होता. इंग्रजी पण इतक्या सोप्या पद्धतीने शिकवता येते, हे समजले. ते आम्हाला, जवळपास दोन महिनेच जेमतेम असतील, नंतर पुराणिक सर आले. विद्यार्थ्यांना विषय सोप्या पद्धतीने शिकवणे, हे सोपे अजिबात नाही; हे आज पण एखादा युक्तीवाद करतांना लक्षात येते.
जोशी सर, विद्यार्थ्यांत जास्त रमत, ते ग्राउंडवरच ! ते शारिरिक शिक्षण का एन् डी एस् आम्हाला शिकवायचे. एन् डी एस् चा अर्थ मला अजून समजला नाही. मात्र हा तास असला, की शाळेच्या भल्यामोठ्या मैदानावर जायचे. काही वेळा सायन्स हाॅलच्या शेजारच्या छोट्या खोलीतून, लाकडी डंबेल्स, लेझीम यांची पोती ग्राउंडवर न्यावी लागत. ती न्यायला दोन जण लागायचे, पण तयार मात्र प्रत्येक जण असायचा. ग्राउंडवर मग कवायत शिकवायचे, त्याचे वेगवेगळे हात ! डंबेल्सचे वेगवेगळे हात, लेझीमचे विविध हात त्यांनी शिकवायचे ! क्रिकेटची बॅट हातात कशी धरायची, आणि तशीच का धरायची ? फटक्यांचे विविध प्रकार - कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, लेट कट, फ्लिक, वगैरे प्रकार शिकवले. क्रिकेट बाॅलवर फिरकी गोलंदाजी करतांना पकड कशी असते, आणि जलद गोलंदाजी करतांना पकड कशी असते ? बोटांची ठेवण, फेकण्याची पध्दत कशी असावी ? बेसबाॅल कसा खेळायचा, त्याचे नियम ! लांब उडी, उंच उडी ! किती वेळात किती अंतर पळायला हवे ! शाळेच्या ग्राउंडवरील माझ्या पाचवीच्या वर्गाला लागून तीन कडूलिंबाची झाडे होती, त्या झाडाचे खोड जरा बसता येईल असे होते. त्या खोडावर बसून जोशी सरांनी आम्हाला कित्येक वेळा बैठ्या व मैदानावरील विविध खेळाच्या गोष्टी सांगीतल्याचे प्रसंग अजून डोळ्यांसमोर येतात. हे सर्व ऐकल्यावर, खेळल्यावर अंगात वेगळाच उत्साह आणि हलकेपणा यायचा !
आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, म्हणजे २६ जानेवारीला आमच्या शाळेच्या मैदानावर मोठी परेड व्हायची. पोलीस, गृहरक्षक दल, स्काउट व गाईड, एन् सी सी चे विद्यार्थी, आमच्या दोन्ही शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची कवायत ! तहसीलदार, फौजदार, स्वातंत्र्य सैनिक, गांवातील प्रतिष्ठित मंडळी देखील यायची, हे बघायला उत्साहाने ! ही गर्दी असायची बघायला ! त्यावेळी सर्व नियंत्रण असायचे ते या ग्राउंडवर काम करत असलेल्या शिक्षकांचे ! त्यांत कोल्हे सर, बोरोले सर, व्ही. ई. पाटील सर आणि आमचे जोशी सर ! ग्राउंडची साफसफाई, त्यांवर पाणी टाकून धूळ उडणार नाही, असे बघणे. चुन्याच्या भुकटीने बरोबर सुती दोरीच्या रेषेत खुणा करून, कोण कुठे बसणार याचे विभाग करणे ! खूप तयारी असायची.
काही असो, त्यांच्या हातातील काडी, त्यांची खूण बनली असेल, ओळख बनली असेल पण, त्यांच्या हातात असलेली पेरभर जाड, अशी हिरवीगार कडुलिंबाची काडी, कधी कोणाच्या अंगावर लालतांबडे वळ उमटण्यास कारणीभूत झालेली, मी बघीतली नाही. विद्यार्थ्यांशी त्यांचे संबंध अगदी मित्रत्वाचे ! खेळासंबंधाने त्यांना काहीही विचारा, हवी ती माहिती मिळणार ! या खेळामुळे, त्यांच्यातील भाषेचा शिक्षक दबला असावा, असे आता उगीच मला वाटते.
दहावीला बोर्डाच्या परिक्षेला फाॅर्म भरायचा होता, त्यावेळी वानखेडे सर आणि जोशी सर आम्हा सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वरच्या मजल्यावर मोठ्या वर्गात घेऊन गेले. तिथं गेल्यावर परिक्षेचा फाॅर्म कसा भरायचा, हे त्यांनी अगदी तपशीलवार सांगीतले, स्पेलिंगसहीत ! बोर्डावर वळणदार अक्षरांत लिहून ! आपल्या विद्यार्थ्याला कोणत्याही कारणांमुळे संकट येऊ नये, याची पुरेपूर काळजी शाळा व त्यांतील शिक्षक घेत असत. असं काही आठवलं, की आज पण बोट धरून लहानग्याला चालायला शिकवणारी आई आठवते.
मी अकरावीला गेल्यावर आम्ही गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही जणांनी ‘हंगर स्ट्राईक’ नांवाची एकांकिका बसवली. त्यावेळी मात्र आम्ही सर्व जण जमायचो, ते जोशी सरांच्या घरी, मठाजवळ, विखे चौकात ! तिथं घरासारखे वातावरण, काकू घरातले काम करत, आमचे काम ऐकत असायच्या ! त्यांची मुले म्हणजे आमच्याच शाळेत, आमच्यापेक्षा मोठी ! शाळेत होणारे नाटक, त्याची तयारी घरात चालली आहे, हे कोणत्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवडणार नाही ? त्यांनी नाटकांतील वाक्य कसे उच्चारावे, त्यांतील भाव कोणता, तो कसा व्यक्त करायचा, व्यवस्थित सांगीतले. करून पण दाखवायचे. या आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली बसवलेल्या एकांकिकेचे प्रयोग गणेशोत्सवाच्या निमीत्त गांवात पण इतरत्र केले.
आमच्या शाळेत नाट्यवेडे आणि काम करण्याची हुन्नर असणारे, दोन शिक्षक ! एक म्हणजे, बालाजीवाले सर आणि दुसरे आर. बी. जोशी सर ! गांवात सांस्कृतिक वातावरण निर्माण व्हावे, टिकावे आणि वाढावे यासाठी, आवर्जून प्रयत्न करणारी जी मंडळी होती, त्यांत जोशी सर होते. संगीताची आवड, हा अजून एक गुण त्यांच्यात होता. आमच्या घराच्या मागे नाल्यावरील, बालवाडीत बहुदा ‘देव नाही देव्हाऱ्यात’, तसेच नंतर ‘अमृतवेल’ या नाटकाची तालीम चालत असायची. त्या नाटकाचा प्रयोग या सर्व मंडळींनी, उत्साहाने गांवात केला. मला जसं आठवते, तसेच ‘साष्टांग नमस्कार’ हे आचार्य अत्रे यांचे नाटक त्यांनी बसवले होते, त्याचा गांवात प्रयोग केला होता. रावेर सारख्या छोट्या गांवात, काही उत्साही मंडळी असतात, आपल्या त्यावेळच्या तुटपुंज्या पगारात, जेमतेम असलेल्या उत्पन्नात हे सांस्कृतिक वातावरण जपतात, जिवंत ठेवतात, ही फार मोलाची गोष्ट आहे. आज आपल्याला विशेष वाटणार नाही, मात्र संपूर्ण गांवातील टेलिफोन धारकांची यादी वहीच्या एका पानावर संपायची ! कोणाला निरोप द्यायचा असेल गांवात, तर त्याच्या प्रत्यक्ष घरीच जाऊन निरोप द्यावा लागे, त्यावेळची ही गोष्ट आहे.
मध्यंतरी वडील गेल्यानंतर, माझी आई माझेजवळ औरंगाबादला होती. ‘मी मित्राच्या लग्नाला पुण्याला गेलो होतो, त्यावेळी श्री. किशोर जोशी भेटले होते’, हे सांगीतले. तिच्या लक्षात येईना, मग ‘जोशी सरांचा मुलगा’ हे सांगीतल्यावर लक्षात आले.
‘पहा, त्याची आई कमलाबाई आणि मी, मडकेताई समितीच्या कार्यक्रमाला नेहमी असायचो. कशी आहे रे, तब्येत त्यांची ? कशी असणार, माझ्यासारखीच असणार !’ आईच्या आठवणी सुरू झाल्या. माझी आणि काकूंची भेट झाली नाही, पण किशोर जोशी, त्यांच्या मुलाची मात्र झाली.
‘मला पण घेऊन चल एकदा ! बरीच जण गांव सोडल्यापासून भेटलीच नाही बघ ! भेटावे वाटते. तब्येतीने हिंमत होत नाही.’ आई बोलत होती.
आता जोशी सर पण नाही आणि जोशी काकू पण नाही. त्यांनी रावेर सोडल्यावर त्यांची भेट झालीच नाही. अधूनमधून बातमी समजायची, ती डाॅ. राजेंद्र आठवले यांच्याकडून ! मला पण गांव सोडून बरीच वर्षे झालीत, तरी काही आठवणी येत रहातात. आज संध्याकाळी बातम्या ऐकत होतो. त्यात परवाच्या ‘प्रजासत्ताक दिनाची तयारी’ वगैरे बातमी होती. बातमी ऐकली, मन थेट मागे गेले, सन १९७७-७८ सालात ! काही तरी आठवलं आणि लिहीत बसलो ! — एक मात्र बरं वाटते, आशादायक वाटते, आमची पिढी म्हणजे पुढची पिढी, हे गांवातील नाते अजून जपतेय, पूर्वीसारखेच ! यापुढचं आपण काय सांगणार ?
© ॲड. माधव भोकरीकर
(जोशी सर आणि जोशी काकूंचा फोटो - सरांचे चिरंजीव श्री. किशोर जोशी यांचेकडून मिळाला)

24.1.2020

Image may contain: 2 people

No comments:

Post a Comment