Sunday, May 10, 2020

काॅटवजा पलंग आणि संक्रांतीचे हळदीकुंकू !

काॅटवजा पलंग आणि संक्रांतीचे हळदीकुंकू !
रावेरला वकीली करत असतांना, आमच्या वकील मंडळीत वातावरण अगदी मोकळे असायचे. काही जणांना तर घरगुती गोष्टींची पण विचारपूस करण्यात संकोच वाटत नसे. कोणास कोणती गोष्ट, वस्तू घ्यायची असली, तर सहजपणे दुसऱ्यांस, ‘ही वस्तू कशी हवी, कोठून घ्यावी’ म्हणून विचारले जाई.
दिवस हे असे जानेवारी फेब्रुवारीचे होते. माझ्या एका वकील मित्रांना लोखंडी पट्ट्यांचा पलंगवजा काॅट घ्यायचा होता. त्यांनी मला सहज विचारले, ‘कुठून घ्यावा ?’
‘आयता घेऊ नका. चांगला तयार करून घ्या !’ मी.
‘तयार करून घेतला, की वेळ जाईल. तो पैसे पण जास्त सांगतो, वेल्डिंगवाला !’ ते वकील.
‘तुम्ही पैशाकडे पाहू नका. त्यांना जवळचा माल खपवायचा असतो. ते काहीही आश्वासन देतात. तुम्ही मजबूत तयार करून घ्या, स्वत:च्या देखरेखीखाली.’ मी.
‘आपल्याला कोणता एवढा मजबूत हवा आहे ? मी एकटा किंवा एखादे वेळी पोरगा झोपेल त्यांवर !’ ते.
विषय तेवढ्यावर राहीला. दोन-तीन दिवस गेले. आणि एके दिवशी बोलताबोलता, ‘काल संध्याकाळी त्याचा माणूस एकटा घेऊन आला पलंग ! अगदी काॅट करा, आणि उलगडून पलंग करा. मस्त आहे !’ ते वकील.
‘एकटा घेऊन आला ? अहो, आमच्याकडील जुना पलंग उचलायला दोन माणसं लागतात. तुम्ही अजून ऐका. त्याला पलंग तुमच्यासमोर बनवून द्यायला सांगा ! तुमच्याकडे माणसांची वर्दळ जास्त असते.’ मी.
‘जाऊ दे आता. बघू नंतर ! उद्यापरवाचे हळदकुंकू आहे. ते झाल्यावर पाहू !’ ते. हा विषय पण तेवढ्यावरच थांबला. मला मात्र संभाव्य धोका दिसत होता.
तिसरा दिवस उजाडला, आणि मी कोर्टात आल्याआल्याच त्यांनी, ‘तू म्हणत होता, ते खरं होतं !’ असे म्हणत, ‘निष्कारण फटका’ बसल्याचे सांगीतले. काय झाले हे विचारल्यावर -
‘परवाच आमच्याकडे संक्रांतीचे हळदीकुंकू होते. सर्व बायका आलेल्या. हिने नवीन काॅट घेतला म्हणून सांगीतले. त्याचा उलगडून पलंग करता येतो, हे पण सांगीतले.’ ते.
‘बरं मग !’ मी.
‘अरे, बरं मग काय ? त्या बायका ऐकता होय ? तीन जणी एकदम त्यांवर बसल्या !’ ते.
‘बरं मग !’ मी.
‘बरं मग काय ? त्या तिन्ही अशा होत्या.’ त्यांनी दोन्ही हातांच्या काखा फुगवत ‘त्या लठ्ठ असण्याची’ खूण केली. मला काय झाले असावे, हा अंदाज आला, पण मी बोललो नाही.
‘बरं मग ?’ मी.
‘अरे बरं मग काय ? मी काय मुकीमबुवांचे किर्तन सांगतोय ? पहिले कुच्चऽऽऽ असा आवाज आला. त्या इकडेतिकडे बघेपर्यंत, त्या पलंगाच्या एका बाजूचे दोन पाय एका दिशेला, तर दुसऱ्या बाजूचे दोन पाय त्याच्या विरूद्ध दिशेला गेले. पलंगाची मधली बाजू जमिनीकडे वाकत, त्याची हळूहळू झोळी व्हायला लागली. त्यांना उठता येईना. त्यांच्या हातातील तिळगूळ उडाला. त्या कशाबशा पडतापडता उठल्या, बाकीच्या खाली बसलेल्या भरकन दूर सरकल्या !’ ते.
‘मग आता ?’ मला प्रसंग आठवून हसू आवरेना.
‘दुसऱ्या दिवशी त्या पलंगवाल्या माणसाला बोलावले आणि ते सर्व दाखवले आणि काय झाले ते सांगीतले ! निर्लज्ज माणूस !’ ते.
‘काय ?’ मी.
‘म्हणतो, एका माणसाऐवजी तीन बाया बसल्यावर हे असेच होणार !’ ते.
‘पलंग परत घ्यायचे काय म्हणाला ?’ मी.
‘मोडीच्या भावात हा परत घेतो, नविन चांगला बनवून पाठवतो.’ ते.
‘पाय सरळ करून घ्या आणि पलंगाच्या खाली आडव्या बीमसारखी मजबूत ॲंगलची पट्टी लावा. स्वस्तात होईल.’ मी.
मी काही बोलायच्या आंत, ते म्हणाले, ‘चल. मला माहीत आहे. लालचंदकडे चहाला जाऊ !’
© ॲड. माधव भोकरीकर
Dhananjay Chincholikar

27.1.2020

No comments:

Post a Comment