Sunday, May 10, 2020

प्रभू रामचंद्र की जय ! आपण सर्वांना राम नवमीच्या शुभेच्छा !

प्रभू रामचंद्र की जय ! आपण सर्वांना राम नवमीच्या शुभेच्छा !
माझ्याच नाही, तर आपल्या सर्वांच्या जीवनातील कदाचित हा पहिलाच उत्सव असेल, की आपण सर्वांवर 'गुढीपाडवा ते रामनवमी' या चैत्री नवरात्रावर बंदीचे, आपापल्या घराबाहेर न पडण्याचे सावट आहे. ही मानवनिर्मित समस्या आपण अजूनही गंभीरपणे घेत नाही, हे आपण सर्वांना सर्वांच्याच वागणुकीतून लक्षांत येत आहे. प्रभू रामचंद्रांना मानणाऱ्या सर्वांना एक आवाहन, त्यांनी लक्षांत ठेवावे की, केवळ उत्सव साजरे करून आपणांस समाधान मनात येणार नाही आणि तसे मानायचे पण नसते.
प्रभू रामचंद्रांनी, विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करतांना राक्षसांचे आणि राक्षसी वृत्तीच्या लोकांचे निर्दालन केले, आपल्या पित्याच्या वचनासाठी वनवास पत्करला आणि धर्माचे रक्षण केले. सुग्रीवाचे राज्य वालीने, आपल्या बलप्रयोगाने अधर्माने संपुष्टात आणले आणि इतकेच नाही तर वालीने आपल्या सख्या भावाची पत्नी बळजोरी करून स्वतःसाठी घेतली. हे संस्कृतीच्या, धर्माच्या विपरीत असे अयोग्य वर्तन, प्रभू रामचंद्रांनी वालीचे निर्दालन करून संपुष्टांत आणले. त्यांची पत्नी, देवी सीता हिचे बळजोरीने अपहरण तत्कालीन समर्थ राजा, रावण याने केले. इतक्या पराक्रमी राजाने केलेले अधर्माचे, अयोग्य, असंस्कृत वर्तन अगदी दुर्बल असला तरी त्याने सहन करावयास नको, त्या अधर्माला नेस्तनाबूत करण्यासाठी सर्वसामान्य देखील आपली एकजूट करत, आपल्याला मदत करतात, आणि दुष्टाचे निर्दालन करतात, हे आपल्या वागणुकीतून आणि अनुभवाने दाखवून दिले. स्वस्थ बसून चालत नाही. कार्य करावेच लागते.
आज आपल्यासमोर हीच समस्या आहे. संपूर्ण जगावर, देशावर कोरोना विषाणूचे सावट आहे. आपल्या आरोग्याची, जीवनाची शाश्वती राहीलेली नाही. शासन आणि त्यांचे अधिकारी आपला जीव धोक्यांत घालून त्यातून बाहेर पडण्यासाठी जीवापाड प्रयत्न करीत आहे. असे असतांना, काहींचे मुद्दामहून बेजबाबदार वर्तन सुरु आहे. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे, त्यामुळे समाजातील सर्वांचेच आरोग्य आणि जीवन धोक्यांत येत आहे. ही वेळ चर्चेची अजिबात नाही, तर कठोरपणे निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आहे, हे लक्षांत ठेवावे. दुष्टांचे निर्दालन करणाऱ्या प्रभू रामचंद्रांचे स्मरण करावे, आणि ही विषाणूचे काम करणारी मंडळी आणि त्यांचे वर्तन कठोरपणे निपटून काढावे. त्यासाठी शासनाला भाग पाडावे आणि सहकार्य करावे,

2.4.2020

No comments:

Post a Comment