Sunday, May 10, 2020

ज्वारीच्या पीठाची शेव करण्याची कृती !

ज्वारीच्या पीठाची शेव करण्याची कृती !
आताच मी यासंबंधाने पोस्ट टाकली होती. याच्या कृतीची विचारणा आपल्याकडून झाल्याने, आपणा सर्वांसाठी, ज्वारीच्या पीठाची शेव करण्याची कृती देत आहे.
कृती -
साहित्य - ज्वारी चे पीठ 4 वाटी,मीठ,हळद , तिखट
प्रथम वाफवलेली शेव करावयाची -
ज्वारीच्या पीठात चवीनुसार मीठ टाकून भिजवून घ्यावे, पीठ मळून घ्यावे. एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते गॅसवर गरम करण्यास ठेवावे. त्यामध्ये स्टॅन्ड ठेवून, त्यावर चाळणी ठेवावी. चाळणीवर शेव करण्याच्या साच्याने शेव पाडून घ्यावी. नंतर त्यांवर झाकण ठेवून ती नुकतीच केलेली शेव वाफवावी. साधारणत: १० मिनीटांनंतर ती एका ताटात काढून घ्यावी. अशाप्रकारे बाकी राहीलेल्या पीठाची पण शेव करून घ्यावी.
याचे दोन प्रकार सांगता येतील.
प्रकार १ - शेव (indian style)
साहित्य - १ मोठा कांदा बारीक चिरून, १ मोठा टोमॅटो बारीक चिरून, पाव वाटी शेंगदाणे, अर्ध्या लिंबाचा रस , कोथिंबीर बारीक चिरून, वाफवलेली शेव ३ वाट्या
कृती - कढईमध्ये फोडणीपुरता तेल टाकून त्यात थोडे शेंगदाणे तळून एका ताटात ते काढून घ्यावे. फोडणीत मोहरी, जिरे चांगले तडतडल्यावर, मग कांदा थोडा परतावा, नंतर त्यात क्रमाने कढीपत्ता व टमाटे परतून घ्यावे. त्यात नंतर अर्धा चमचा हळद, २ चमचे तिखट. हिंग टाकून परतून घ्यावे.
यानंतर पूर्वीच वाफवलेल्या शेवेचे बारीकतुकडे करून ते कढईत टाकावेत आणि ते मंद आचेवर परतून घ्यावे. त्यात आपल्या चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस टाकून एक वाफ येवू द्यावी. मग एका डीशमध्ये वाफवलेली शेव घेऊन, त्यावर आवडीनुसार हरबऱ्याच्या पिठाची तळलेली आपली नेहमी परिचित असलेली बारीक शेव आणि कोथिंबीर टाकावी.
प्रकार -२
ज्वारीच्या शेजवान नूडल्स 🍜
साहित्य - लसूण (५-६ मध्यम पाकळ्या),अर्धा इंच आले, १ मध्यम चिरलेला कांदा, २ वाट्या लांब चिरलेल्या भाज्या - सिमली मिर्ची, पत्ताकोबी, गाजर वगैरे. ३ वाट्या वाफवलेल्या ज्वारीच्या पिठाची शेव (याची कृती वर दिल्याप्रमाणे), सोया साॅस, शेजवान साॅस, टोमॅटो साॅस / केचप, चवीनुसार मीठ आणि पांढरी मिरे पावडर
कृती - कढईत तेलावर लसूण (५-६ मध्यम पाकळ्या) आणि अर्धा इंच आले बारीक चिरून टाकाव्यात. त्यानंतर १ मध्यम चिरलेला कांदा टाकून, साधारणत: २० सेकंद परतून घ्यावा, मग २ वाट्या लांब चिरलेल्या भाज्या - सिमली मिर्ची,पत्ताकोबी, गाजर ई. टाकून ३० सेकंद परतावे. त्यानंतर ३ वाट्या वाफवलेल्या ज्वारीच्या पिठाची शेव टाकावी आणि हे सर्व एकत्र करावे.
आता ३ टेबलस्पून सोया साॅस, २ टेबलस्पून शेजवान साॅस, २ टेबलस्पून टोमॅटो साॅस/केचप, चवीनुसार मीठ, आणि १ टीस्पून पांढरी मिरे पावडर नूडल्सवर टाकून थोडा वेळ परतावे..
टिप : भाज्या जास्त वेळ परतू नये, कच्च्याच ठेवाव्या.. भाज्या, साॅसचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.
झाली ज्वारीच्या पीठाची शेव तयार आपणा सर्वांसाठी !
© ॲड. माधव भोकरीकर
(पोस्ट आवडल्यास आपण शेअर करू शकतात.)

30.4.2020

No comments:

Post a Comment