Sunday, May 10, 2020

काहींच्या पोस्ट वाचल्यावर, तिथं काहींच्या त्याविरूद्ध प्रतिक्रिया दिसतात. त्या प्रतिक्रियांचा समाचार पोस्टकर्ता किंवा त्याचा ‘परिवार’, हा शब्द नको असल्यास, त्याचे बगलबच्चे, ज्या पद्धतीने घेतात, ते पाहून मी तर थक्क व्हायचंसुद्धा विसरतो. इतकी पण बुद्धी नसावी किंवा अशी बुद्धी असावी, हे पाहून परमेश्वराच्या कर्तृत्वाची भव्यतेपुढे नम्र व्हावेच लागते. अशा भव्यदिव्य माणसांच्या विचार, निष्कर्ष आणि लिखाणांपुढे दीपायला होते. मी तिथं शक्यतोवर व्यक्त होत नाही. गरज नसते आणि उपयोग पण नसतो.
माझी अडचण ही आहे, की विविध देशांच्या विविध कायद्याचा अभ्यास मला माझ्या शिक्षणामुळे आणि व्यवसायामुळे करावा लागला. त्यामुळे अशा काही घटना बघीतल्या की त्यातील सत्यासत्यतेची संभाव्यता लगेच लक्षात येते.
यांच्या पोस्ट वाचल्यावर जी मंडळी अगदी कळवळून प्रतिक्रिया देतात, त्यांना विचारावेसे वाटते, ‘पुराव्याच्या कायद्याचे सोपे तत्व’ तुमच्या लक्षात आले नाही ? माझे काही निष्कर्ष -
१. यांना आपला भारतीय पुराव्याचा कायदा लागू होत नाही.
२. हिंदु समाजाविरूद्ध आणि धर्म व संस्कृतीविरूद्ध कोणतीही गोष्ट ही सत्य असते, त्यामुळे तिला कोणत्याही पुराव्याच्या कायद्याचे निकष लावण्याची आवश्यकता नसते.
३. शांतीप्रिय समाजाने कोणतेही वक्तव्य, त्याला सुसंगत वा विसंगत असलेली कोणतीही कृती, ही बरोबर असल्याने त्याला पण पुराव्याची आवश्यकता नसते.
४. या संस्कृतीशी सुसंगत, देशाच्या समाजमनाशी सुसंगत अशी कोणी प्रतिक्रिया मांडली, त्या विरूद्ध कोणी वागू नका, असे आवाहन केले, की ते नेहमीच घटनाविरोधी व मानवाधिकाराच्या विरूद्ध असते. याउलट यांच्याविरोधात कोणी काही प्रतिक्रिया दिली, विचार मांडले, तर ते मानवाधिकाराशी सुसंगत आणि घटनानुकूल अशी असते.
५. येथील समाजास आपला धर्म व संस्कृती सुरक्षित ठेवण्याचा अधिकार नसून, ते तसे करत असतील, तर त्यांची ती कृती घटनाविरोधी असून, त्यामुळे इतरांचे घटनात्मक हक्क डावलले जातात. याउलट या मूळ संस्कृतीवर आक्रमण करणाऱ्यांची पाठराखण करणाऱ्यांस मात्र आपले विचार, आपली संस्कृती, धर्म यांचा प्रसार व प्रचार करण्याचा घटनादत्त व अनिर्बंध अधिकार असून, तो कोणासही काढून घेता येणार नाही, अथवा आपल्या विधीमंडळास कोणतेही कायदे करून त्यांवर नियंत्रण आणता येणार नाही.
६. या देशात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी, ही येथील मूळ संस्कृतीची पाठराखण करणाऱ्यांची आहे. या संस्कृतीवर आक्रमण करणारे, ती उध्वस्त करणाऱ्या पूर्वीच्या आक्रमकांच्या विचाराची व कृतीची आज देखील पाठराखण करणाऱ्यांवर नाही.
७. कलम ६ मधील अशा विचाराने जे वागतात, त्याचे परिणाम समाजहिताविरूद्ध, देशहिताविरूद्ध, समाज दुभंगणारे व सध्या अंमलात असलेल्या कायद्यांविरूद्ध असले, तरी त्यांना तसे काही, देशद्रोही अजिबात म्हणायचे नाही, तर त्यांना असलेले ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, जे भारताच्या घटनेने त्यांना दिलेले आहे.
सध्या इतकेच लिहीतोय. आपल्या पण काहीतरी लक्षात आले असेलच.

1.3.2020

No comments:

Post a Comment