Sunday, May 10, 2020

ज्यांनी मला कधीही शिकवले नाही — ते माझे काही शिक्षक !

ज्यांनी मला कधीही शिकवले नाही — ते माझे काही शिक्षक !
आपल्याला काही जण भेटतात, जे शिक्षक असतात, प्राध्यापक असतात आणि कुठल्यातरी शाळेत, महाविद्यालयांत शिकवत असतात. त्यांनी शिकवलेले काही वेळा लक्षात रहाते, तर काही वेळा लक्षात पण रहात नाही. काहींचे शिकवणे लक्षात ठेवण्यासारखे असते, तर काहींचे नसते.
कोणीही शिक्षक असो, काही जण मात्र आपल्याला कधीही शिकवण्याची शक्यता नसते, कारण एकतर ते दुसऱ्याच शाळेत वा महाविद्यालयांत असतात, किंवा आपण त्यावेळी खूपच खालच्या वर्गांत शिकत असतो आणि ते खूपच वरच्या वर्गांना शिकवत असतात, म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचेपावेतो, ते निवृत्त झालेले असणार, हे नक्की असते. अजून विशेष असे, महाविद्यालयासंबंधी बोलावयाचे, तर आपण ज्या शाखेचे शिक्षण घेत असतो, त्या विभागाचे ते शिक्षक नसतात. यांचा अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे, आपल्याला ज्यावेळी ही मंडळी समजते, त्यापूर्वीच ते निवृत्त झालेले असतात.
अशाच काही शिक्षकांची, प्राध्यापकांची नांवे आठवली, की ज्यांनी मला लौकीकार्थाने त्यांच्या शाळाकाॅलेजच्या वर्गात काहीही शिकवले नाही. मात्र त्यांच्या थोड्याफार सहवासातून, बोलण्यातून बरेच काही शिकतां आले. त्यांचे पण ऋण आपण स्मरायला हवे.
1. प्रा. म. ना. अदवंत - जळगांवच्या मूळजी जेठा महाविद्यालयातील हे मराठीचे प्राध्यापक, प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक ! ते रहायचे जळगांवच्या जी. एस्. ग्राउंडसमोर असलेल्या भोसेकरांच्या ‘विकास’ बिल्डिंगमधे, वरच्या मजल्यावर ! मला यांच्याकडे जायचा योग यायचा, तो असाच त्यांच्या विद्यार्थांसोबत, ते माझे नातेवाईक ! तिथं तळमजल्यावर वाखारकर रहात असत, त्यांच्याकडे गेले, की एखादेवेळेस वर जिना चढून त्यांच्याकडे जायला मिळे. ‘हा कोण ?’ माझ्याकडे पाहून त्यांनी विचारल्यावर, ‘हा भाचा, सुटीचा आलाय !’ हे उत्तर दिले जाई. ‘कोणत्या वर्गात ?’ या त्यांच्या प्रश्नावर, माझी इयत्ता सांगीतली जाई आणि याला वाचनाची आवड आहे, हे पण ओघात सांगीतले जाई. त्यावेळी ‘वाचन करायलाच हवे. बघ, हे वाचेल का तो ?’ असे म्हणत त्यांनी, त्यांचे ‘मनाचे संकल्प’ नांवाचे पुस्तक मला वाचायला दिल्याचे आठवते. डोक्यावर पांढरे केस, बेताची उंची असलेले, काळ्या जाड फ्रेमचा चष्मा घातलेला त्यांचा चेहरा मला अजून आठवतो.
2. प्रा. म. मो. केळकर - जळगांवच्या मूळजी जेठा महाविद्यालयातील हे संस्कृतचे प्राध्यापक ! संस्कृत त्यावेळी इंग्रजीमधून शिकवले जाई म्हणे ! सामाजिक कार्य, वाचनालय, विविध ठिकाणी व्याख्याते म्हणून जाणे ही त्यांची ओळख होती. लालबुंद गोरे, घारे डोळे, जाणवेल व न जाणवेल असे अनुनासिक बोलणे त्यांचे वैशिष्ट्य ! पूर्वी हे तहसीलदार कार्यालयाजवळ एका जुन्या बांधणीच्या इमारतीत वरच्या मजल्यावर रहात. यांच्याकडे जायचे, तर कोणाबरोबर म्हणजे, त्यांच्या विद्यार्थ्याबरोबरच ! मी दहावीत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याची बातमी यांना सांगीतली होती. जळगांवला मी जसा शिकायला आलो, तसा अभाविप निमित्ताने त्यांच्याकडे स्वतंत्रपणे त्यांच्या नवीन घरात जाण्याचा योग आला. बैठकांमधे त्यांचे स्वच्छ व सडेतोड मार्गदर्शन पण मिळायचे. रावेरच्या वाचनालयाचा पदाधिकारी असल्यावर त्यांना, आवर्जून व्याख्यानाला पण बोलावले होते. विषय होता - ‘मनु आणि मनुस्मृती’, ते संस्कृतचे प्राध्यापक असल्याने, जुन्या संस्कृत ग्रंथातील विविध वचने, दृष्टांत त्यांच्या सहज जिभेवर येत. जुने ते सर्वच वाईट नसते, वाईट असते, ती आपली दृष्टी, विचार करण्याची पद्धत, हे त्यांचे व्याख्यानातील वाक्य लक्षात राहीले !
3. डाॅ. शंकरराव पुणतांबेकर - जळगांवच्या मूळजी जेठा महाविद्यालयातील हे हिंदीचे प्राध्यापक, प्रसिद्ध साहित्यिक ! यांच्या पुढाकाराने जळगांवला दरवर्षी होणारा कार्यक्रम म्हणजे, होळीनंतर काही दिवसांतच - ‘हास्यव्यंग संमेलन’ ! जीवनातील दु:खाकडे बघत आणि सोसत उदासवाणे जीवन जगण्यापेक्षा, त्याकडे वेगळ्या दृष्टीने पहा, आणि दु:ख व वेदनेला हसून सामोरे जा ! या कार्यक्रमांत असलेली नामवंतांची उपस्थिती, त्यांना दिलेल्या - मूर्खश्री, मूर्खशिरोमणी वगैरे पदव्या ज्यावेळी चमत्कारिक मुकुट घालून स्विकारायला ही मंडळी येत, त्यावेळी यांनी काय आणि कोणत्या माणसांची माया जमवून ठेवली आहे, याचे नवल वाटे. रावेर येथे वाचनालयांत यांचे पण व्याख्यान ठेवले होते, त्यावेळी ‘दु:खाशिवाय कोणीही माणूस नाही, मात्र त्यासाठी तुम्ही किती रडणार आणि आपलं आयुष्य रडकं करून घेणार ? त्याच्यावर हसायला शिका, तुमची दु:खाची भिती निघून जाईल !’ हे त्यांचे आनंदी रहाण्याचे निकष पाळायला, काही हरकत नाही.
4. प्रा. राजा महाजन - जळगांवच्या मूळजी जेठा महाविद्यालयातील हे मराठीचे प्राध्यापक आणि साहित्यिक ! यांच्या कविता काही वेळा ऐकण्याचा योग आला. यांच्या घरी जाण्याचा योग म्हणजे, विद्यार्थी परिषदेच्या ‘प्रथम विद्यार्थी सत्कार’ या कार्यक्रमाला यांना निमंत्रण द्यायला गेलो होतो. यांची मुलगी बहुदा बारावीला महाविद्यालयांत पहिली आली होती. अहिराणी बोलीवर अतिशय प्रेम असलेला हा माणूस, आपल्या घरच्यासारखा वाटे !
5. प्रा. डाॅ. एकनाथ वाठ - मी जसा जळगांवला शिकायला आलो, आणि विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयांत आलो, तशी माझी पहिली भेट यांची इथं झाली. अभाविपचे ते जळगांव शाखेचे अध्यक्ष ! नंतर तर मग, कामानिमीत्ताने अथवा काम नसतांना देखील, यांच्या असंख्य भेटी झाल्यात, घरी जाणे झाले, अगदी ते असेपर्यंतच नाही, तर ते कायमचे सोडून गेल्यावर देखील, त्यांचे घर आम्हाला सदैव उघडेच आहे. जळगांवच्या मूळजी जेठा महाविद्यालयातील हे विज्ञानाचे प्राध्यापक ! केवळ आपण बरं, आणि आपलं काम बरं, असे न पहाता, महाविद्यालयांत शिकायला येणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना आपल्या पाल्याच्या भूमिकेत पहाणारे, हे प्रा. वाठ सर !
मला भेटलेली, ही काही शिक्षक मंडळी, जळगांवच्या मूळजी जेठा महाविद्यालयातील हे प्राध्यापक ! यांनी मला कधीही शब्दार्थाने वर्गात शिकवले नाही. मात्र मी यांच्याकडून ते माझे शिक्षक नसल्याने काहीच घेतले नाही, हे म्हणणे म्हणजे कृतघ्नपणा होईल ! प्रा. डाॅ. एकनाथ वाठ सोडले, तर नंतर त्यांच्या घरातील कोणाशी वा पुढच्या पिढीशी संबंध आला नाही. यांतील काही आपल्याला कायमची सोडून गेली आहे. खरोखर आपल्याला चालायला शिकवणाऱ्या मंडळीत कोणाकोणाचा सहभाग आहे, याची नांवे काढली, तर किती जण निघतील नाही ?
© ॲड. माधव भोकरीकर
(पोस्ट आवडली असल्यास शेअर करू शकतात.)

27.4.2020

No comments:

Post a Comment