Sunday, May 10, 2020

रंडोल - एकचक्रा नगरी आणि बकासुर वध !

एरंडोल - एकचक्रा नगरी आणि बकासुर वध !
आज दूरदर्शनवर महाभारत बघीतले.
पांडव लाक्षागृहाच्या आगीतून सुखरूप निसटले, गुप्तरूपाने राहू लागले. नंतर आले, ते एकचक्रा नगरीत, ब्राह्मणवेशात ! एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी, अतिथी म्हणून राहू लागले. त्या गांवावर असलेले बकासुराचे संकट, पांडवांनी आपले मानले. राजाने आपल्या कर्तव्यापासून पळ काढला, की प्रजेवर बकासुररूपी संकट येतेच ! त्या संकटापासून सुटका, प्रजेला आपल्या सामर्थ्याने व हुशारीने करावी लागते, तोपर्यंत संकटाचे परिणाम भोगावेच लागतात. राजमाता कुंतीने त्या यजमानाचे व गांवावरील संकट आपले मानले. आपल्या पुत्राला, भीमाला त्या संकटाचे निर्मूलन करण्यास पाठवले. आपल्या मातेचा विश्वास भीमाने सार्थ ठरवला.
एकचक्रा नगरी, म्हणजे जळगांव जिल्ह्यातील एरंडोल मानले जाते. पांडव या एकचक्रा नगरीत जिथे राहीले, तो वाडा ‘पांडव वाडा’ म्हणून ओळखला जातो. भीमाने बकासुराला जिथे मारले, ती जागा म्हणजे पुराणातील प्रसिद्ध गणेशस्थान मानले गेलेले ‘पद्मालय’ जवळील दरीतील जागा ! गणेशाच्या मंदीरापासून साधारणत: अडीच-तीन किलोमीटरवर आहे. भीमाच्या खुंब्याने झालेले कुंड, त्याच्या पायाचा ठसा तिथे दाखवला जातो. तेथील दगड मात्र भाताची शीते इतस्तत: उडाल्यावर कसे दिसेल, तसा आहे.
पद्मालयला श्री रिध्दीसिद्धी गणेशाच्या दर्शनाला जाण्याचा अधूनमधून योग येतो. कमळ म्हणजे पद्म याचे आलय, म्हणून पद्मालय ! चतुर्थीला तिथं हजारोंनी भाविक दर्शनाला येतात. मी साधारणत: पंचवीस वर्षांपूर्वी या बकासुराला भीमाने जिथे मारले, त्या ठिकाणी गेलो होतो, त्याची आठवण झाली.
© ॲड. माधव भोकरीकर

13.4.2020

No comments:

Post a Comment