Sunday, May 10, 2020

उठा राष्ट्रवीर हो —!

उठा राष्ट्रवीर हो —!
मी रावेरला, आमच्या हायस्कूलमधे शिकत असतांना, काही वेळा एखादे शिक्षक जर रजेवर असायचे, मग त्यांचा तास व्हायचा नाही, तर त्या त्यांच्या तासाला, दुसरे कोणते तरी शिक्षक यायचे. ते कसले काय त्या तासाला शिकवणार ? मग गाण्याच्या भेंड्या, गाणी म्हणणे, गोष्टी सांगणे, शब्दार्थ विचारणे किंवा थेट मैदानावर घेऊन जाणे, असे काही तरी होई. काहीतरी नवीन, उपयुक्त असे होई.
त्यावेळी मग कोणाला गाणी गायला सांगत, गोष्ट सांगायला सांगत, कविता पाठ घेतली जाई, शब्दार्थ विचारले जात. मात्र काही वेळा शिक्षक जरा खुशीत असले, तर जरा कला अंगी असलेल्याला बोलवत. त्याला गाणी म्हणायला सांगत, हेतू हा असावा, की त्यांच्याजवळ असलेल्या, कलेपासून आम्ही काही शिकावे, स्फूर्ती घ्यावी.
मला दोन नांवे आठवतात, एक म्हणजे संजय बाळापुरे, आणि दुसरा आमच्या वर्गात नसलेला, एक जण होता, तो म्हणजे, कैलास कासार ! तसा आठवीनंतर राजेंद्र थोरात म्हणून पण आला, तो पण छान गाणे म्हणायचा.
मात्र मी पाचवीत असतांना, कैलास कासार हा जास्त लाडाचा असावा. त्याला बऱ्याच वेळा गुरव सर त्याच्या वर्गातून, आमच्या वर्गात बोलावून आणायला सांगत. त्याच्याजवळ कसले तरी गाण्याचे पुस्तक होते, त्यातून तो गाणे म्हणायचा. काही वेळा एकटा म्हणायचा, आणि आम्ही फक्त ऐकायचो; तर काही वेळा तो म्हणायचा, आणि नंतर सगळा वर्ग त्याच्यामागून म्हणायचा ! त्याची सर्व गाणी, ही देशभक्तीपर आणि आपल्याला स्फूर्ती देणारी असत. एक मात्र नक्की, गाणं झाल्यावर बरं वाटायचं, समाधान वाटायचं, मनाला उभारी यायची. मग आपण गायलं असो, का त्याने म्हटलेले व आपण ऐकलं असो. त्यावेळी या गाण्याचे गीतकार कोण, संगीतकार कोण, गाणं कोणत्या प्रसंगी लिहीलं आहे, चित्रपटातील आहे का, वगैरे प्रश्न आम्हाला पडत नसत.
आज कोर्टातून आलो, आणि असाच बसलो होतो. एक गाणे आठवले, ‘उठा राष्ट्रवीर हो’ ! आपल्यापैकी बहुतेक सर्वांनीच ते ऐकले असावे. पण मला राहवले गेले नाही, म्हणून ही आठवण आणि गाणे, आपल्या सर्वांसाठी ! या लहान मुलांनी, खरंच किती छान म्हटलं आहे नाही ! लहानपणापासून ते म्हणताय, किती छान आहे नाही ?
— अलिकडच्या आसपासच्या बातम्या ऐकल्या, लोकांचे वागणे बघीतले, की आजच्या काळात, याची फक्त लहान मुलांनाच नाही, तर मोठ्यांना पण, खरंच फार आवश्यक आहे नाही ?
उठा राष्ट्रवीर हो
सज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला
युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे
मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे
एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला
उठा राष्ट्रवीर हो ...
वायूपुत्र होऊनी धरु मुठीत भास्करा
होऊनी अगस्ती ही पिऊन टाकू सागरा
रामकृष्ण होऊया, समर्थ होऊ या चला
उठा राष्ट्रवीर हो ...
चंद्रगुप्त वीर तो फिरुन आज आठवू
शुरता शिवाजीची नसानसात साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा राष्ट्रवीर हो ...
यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी, तयात देऊ आहुती
देवभूमी ही अजिंक्य, दाखवू जगा चला
उठा राष्ट्रवीर हो ...

25.2.2020

No comments:

Post a Comment