Sunday, May 10, 2020

आठवणीतील व्यक्ती - पं. विनायक फाटक !

आठवणीतील व्यक्ती - पं. विनायक फाटक !
मी जळगांवी शिकायला होतो, सन १९७८ ते १९८५ या काळात ! अर्थात त्यापूर्वीपासून देखील जळगांवी जात असायचोच, कारण जळगांव माझे आजोळ ! आजोळी शास्त्रीय संगीताची बऱ्यापैकी आवड, तसेच माझी आई तर जळगांवचे प्रख्यात संगीतज्ञ पं. कै. गोविंदराव कुलकर्णी यांची विद्यार्थिनी ! त्यांनी आपले शिक्षण ग्वाल्हेर येथे पं. कृष्णराव पंडीत यांचेकडे राहून घेतले होते. त्यामुळे जळगांवच्या संगीतक्षेत्राशी आणि त्यांतील व्यक्तींशी संबंध हा जन्मापासूनच आला असे म्हणता येईल. त्यावेळी काही समजत नव्हतेच ! त्यांत कै. शरदराव धर्माधिकारी, कै. विनायकराव पुराणिक, कै. वसंतराव चांदोरकर, कै. बबनराव भावसार, कै. मुरलीधरबुवा जोशी आणि अजून काही मंडळी होती.
आज सायंकाळी असाच बसलो होतो. आठवण आली आकाशवाणी जळगांव केंद्राची ! मी जळगांवी शिकायला गेलो, त्यावेळेस जळगांव आकाशवाणी केंद्र नुकतेच सुरू झाले होतो. मी काॅलेजला जात असल्याने, एखाद्या काॅलेजकुमारास जितके ज्ञान असावे, तितके होते; मात्र आपल्याला किती ज्ञान आहे, असा समज असावा, तसा समज पण होता. विविध स्पर्धांमध्ये लुडबूड करण्याव्यतिरिक्त, मी आकाशवाणीची नाटकाची चाचणी परिक्षा त्या काळात पास झालो होतो. परिक्षक होते, पुरुषोत्तम दारव्हेकर ! मी माझ्या महाविदयालयीन काळातच आकाशवाणी कलाकार झालो होतो. त्यामुळे या निमित्ताने आणि युववाणीच्या निमित्ताने माझी आकाशवाणी जळगांव केंद्रात ये-जा असायची. तेथील युववाणी विभाग सांभाळणारे, कार्यक्रम अधिकारी श्री. अशोक बढे हे अत्यंत सज्जन गृहस्थ ! आम्हा मुलांचा आगाऊपणा ते सहन करायचे, हे आता आम्हाला समजतेय !
मी तबला शिकत होतो, जळगांवचे प्रसिद्ध तबलाशिक्षक बबनराव भावसार यांच्याकडे ! संगीताच्या परिक्षांची लेखी आणि प्रात्यक्षिक याची तयारी देखील ते चांगली करून घेत. त्यावेळी जळगांव आकाशवाणी केंद्रात श्री. विश्वनाथ मिश्रा, श्री. विनायक फाटक आणि श्री. नारायणराव दाभाडे, हे तबलावादक म्हणून होते.
त्यापैकी योगायोगाने भेट झाली होती, आमचे गुरूजी बबनराव भावसार यांच्यासोबत, ती श्री. विनायक फाटक यांची ! गोरापान उभट चेहरा, धारदार नाक आणि किंचीत घारेपणाची झाक असलेले डोळे, थोडा बारीक आवाज ! त्यावेळी त्यांना काही तबल्यासंबंधी लेखी माहिती हवी होती. त्यासाठी मला आमच्या गुरूजींनी माझी लेखी वही घेऊन त्यांच्या घरी बोलावले. मी ही संधी सोडणार नव्हतोच. तसे ते रिंगरोडवर आम्ही रहात होतो, त्या जवळच रहायचे. त्यांच्याकडे मला काही काम नसले, तरी जायला आवडायचे, कारण त्यांचा त्यावेळी रियाज सुरू असायचा. मला भरपूर काही ऐकायला मिळायचे, पण फार काही घेता आले नाही.
बोलण्याच्या ओघात माझी आवड, माझ्या आईचे संगीतातील शिक्षण, कै. गोविंदराव कुलकर्णी आणि आमचे संबंध वगैरे जसजसे माहिती होऊ लागले. तसा आमच्यातील नवखेपणा कमी होऊ लागला, मग जळगांव संबंधी अवांतर गप्पा पण होती. कधीतरी त्यांचे गुरू सामंत गुरूजी यांचा पण विषय निघे. ते जळगांवी होते, तो पावेतो जाणे होते. मात्र नंतर समजले, की त्यांची बदली पुण्याला झाली. बस, त्यानंतर भेट नाही.
माझी पण वाट संगीत क्षेत्रापासून दुसरी झाली. आज अचानक नांव दिसले, सौ. रेवा नातू, यांचे ! मग आठवले, अरे त्यावेळी त्यांना एक छोटी मुलगी होती, तीच असावी. त्यांचे काही तबलावादन ऐकता येते का, ते बघीतले. विहीर बघीतले. तेच होते. इतक्या वर्षांनंतर वयाचा परिणाम शरीरावर दिसणारच ! त्यांचे तबलावादन ऐकले. खूप बरे वाटले.
जुन्या आवडत्या व पुन्हा न अनुभवायला मिळणाऱ्या आठवणी, या नेहमीच हव्याहव्याशा वाटतात ! पं. विनायक फाटक यांना, यांतील थोडेफार आठवत असेल, किंवा नसेल ! मला आठवले, लिहावेसे वाटले, लिहीले झाले.
© ॲड. माधव भोकरीकर

30.1.2020

No comments:

Post a Comment